Blog : एटी पवार : पदाचा अभिमान नसलेला कृष्णनगरमधील साधा रहिवासी

0

पंचवटीतील कृष्णनगर येथील आताच्या कृष्णनगर उद्यानासमोर ए.टी. पवार यांचे निवासस्थान होते. ते राज्यमंत्री असताना सकाळी सकाळी त्यांच्या घरासमोर पोलिसांची स्कॉटींग व्हॅन आणि लाल दिव्याची गाडी येऊन उभी राहायची.

त्यानंतर कार्यकर्त्यांची त्यांना भेटण्यासाठी लगबग सुरू व्हायची. असे असले तरी त्यांच्या ताफ्यामुळे तेथील वाहतुकीला त्रास झाला किंवा रहिवाशांना काही अडचण आली असे झाले नाही.

आपल्या येथील राहण्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये, अशी त्यांनी खबरदारी घेतलेली असावी.

दिवंगत ए. टी. पवार यांचे कृष्ण नगर, पंचवटी येथील निवासस्थान, त्यांची निधनाची वार्ता समजल्यावर येथे शांतता पसरली होती.

भल्या सकाळी पांढरा पायजमा आणि कुर्ता घालून ते कृष्णनगर परिसरात एकटेच फिरायला निघत. त्यांचा आवडता पामेरियन कुत्रा त्यांच्यासोबत हमखास दिसे.

या काळात ओळखीचे लोक त्यांना नमस्कार घालत तितकेच, एरवी शांतपणे त्यांचे सकाळचे फिरणे चाले. अनेकदा बागेतल्या झाडांजवळ ते रेंगाळताना दिसत असत.

आपण राज्याचे मंत्री आहोत असा कुठलाही भाव त्यांच्या वागण्यात यावेळी दिसून येत नसे.

बरेचदा असे होई की थोडा वेळ असेल जवळच असलेल्या रिक्षा थांब्यावर कुणाशी तरी, किंवा कोपऱ्यावरच्या दुकानदारांशी ते मोकळेपणे गप्पा मारत असत.

त्यांच्या बंगल्याच्या बाहेर, छोट्याशा आवारात काही खुर्च्या टाकलेल्या असत. तिथे ते अनेकदा बसलेले असायचे. येणारे जाणारे कार्यकर्ते, नागरिक, अधिकारी त्यांची तिथेच भेट घेत असत.

आलेल्या प्रत्येकाला आवर्जून चहापाणी दिले जाई, तो जर आदिवासी  भागातून आलेला असेल, किंवा गोरगरिब असेल तर ते त्याला प्राधान्य देत असत.

एकदा दिंडोरी तालुक्यातील एका मित्रासोबत मी त्यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा त्यांच्याकडे फार वर्दळ  नव्हती. मित्राला नोकरी संदर्भात काही काम होते.

त्यांची त्याची आपुलकीने विचारपूस  केली. चहापाणी दिले आणि कुठे अर्ज करायचा वगैरे मार्गदर्शन करून एक पत्रही दिले. एका मंत्र्याला भेटण्याच्या भावनेने आम्ही अवघडून गेलो. पण त्यांचे वागणे सहज होते.

आपण मंत्री किंवा आमदार असल्याचा कुठलाही अभिनिवेष त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही. त्यांनी तसा तो दाखविला नाही.

पवार साहेब आज गेल्याचे कळले आणि आमच्याच भागातील त्यांचे ते निवासस्थान डोळ्यासमोर आले. तेथे आता ते कधीच दिसणार नाही, याची खंत आम्हा कृष्णनगर-टकलेनगर वासियांना नक्कीच राहिल.

  • पंकज जोशी

LEAVE A REPLY

*