कृषी सहाय्यकांचे पुण्यामध्ये धरणे; 10 जुलैपासून काम बंद

0
अहमदनगर (प्रतिनिधी)– कृषी साहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी नगरला जिल्हाधिकारी कार्यालयसमोर तीन दिवस साखळी उपोषण केले होते. आता कृषी साहाय्यकांनी मंगळवारी (दि.27) विभागीय कृषी सहसंचालक यांच्या पुणे येथील कार्यालयासमोर कृषी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे तीनशे कृषी साहाय्यक सहभागी झाले. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात 5 जुलै रोजी कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास 10 जुलैपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कृषी सहाय्यक संघटनेने दिला आहे.
कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात यावा, कृषी सहाय्यकांचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे, कृषी सहाय्यकांमधून कृषी पर्यवेक्षक पदे 100 टक्के पदोन्नतीने भरण्यात यावीत, कृषीसेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी हा शिक्षक सेवकाप्रमाणे आश्‍वासित प्रगत योजना व इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा, कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित असलेल्या आंतर संभागीय बदल्या त्वरित करण्यात याव्यात, आदी विविध मागण्या आहेत.
कृषी साहाय्यकांनी या मागण्यांसाठी 12 जूनपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले. यात काळ्या फिती लावून कामकाज करणे, लेखणीबंद, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धरणे व निदर्शने, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण आणि पुण्यात धरणे आंदोलनानंतर कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 10 जुलैपासून कृषी साहाय्यकांचे काम बंद आंदोलन आहे.
पुण्यातील धरणे आंदोलनात कृषी सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर गांगुर्डे, संभाजी भिंगारदे, तुळशीराम पवार, जाकीर शेख, विजय सोमवंशी, सुरेश वराट, जयवंत गदादे, बाळासाहेब आठरे, राहुल क्षीरसागर, शिवप्रसाद कोहकडे, बाबासाहेब लांबे, रियाज शेख, भारत बोर्डे, सागर पाटील, बापुसाहेब जाधव, चंद्रकांत म्हसे, प्रशांत पाटील, तुंबारे, अनिल शेजुळ, बी. एल. ढगे, पांडुरंग जाधव, संजय सोनवणे, तानाजी शेळके, सदाशिव सरोदे आदी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह कृषी सहायक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकर्‍यांची कामे खोळबंली – 
खरीप पेरणीदरम्यान कृषी साहाय्यकांनी आंदोलन पुकारल्याने शेतकर्‍यांच्या कामांना ब्रेक मिळाला आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असताना त्यात कृषी साहाय्यकांचे आंदोलन सुरु झाल्याने खरिपाचे नियोजन कोलमडले आहे. पीक विमा योजना, वृक्ष लागवड, ठिबक सिंचन याशिवाय नविन जलयुक्तच्या कामांना ब्रेक लागला आहे. अद्याप सरकारने कृषी सहाय्यकांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

कृषी खात्याचे मागण्यांकडे दुर्लक्ष – 
ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर विविध मागण्यासांठी आंदोलन पुकारून 15 दिवसांचा कालावधी लोटला असताना कृषी सहाय्यकांच्या प्रश्‍नांकडे कृषी खात्याने लक्ष दिले नाही. बुलढाणा येथील कृषी सहाय्यक संघटनेच्या प्रतिनिधींनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेतली. मात्र, मागण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ न दिल्याने आंदोलन सुरुच राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष गांगर्डे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*