खाजगी बस उलटून 21 जण जखमी

0

नगर-कल्याण बाह्यवळण रस्त्यावरील घटना

पारनेर (प्रतिनिधी)- चालकास रस्त्याचा अंदाज न आल्याने बसवरील ताबा सुटून एक खासगी बस उलटून 20 प्रवासी जखमी झाल्याची घटना टाकळी ढोकेश्वर येथील नगर कल्याण महामार्गावर बाह्यवळण चौकात घडली.
अपघातातील 11 जखमींना टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात तर, नऊ जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मूळ केरळ येथील रहिवासी असणारे 46 ज्येष्ठ नागरिक मुंबई येथील जोशी ट्रॅव्हल क्रमांक एमएच 04 जीपी 1334 या खाजगी आराम बसमधून देवदर्शनासाठी भीमाशंकर (ता. आंबेगाव) येथे गेले होते. शनिवारी सायंकाळी देवदर्शन घेऊन कल्याण-नगर महामार्गाने औरंगाबाद येथील वेरूळ- अजिंठा लेणी व भुवनेश्वरकडे निघाले असता शनिवारी मध्यरात्री दीड वाजता टाकळी ढोकेश्वर येथील बाह्यवळण रस्त्यावर एल आकाराच्या वळणावर कोणताही बोर्ड नसल्याने चालकास रस्त्याचा अंदाज न आल्याने बस उलटली व आतील 21 प्रवासी जखमी झाले.
अपघातची माहिती पोलीस मित्र अनिल नागरे यांनी पोलीस ठाण्यास दिली. त्यानंतर जखमींना पोपट पायमोडे, शरद झावरे व पोलिसांनी येथील रुग्णालयात दाखल केले. 11 जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू असून नऊ जखमींना नगर येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.
जखमींची नावे अशी सावित्री नायर (वय 52), पि.कौशल्या(77),चंद्रीया मेमन (60), लीलावती दयानंद (61), प्रसन्ना कर्ण (58), विजयकुमार कर्ण (68), शारदा नायर (63), धनलक्ष्मी नायर (49, जी. आर. नायर (64), उषा नायर (57), पी. व्ही नायर (64),व्ही पी नायर (83), मीनाक्षी गंगानायन (62), लीला कुट्टी (60), आकाश गडक (19), प्रधुरावदास पाटील (42), चंद्रकांत तिवारी (49), शिवराम नायर, राजन्ना राननकुट्टी (61), सुरेरे शंकरान (64) व विजय कुमार (63). हे सर्व जण मुंबईचे राहणारे आहेत.
डॉक्टरऐवजी नर्सने केले उपचार.. .. टाकळी ढोकेश्वर येथील बायपास चौकात बस उलटल्याने 21 जखमींना उपचारासाठी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र याठिकाणी वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने केवळ एका नर्सने या जखमीवर उपचार सुरू केले. दरम्यान, टाकळी ढोकेश्वर व पारनेर  येथील 108 या रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप दाते व डॉ. विनायक इघे यांनी तातडीने टाकळी ढोकेश्वर व नगर येथे प्राथमिक उपचार केले.

 

LEAVE A REPLY

*