मुख्यमंत्र्यांबरोबर ‘किसानक्रांती’ची तडजोड

0

विश्‍वासघातमुळे पुणतांबेकर आक्रमक संप सुरुच ठेवण्याचा शेतकर्‍यांचा निर्धार

 

पुणतांबा (वार्ताहर)- शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी एक जूनपासून पुकारलेला शेतकर्‍यांचा संप रविवारी सकाळी मागे घेतल्याचे वृत पुणतांबा परिसरात येताच शेतकर्‍यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. संप सुरू ठेवण्याचा निर्धार परिसरातील सर्वच गावातील शेतकर्‍यांनी  व्यक्त केला. किसान क्रांतीच्या कोअर कमिटीने मुख्यमंत्र्याकडे जावुन तडजोड करून संप मागे घेतला असा आरोप करून कोअर कमिटीच्या सदस्यांच्या हेतुवर शंका  घेतली. तडजोड मान्य नसल्याचे सांगत संपाचे केंद्रबिंदु ठरलेले पुणतांबा गावात संप सुरू राहणार असुन सोमवारी महाराष्ट्र बंद राहणार असल्याची घोषणा यावेळी केली.

 

महाराष्ट्रात सुरू असलेल्या शेतकरी घडामोडीची पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पोलिस दलासह शिघ्र कृती दलाची तुकडी पुणतांबा सकाळीच दाखल झाली. संप मागे घेतल्याच्या वृत्तानंतर पुणतांब्यात सकाळीच ग्रामपंचायत जवळ शेतकरी जमा होण्यास सुरूवात झाली. मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाल्यानंतर डॉ. धनंजय धनवटे, बाळासाहेब चव्हाण, अनिल नळे, नामदेव धनवटे, विजय धनवटे, बाळासाहेब भोरकडे आदींसह अनेक शेतकर्‍यांनी आक्रमक भुमिका घेऊन संपाची भुमिका मांडुन 5 जुनला महाराष्ट्र बंद राहणारच अशी भूमिका मांडली. याची खात्री पटवुन दिली. संपुर्ण पुणतांबा गाव ढवळून निघत असताना अनेक शेतकरी शिर्डी, बाभळेश्‍वर, कोल्हार, राजुर, लाखगंगा, मातुलठाण, अस्तगाव, निफाड, येवला, कारेगाव, वाकडी, जळगाव, शिंगवे आदी गावातुन येथे दाखल झाले. शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले आणि आशा केंद्र चौकातुन स्टेशन रोड, रेल्वे गेटपर्यंत चालत घोषणा देत रेल्वे गेटसमोर सर्व शेतकर्‍यांनी ठिय्या मांडला.

 

 

येथुन पुन्हा ग्रामपंचायत जवळ शेतकरी एकत्र जमले. येथे आल्यावर लक्ष्मी आईच्या ओट्यावर सभा घेऊन डॉ. धनंजय धनवटे व बाळासाहेब चव्हाण यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करून शेतकर्‍यांची सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे, ही चळवळ शेतकर्‍यांची असुन एका व्यक्तीची नाही. संपाच्या निर्णयाबाबद नाराज शेकडो शेतकर्‍यांनी स्टेशन रोडवर  येऊन संप मागे घेणार्‍याचा निषेध केला. यानंतर घोषणा देत मोठ्या संख्येने  शेतकरी जिल्हा बँकेच्या इमारतीसमोर एकत्र झाले व निषेध सभा घेण्यात आली. यावेळी चंद्रकांत चोभे, नामदेव धनवटे, अनिल नळे, अरुण बोरबणे, विलास टुपके, उत्तम बढे, दत्तात्रय ठोंबरे, आबा नळे आदींसह शेतकर्‍यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री व किसान क्रांतीच्या नेत्यांनी शेतकर्‍याचा विश्वासघात केल्याची टिका केली.

 

 

यावेळी डॉ.धनजंय धनवटे व बाळासाहेब चव्हाण यांनी संप मागे घेणार्‍या नेत्यांवर टिका केली आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी शेतकर्‍यांच्या संपाबाबद दोन महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या शिष्टमंडळाला ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. तसेच संप मागे  घेण्याचा निर्णय पुणतांबा येथे येऊन ग्रामसभेत जाहीर न करता परस्पर मुंबई येथे मुख्यमंत्र्यासोबत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. या मागे नेमके काय गौडबंगाल हे शेतकर्‍यांना समजले पाहिजे. हा विश्वासघात असून यापूढे संप नेटाने चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते. संपाबाबद भूमिका जाणून घेण्यासाठी बाहेरगावच्या शेतकर्‍यांनी दिवसभर गर्दी केली होती. शेतकर्‍यांनी दुपारी दोन वाजता आदोलंन केले. राहत्याचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पटारे, सागर लुटे, भागवत लांडगे, गणेश होले यांनी पुणतांबा येथे येऊन संप चालूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.  किसान क्रांतीचे नेते फितुर झाले, शासनाशी हातमिळवणी करून त्यांनी शेतकर्‍यांचा विश्वासघात करून संप मागे  घेण्याची घाई केली असा आरोप आंदोलक शेतकर्‍यांनी केला.

 

 

संभाजी ब्रिगेडचे दशरथ गव्हाणे यांनी सरकार व कोअर कमिटीवर जोरदार टिका करून शेतकर्‍यांचा घात करणार्‍या सुर्याजी पिसाळाच्या वृतीच्या लोकांचा जाहिर निषेध केला. शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौघुले यांनी 5 जुन महाराष्ट्र बंद होणार तर मुख्यमंत्र्यासोबत रात्रीची बैठक घेऊन सेटी बेटी केल्याचा आरोप केला. यावेळी शिवसेनेचे मुन्ना नवले, कैलास चव्हाण, अभय चव्हाण, अरूण बोरबने, भाऊसाहेब केरे, ललित शिंदे, ज्ञानेश्‍वर खर्डे, विट्ठल शेळके, अजित गुढगे, सतिश खालकर, प्रविण जामदार, प्रमोद चौधरी, संजय बैरागी आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

 

 

 मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी गेलेले किसान क्रांती कोअर कमिटीचे सदस्य शनिवारी सांयकाळपर्यंत पुणतांब्यात आले नाही. परीसरातील शेतकर्‍यांनी त्यांच्याविरोध निषेधाच्या घोषणा दिल्या. याची दखल घेत पोलिस दल व शिघ्र कृतीदलाच्या तुकड्या पुणतांब्यात सकाळीच दाखल झाल्या. कोअर कमिटीच्या सदस्यांनी भ्रमनध्यनी बंद करून ठेवल्याने त्यांच्याशी संपर्क होवु शकला नाही.

 

शनिवारी सकाळी माध्यमांमध्ये संप मागे घेतल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर पुणतांब्यासह परीसरातील व्यवहार सुरळीत झाले. दुध संकलकेंद्रावर शेतकर्‍यांनी दूध आनले. मात्र सायंकाळी पुन्हा संप पुर्ववत सुरू आल्याचे संदेश सोशल मिडीयावर पसरल्याने दुध संकलन केंद्र बंद ठेवण्यात आले.

LEAVE A REPLY

*