Thursday, April 25, 2024
Homeनाशिकगोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणेशमूर्ती प्रतिष्ठापना

गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणेशमूर्ती प्रतिष्ठापना

मनमाड । प्रतिनिधी Manmad

विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाचा सर्वत्र जल्लोष होत असतांना सर्वधर्मीय चाकरमान्यांनी देखील मनमाड-मुंबई गोदावरी एक्स्प्रेसमध्ये (Manmad-Mumbai Godavari Express) दरवर्षाप्रमाणे यंदा देखील भक्तीभावपूर्ण वातावरणात श्री गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. यावेळी रेल्वे स्थानकावर गणपती बाप्पा मोरयाचा एकच जल्लोष करण्यात आला. गत 27 वर्षांपासून हिंदू-मुस्लिम चाकरमाने श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून राष्ट्रीय एकात्मता जोपासत आहे.

- Advertisement -

गोदावरी एक्स्प्रेसच्या पास बोगीला आकर्षक पद्धतीने सजवून त्यात वीज वाचवा, रेल्वे क्रॉसिंग करू नका, कायदा आणि नियमांचे पालन करा असे संदेश देणारे फलक लावण्यात येवून जनजागृती केली गेली. सकाळची आरती मनमाडला तर सायंकाळची आरती नाशिकरोडला केली जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष राहुल शेजवळ, उपाध्यक्ष जावेद शेख यांनी दिली.

मनमाड, नांदगाव, लासलगाव, निफाड येथून नाशिक, मुंबईला अपडाऊन करणारे हिंदू-मुस्लिम चाकरमान्यांनी 1996 साली गोदावरी एक्स्प्रेस गणेश मंडळाची स्थापना केली. तेंव्हापासून अविरत या एक्स्प्रेसमध्ये श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. करोनामुळे सर्व रेल्वे बंद होत्या त्यावेळी यार्डमध्ये उभी असलेल्या गोदावरी एक्स्प्रेसमध्ये श्रीमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. आरती झाल्यावर गाडीतील सर्व प्रवाशांना प्रसाद वाटप केला जाणार आहे.

गणपती बाप्पा रोज मनमाड-मुंबई पुन्हा मनमाड असा सुमारे 500 किमीचा प्रवास करणार आहे. या गणेशोत्सवाचे संयोजन अध्यक्ष राहुल शेजवळ, उपाध्यक्ष जावेद शेख, सचिव निखिल परदेशी, ललित धांदल. मंगेश घोरपडे, प्रवीण नागरे, जावेद शेख, प्रवीण व्यवहारे, मुकेश निकाळे, नरेंद्र खैरे, विवेक शेजवळ, स्वप्नील म्हस्के, डॉ. मिटके, ऱाजेंद्र भडके, रोहित मुलचंदानी, मच्छिंद्र सांगळे, मंगेश जगताप, संदीप आढाव, संदीप व्यवहारे, गोरख खरें, गोरख सांगळे, शेखर थोरात, धनंजय आव्हाड, सुरेश चौधरी आदींनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या