शेतकरी संपावरुन गदारोळ

0

संप मागे घेतल्याच्या घोषणेनंतर राज्यभर उद्रेक; आंदोलने सुरुच

 

मुंबई / अहमदनगर – शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, स्वाभीनाथ आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, मालाला रास्त भाव द्यावा, या मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी शासनाच्याविरोधात एल्गार पुकारलेल्या आहे. हा एल्गार तिसर्‍या दिवशी कायमच होता. राज्यभर आज आंदोनले झाली. शेतकरी संपाबाबत काल रात्री साडे बाराला सुरु झालेली बैठक चार तास चालली. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या 80 टक्के मागण्या मान्य केल्याने शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने संप मागे घेतल्याचे जाहीर केले. त्याचे पडसाद आज दिवसभर राज्यभर उमठले. पुणतांब्यातील शेतकर्‍यांसह राज्यभरातील शेतकर्‍यांनी शिष्टमंडळाचा निर्णय अमान्य करून राज्यभर आंदोलन सुरुच ठेवले असून 5 जूनला राज्य बंदची हाक दिली आहे.

 

 

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी एक जूनपासून पुकारलेला शेतकर्‍यांचा संप दोन दिवस यशस्वी पार पडला. या संपामुळे जनजिवन विस्कळीत झाले होते. या संपामुळे शहरांमध्ये भाजीपाला, दूध जाणे बंद करण्यात आले होते. गावा-गावांमध्ये शहराकडे भाजापाला, फळे, दूध अडविण्यात आल्याने शहरवासियांचे चांगलेच हाल झाले होते. संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारने शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाला मुंबईत बोलविले. मुख्यमंत्र्याच्या वर्षानिवासस्थानी किसान क्रांतीच्या कोअर कमिटीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीला नाम. सदाभाऊ खोत, आ. स्नेहलताई कोल्हे यांच्यासह किसान क्रांतीच्या कोअर कमिटीचे सदस्य जयाजी सूर्यवंशी, धनंजय जाधव, डॉ. अजित नवले, कमलताई सावंत, संदिप गिडे, किरण सुराळकरे आदींसह अनेक सदस्य उपस्थित होते.

 

 

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या 80 टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे किसान क्रांतीने आपला संप मागे घेतल्याची माहिती किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत पहाटेच जाहीर केले. शनिवारी सकाळी मागे घेतल्याचे वृत पुणतांबा परिसरात येताच शेतकर्‍यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. संप सुरू ठेवण्याचा निर्धार परिसरातील सर्वच गावातील शेतकर्‍यांनी व्यक्त केला.

 

 

किसान क्रांतीच्या कोअर कमिटीने मुख्यमंत्र्याकडे जाऊन तडजोड करून संप मागे घेतला आहे, असा आरोप करून कोअर कमिटीच्या सदस्यांच्या हेतूवर पुणतांबासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी शंका घेतली. तडजोड मान्य नसल्याचे सांगत संपाचे केंद्रबिंदू ठरलेले पुणतांबा गावात संप सुरू राहणार ठेवण्याचा पुणतांबाकरांनी निर्णय घेऊन सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पुणतांब्यात कोअर कमिटीचा निषेध करण्यात आला. राज्यभरातील शेतकर्‍यांनी तसेच किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह विविध शेतकरी संघटनांनी किसान क्रांतीने घेतलेल्या निर्णयाला विरोध केला. संपाबाबत निर्णय घेताना सर्वांना सामावून घेऊन अपेक्षित होते, पण तसे झाले नाही.

 

 

 

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मोजकेच लोक गेले होते. या बैठकीत झालेले निर्णय बैठकीत सहभागी झालेल्यांनी येथे येऊन सांगायला हवे होते, असे काही संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या संपात फूट पडल्याचे स्पष्ट चित्र आहे. ज्या कोअर समितीसोबत चर्चा घडवून आणली, ती कोअर समिती शेतकरी आंदोलकांची नसून, ती तथाकथित व शासनाची स्वयंम घोषित समिती होती, असाही आरोपही विविध संघटनांनी केला आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना गंडवलं : पवार
महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती. शेतमाल खरेदी करताना हमीभाव न देणार्‍यावर फौजदारी करण्याचा सरकार कायदा करताय, पण अशा वेळी सरकारने शेतमालाची स्वतः खरेदी करून शेतकर्‍यांना दिलासा द्यायचा असतो. शेतकरी संपामागे काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात आहे असा आरोप मुख्यमंत्र्यांनी करणे हे पोरकटपणाचे लक्षण आहे. आम्ही जाणीवपूर्वक या संपापासून अलिप्त राहिलो आहोत. स्वामिनाथन समिती आपणच नेमली होती, त्यांच्या काही शिफारसी स्वीकारल्या. पण आजच्या सत्ताधारींनी 2014 च्या निवडणुकीत स्वामिनाथन लागू करू असे आश्वासन दिले होते. आता त्यांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन देऊन शेतकर्‍यांना गंडवल आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

 

मराठवाडा व विदर्भातील शेतकर्‍यांना फायदा ः मुख्यमंत्री
राज्य सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील 80 टक्के अल्पभूधारक शेतकर्‍यांना याचा फायदा होईल. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सर्वात पहिली कर्जमाफी देण्यात येईल. शेतकर्‍यांचा संप मिटवण्याऐवजी काही लोकांना संप चिघळत ठेवण्यात जास्त स्वारस्य आहे. त्यासाठी ते शेतकर्‍यांच्या आडून राजकारण करत आहेत, असा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

 

माझा बळीचा बकरा झालाय ः जयाजी सूर्यवंशी
माझी चूक झाली, पण मी शेतकर्‍यांसोबत कायम आहे. संप स्थगित केला होता, जर शेतकर्‍यांना संप सुरु ठेवायचा असेल तर मी शेतकर्‍यांसोबत आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे. माझा बळीचा बकरा झाला आहे. मी नेता म्हणून सरकारकडे गेलो नाही. माझी चूक झाली, मी बिनशर्त सर्व शेतकर्‍यांची माफी मागतो, असं जयाजी सूर्यवंशी बोलले आहेत. जयाजी सूर्यवंशींनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी पुणतांब्यातील शेतक-यांनी केल्यानंतर जाहीर माफी मागत पुणतांब्यात जाऊन माफी मागायलाही मला कमीपणा वाटणार नाही, मी त्यांचाच मुलगा आहे, अशी प्रतिक्रिया किसान क्रांती संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांनी दिली.

 

 

शेतकरी आंदोलनात जिंकले तहामध्ये हारले
कर्ज माफीसह विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी राज्यभर आंदोलन छेडले. विना नेत्याचे आंदोलन दोन दिवस चालले. सरकारच्या विरोधातील लढाईमध्ये राज्यातील शेतकर्‍यांचा जय झाला होता. परंतु सरकराने शेतकर्‍यांचे आंदोलन स्थगित खेळण्यासाठी डाव टाकला. या डावात त्यांना यश आले. शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलविले. सुमारे चार तास चर्चा झाल्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले. त्यावरून राज्यभर आता चांगलेच रणकंदन सुरु आहे. शेतकरी आंदोलनात जिंकले, पण तहामध्ये हारले, अशीच प्रतिक्रिया राज्यभरातील जनतेतून उमठत होती.

 
मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह : सदाभाऊ खोत
अल्पभूधारक शेतकर्‍यांन कर्जमुक्त करण्याचा स्वागतार्ह निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. राज्याच्या इतिहासात असा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना बरोबर घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्या मागण्या समजून शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करुन राज्याच्या शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील अल्पभूधारक आणि थकबाकीदार शेतकरी आम्ही कर्जमुक्त करु. हा स्वागतार्ह निर्णय राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा घेण्यात आला आाहे. शेतकर्‍यांबद्दल सरकारला इगो नव्हता. सरकार कायमच चर्चेचे आवाहन करत होतं. माझं सरकार हे शेतकर्‍यांचे सरकार आहे, अशा शब्दांत कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

 

सोशल मीडियावर आंदोलन जोरात
सोशल मीडियावर आंदोलन मागे घेतल्याची व सुरुच असल्याची अशी दोनही प्रकारची माहिती येतच होती. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. नेमके आंदोलन सुरु आहे की, मागे घेतले, याची निश्‍चित माहिती कोणालाच कळत नव्हती. सरकारकडून आंदोलन मागे घेण्यात आल्याचे मात्र जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना काय चालय हेच कळत नव्हते.

 

 

संप मिटल्याचा निर्णय अमान्य ः खा. शेट्टी
किसान क्रांतीने संपाबाबत निर्णय घेण्याबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे संप मिटल्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही. आम्हाला विश्वासात घेतले गेलेले नाही. सरकारने आंदोलनकर्त्यांना दिलेली आश्वासने आम्हाला मान्य नाही. आंदोलनकर्ते सरकारच्या दबावाला बळी पडले, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा खासदार राजदू शेट्टी यांनी दिली.

LEAVE A REPLY

*