एमबीबीएसमध्ये नाशिकच्या सुलतानला ९, तर मानसीला ७ सुवर्णपदके

0

नाशिक, दि,15, प्रतिनिधी 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 17 व्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदकांवर नाशिकचेच वर्चस्व दिसून आले. यात डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचा एमबीबीएसचा विद्यार्थी सुलतान मोईउददीन शौकतअली या विद्यार्थ्यांने विविध विषयात 9 तर याच महाविद्यालयाची मानसी मयुर गुजराथी या विद्यार्थीनीला 7 सुवर्णपदक प्रदान करण्यात आली.

विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी येथे झालेल्या या समारंभासाठी कुलपती गिरीश महाजन अध्यक्षस्थानी होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे संचालक प्रा डॉ रंदीप गुलेरिया व सन्माननीय अतिथी म्हणून टाटा मेमोरिअल हॉस्पीटलचे संचालक डॉ राजे्ंरद बडवे, कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर, प्रतिकुलगुरू डॉ मोहन खामगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. सु

वर्ण पदकांची घोषणा सुरू झाल्यानंतर डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी सुलतान मोईउददीन शौकतअली यास डॉ. दयानंद , स्वर्गीय व्यंकटेश जामकर, राजेबहाददूर हार्ट फाउंडेशन,डॉ एस एम पाटणकर, स्वर्गीय श्रीराम खशाबा बाकरे, डॉ अजन्येतू , गोजरबाई रामराव भामरे, डॉ शिरीष के भन्साळी, डॉ विनायक चितळे हे सर्व सुवर्णपदक तर जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन मुंबई यांच्याकडून 10 हजार रूपये रोख अशी एकूण 9 पारितोषिक देण्यात आले.

 

तर याच महाविद्यालयाची एमबीबीएसची विद्यार्थीनी मानसी मयुर गुजराती हिस क्रांतीज्योती डॉ रखमाबाई मेमोरिअल, शामराव अलीयस,नानासाहेब चौधरी, डॉ कामलताई देशमुख, स्वीर्गीय विजयादेवी फडतारे, डॉ. सुधाकर साने, डॉ ग.ज.परांजपे अशी एकूण 7 सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

या दोन्ही विद्यार्थ्यांची नावे पुकारली जात असतांना विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी सभागृहात एकच जल्लोष केला.

यावेळी या विद्यार्थ्यांची दखल घेवून त्यांच्या यशाचे गमक जाणून घेणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. दरम्यान या विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार या देखील सोहळयाप्रसंगी उपस्थित होत्या.

गुडबाय 2017 (संगमनेर) : समस्यांनी शेतकर्‍यांना सतावले!

0
शेती उत्पादनांना योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी शेतकरी असे रस्त्यावर उतरले

संगमनेर पंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व, तर जि.प. मध्ये संगमनेरला कृषी सभापतिपद उशिरा झालेल्या पावसाने संगमनेर

तालुक्याला दिलासा दिला. दोन्हीही धरणं भरल्याचा आनंद असला तरी सुलतानी संकटांनी बळीराजाची पाठ मात्र सोडलेली नाही. शेतकरी संपाची उमटलेली तीव्र प्रतिक्रिया जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्वच गटात रंगलेले डावपेच सरपंचपदाकरिता प्रथमच झालेली निवडणूक अशा सर्वच घटनांमुळे संगमनेर तालुका वर्षभर चर्चेत राहिला. मात्र शेतकर्‍यांची कर्जमाफी गावागावाचे प्रश्‍न आणि सामान्य माणसाच्या समस्या वर्ष सरत असले तरी तशाच राहण्याची शक्यता आहे.

गणेश भोर

मागील तीन वर्षे संगमनेर तालुक्याने दुष्काळाचा मोठा सामना केला. चारा छावण्यांपासून ते पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यातच प्रशासन अडकले होते. यंदा मात्र उशिरा झालेल्या पावसाने का होईना तालुक्याला थोडासा दिलासा मिळाला. भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरणं भरलेली असल्याने वर्षभरातील आवर्तनाचे मोठे लाभ तालुक्यातील शेती क्षेत्राला मिळतील अशीच एकूण सकारात्मक परिस्थिती आहे. मात्र बळीराजा शेतामध्ये उत्पादन घेत असला तरी योग्य तो भाव न मिळणे ही मोठी समस्या या वर्षात शेतकर्‍यांना सतावत राहिली.
कर्जमाफी योजनेचा लाभ सरसकट नसल्यामुळे या योजनेचा लाभ नेमका कोणत्या शेतकर्‍यांना होणार याचे उत्तर मिळू शकत नाही. याच कारणाने शेतकरी संपाची तीव्र प्रतिक्रिया तालुक्यात उमटली. शेतकरी मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाले. तालुक्यात प्रथमच उत्स्फूर्तपणे शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. सलग चक्काजाम आंदोलनांनी तालुका ढवळून निघाला. शेतकर्‍यांचा रस्त्यावरील ठिय्या, यातून शेतकर्‍याचे दुःख समोर आले.
संगमनेर तालुक्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. उसालाही चांगला भाव मिळावा ही रास्त अपेक्षा असली तरी अद्यापही याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.
राजकीय पार्श्‍वभूमीवर मागील वर्षभरात वेगवेगळ्या निवडणुकांमधून संगमनेर तालुक्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. जिल्हा परिषद निवडणुकीत तालुक्यातील सहाही गटात चुरस निर्माण झाली. तरीही माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व सिद्ध झाले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी संगमनेर तालुक्यावर फारच लक्ष केंद्रित केले होते. तालुक्यातील सर्व थोरात विरोधकांनी एकत्रित येऊन केलेल्या गटाला पालकमंत्र्यांचे समर्थन होते. पण राज्यात सत्ता असूनही पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनांचा कोणताही परिणाम मतदारांवर झाला नाही. उलट या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेला संघर्ष हा गालबोट लावणारा ठरला.
या निवडणुकी दरम्यान थोरात-विखेंचा पारंपरिक संघर्ष आरोप-प्रत्यारोपांनी चांगलाच गाजला. जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी मात्र दोन्ही गट पुन्हा एकत्र आले. झालेल्या वाटाघाटीत संगमनेर तालुक्याला एक सभापती पद मिळू शकले. ही जमेची बाजू म्हणावी लागेल.
ग्रामपंचायत निवडणुकीतही यंदा प्रथमच लोकांमधून सरपंच निवडण्याची प्रक्रिया राबविण्यात आल्याने सर्वाधिक युवक कार्यकर्ते या निवडणुकीत उतरल्याचे पाहायला मिळाले. गाव पातळीवरील गटातटाच्या निवडणुकीत कुणाचा विजय तर कुणाचा पराजय झाला. महत्त्वाच्या गावांमध्ये झालेला पराभव हा गाव पातळीवरील नेत्यांना धक्का देणारा ठरला, ही बाब महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल.

विविध मागण्यांसाठी स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदारांचा संप
बोटा शिवारात माळवाडी, केळेवाडी, आंबीदुमाला, कुरकुटवाडी येथे भूकंपाचे सौम्य धक्के, तहसीलदार सोनवणे यांनी बोटा तलाठी कार्यालयात काढली रात्र
स्वच्छ सर्वेक्षण 2018 अभियानांतर्गत संगमनेर नगरपालिकेच्या बॅ्रण्ड अम्बॅसिडर म्हणून ‘जय मल्हार’ मालिका फेम अभिनेत्री प्रियंका वामन यांची निवड
संगमनेर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी हिरालाल पगडाल, योगेश जाजू, रिजवान शेख यांची निवड
अमृतवाहिनीच्या मेधा महोत्सवात अभिनेत्री मानसी नाईकची हजेरी तर आयपीएस अधिकारी विश्‍वास नांगरे पाटील यांचे व्याख्यान
पिंपळगावखांड धरणाच्या आवर्तनासाठी घारगाव येथे शेतकर्‍यांचे आंदोलन
लायन्स प्रांतपालपदी गिरीश मालपाणी यांची निवड
कृषी पंपांचे कनेक्शन तोडल्याने साकूर सबस्टेशनला शेतकर्‍यांचा घेरावो, अधिकार्‍यांना कोंडले
वडगावपान फाटा येथे संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने रास्ता रोको
सत्यजित तांबेंच्या पुढाकाराने हिवरगावपावसा टोल नाक्यावर स्थानिकांना टोलमध्ये सूट
टोलमाफीच्या आंदोलनाप्रकरणी कृषी सभापती अजय फटांगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने शीतल हगवणे हिला घेतले दत्तक
समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या विरोधात हरिश्‍चंद्र फेडरेशनची न्यायालयात धाव
परराज्यातील तीन लाख 70 हजार रुपयांची दारू संगमनेरात जप्त
बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणी मोंटो कार्लो कंपनी विरोधात खंडपीठात याचिका
कौठे मलकापूर येथे रविंद्र बिरोले यांच्या खासगी ‘युटेक शुगर’चे नामदार नितीन गडकरींच्या उपस्थित प्रारंभ 

कृषी – केळेवाडी येथील सखाराम पाडेकर यांनी सौर ऊर्जेवर फुलविली डाळिंब बाग
मालदाड शिवारात इफ्को कंपनीकडून एक लाख वृक्षांची लागवड
थोरात कारखान्याचा राजहंस द्रवरुप जैविक खत निर्मिती प्रकल्प कार्यान्वित
उसावर बुरशीजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी थोरात कारखान्याकडून उपाययोजना
निमोण, पिंपळे शिवारात जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्याकडून पाहणी
संगमनेर महाविद्यालयात शासनमान्य माती परीक्षण प्रयोगशाळा कार्यान्वित
संगमनेर दूध संघाकडून आनंदवाडी येथे वसुबारस व गायपोळा साजरा
साईधारा डेअरीतर्फे दूध उत्पादक शेतकर्‍यांचा गौरव
सर्वोत्तम दुधाच्या दर्जेसाठी ‘श्रमिक मिल्क’चा पुढाकार
आ. थोरातांच्या कार्यालयातून यशवंतराव होळकर महामेष योजनेची सुविधा मेंढीपालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन
संगमनेर बाजार समितीमध्ये शेतमाल तारण योजना सुरू
आश्‍वी खुर्द आठवडे बाजाराला जागतिक बॅँकेच्या शिष्टमंडळाची भेट

क्राईम – हंगेवाडी ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा
स्टेट बँकेचे एटीएम फोडून 26 लाख 30 हजार लुटले
पोखरी बाळेश्‍वर येथे दोन मुलांची हात्या करुन पित्याची गळफास घेऊन आत्महत्या
चंदनापुरीचे तत्कालीन ग्रामसेवक युवराज देशमुख यांच्याविरुद्ध अपरातफरीप्रकरणी गुन्हा दाखल
गर्भपात प्रकरणी संगमनेरच्या डॉ. निघुते हॉस्पिटलवर वैद्यकीय पथकाचा छापा
संगमनेर पोलिसांकडून 3400 किलो गोमांसासह आठ लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त
अपसंपदा जमविल्याप्रकरणी सेवानिवृत्त लोकसेवक सूर्यभान झोडगे याच्यासह कुटुंबीयांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
सावत्र मुलीवर अत्याचार करणार्‍या बापास जन्मठेपेची शिक्षा
पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना कुरण येथे जमावाकडून मारहाण
कोळवाडे येथे 22 लाख 35 हजारांचा पानमसाला, तंबाखू जप्त

राजकारण...निधीबाबत चुकीची वक्तव्ये करणार्‍या विखेंच्या मुख्यमंत्र्यांबरोबर मैत्रीचा काय फायदा?-आ. थोरात
काँग्रेस बंडखोरांचे नेते उमेदवारांची निशाणीही सांगू शकले नाहीत – ना. विखे पाटील
दहशतीचे राजकारण टिकत नाही-आ. थोरात
निळवंडेच्या कामात योगदान नसणार्‍या विखेंचे आरोप म्हणजे दुष्काळ ग्रस्तांची चेष्टा – आ. तांबे
गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस छाननी समितीच्या अध्यक्षपदी आमदार बाळासाहेब थोरात
काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी बाबा ओहोळ, शहराध्यक्षपदी विश्‍वास मुर्तडक
बोटा गटात काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
धांदरफळ खुर्द ग्रामपंचायतमध्ये सभापती निशाताई दत्तात्रय कोकणे गटाचा दारुण पराभव
संगमनेर जि. प. थोरात गटाला 8 जागा तर विखे गटाला केवळ आश्‍वी, शिवसेना 2, भाजप 1, बोटा गटात परिवर्तन
गोकुळ दिघेंचा शिर्डी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा नाट्य
संगमनेरात कन्हैयाकुमारची वादळी सभा

सहकार – थोरात साखर कारखान्याला राष्ट्रीय कार्यक्षमतेचा पुरस्कार
संगमनेर बाजार समितीला उत्कृष्ट बाजार समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार
थोरात कारखान्याचे 100 रुपयांप्रमाणे ऊस पेमेंट व ठेवीवरील व्याज 6 कोटी 76 लाख 36 हजार 720 रुपये बँकेत वर्ग
राजहंस दूध संघाकडून एक रुपया 70 पैसे रिबेट
थोरात साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी इंद्रजित थोरात
संगमनेर बाजार समितीवर तज्ज्ञ संचालक म्हणून शिवसेनेचे संजय फड व भाजपाचे दादासाहेब गुंजाळ यांची नियुक्ती
सहकारी दूध संघांना शासनाने प्रतिलिटर 5 ते 7 रुपये अनुदान द्यावे – आ. थोरात

थोरात साखर कारखान्याची सुवर्णमहोत्सवी वार्षिक सभा

बिरेवाडीच्या साईबाबा पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा

घुलेवाडीच्या धनगंगा पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा

शिक्षण – अमृतवाहिनीच्या ‘मेधा’ नियतकालीकास पुणे विद्यापीठाचा पुरस्कार
प्राथमिक शिक्षक बँकेच्या कारभाराविरोधात गुरुकुल, सदिच्छा, पुरोगामी मुख्याध्यापक संघटनांचे धरणे आंदोलन
संगमनेर महाविद्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय रासेयो शिबिराचे आयोजन
जयहिंद आश्रमशाळा कोळवाडेचे केंद्रस्तरीय विविध स्पर्धांत सुयश
अमृतवाहिनी तंत्रनिकेतनच्या प्रोजेक्ट स्लायडर इरिगेशन सिस्टीमला मिळाले पेटंट
अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कांदा काढणी यंत्राची ‘तिफण’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
धु्रवच्या स्वराली थोरात आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम
आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रयत्नामुळे पात्र शाळांना अनुदान
श्रमशक्ती शैक्षणिक संकुलात नामदार महादेव जानकर यांनी दिले योगाचे धडे
धु्रवच्या सोहम धुमाळची राज्य क्रिकेट संघात निवड
‘अमृतवाहिनी’ विद्यार्थ्यांनी बनविली सौरऊर्जेवर चालणारी कार
संगमनेर महाविद्यालयाच्या रासेयो विभागास राज्यस्तरीय पुरस्कार

सामाजिक – रोटरी नेत्र रुग्णालयाकडून रक्तदान शिबिर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
बाळेश्‍वर देवस्थानला थोरात कारखान्याकडून स्वागत कमान
निर्भया मॉर्निंग वॉकचे आयोजन
शाडूच्या गणेशमूर्तींना संगमनेरात उत्तम प्रतिसाद
चंदनापुरीत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आली.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 13 मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मदत निधी
संगमनेर नगरपालिकेकडून प्रवरा नदीपात्रात राबविले स्वच्छता अभियान
साईबाबा हॉस्पिटलच्या पुढाकाराने 112 नेत्र रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
एसएमबीटी रेसिडेन्सीमुळे अमृत उद्योग समूहातील अनेकांच्या घरांचे स्वप्न साकारणार
खळी गावात 70 वर्षांनंतर महामंडळाच्या लालपरीचे आगमन
राजस्थान युवक मंडळ व गीता परिवाराच्यावतीने जाणता राजा महानाट्याचा यशस्वी प्रयोग
रोटरी नेत्र रुग्णालयाचे लोकार्पण

आरोग्य – आमदार थोरात यांच्या यशोधन कार्यालयात स्वतंत्र आरोग्य कक्ष सुरू
जोर्वेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाचा शुभारंभ
संगमनेर खुर्द येथील कचरा प्रोसेसिंग प्लॅण्टला स्थानिक रहिवाशांचा विरोध
कनोलीत डेंग्यूचे तीन बळी
ना. शालिनीताई विखे व विश्‍वजीत माने यांची आश्‍वी आरोग्य केंद्राला अचानक भेट

खेळ – अल्ट्रा सायकलिंगमध्ये संगमनेरच्या डॉ. संजय विखे, निलेश वाकचौरे, विजय काळे, यांनी डेक्कन क्लीफ हँगर’ हे 643 कि. मी. चे अंतर 32 तासांत पूर्ण केले.
श्रीलंका येथे होणार्‍या स्टुडंट ऑलिम्पिक इंटरनॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी रोहिणी कांदळकर हिची निवड
राष्ट्रीय जंपरोप स्पर्धेत ध्रुवच्या स्पर्धकांचे सुयश
मालपाणी हेल्थ क्लबच्या 12 सदस्यांनी पूर्ण केली पुणे मॅरेथॉन

 

 

 

‘पीयूष शुगर’समोर ऊस उत्पादकांचे आंदोलन

0

नेवासा तालुक्यातील शेतकरी आक्रमक; फसवणुकीचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील वाळकी येथील पीयूष शुगर या साखर कारखान्याने फसवणूक केल्याचा आरोप नेवासा तालुक्यातील उस उत्पादकांनी केला आहे. याच्याच निषेधार्थ शेतकरी संघटना व मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 18) सकाळपासून कारखान्यासमोर शेतकर्‍यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना शेतकरी संघटनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सचिन चोभे म्हणाले की, पाण्याअभावी नगर तालुक्यात उसाचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळेच येथील पीयूष शुगर हा खासगी साखर कारखाना नेवासा, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, राहुरी व पाथर्डी आदी तालुक्यांतील उसावर चालविला जातो. मात्र, यंदा या कारखान्याने मागील वर्षी 2500 रुपयांचा भाव दिला होता.
यंदाही मागील वर्षीपेक्षा किमान 50 रुपये जादा भाव देण्याचे आश्वासन देऊन उस आणला होता. मात्र, आता फक्त 2200 रुपये प्रतिटन भाव देण्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच 48 दिवसांपासूनचे पेमेंटही कारखान्याने जमा केलेले नाही. त्यामुळेच 15 दिवसांत पैसे जमा न करून या कारखान्याने शेतकरी बांधवांची फसवणूक करतानाच सरकारी नियम धाब्यावर बसविला आहे.
याच फसवणुकीमुळे साखर संचालनालयाने या कारखान्यावर नियमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र, सत्ताधारी भाजपा नेत्यांच्या वरदहस्ताने चालणा-या या कारखान्यालाच साखर आयुक्तालयाने अभय दिले आहे. सरकारी कृपेने मोकळे रान मिळाल्यानेच हा कारखाना शेतकर्‍यांची पिळवणूक करीत आहे. याविरोधात उग्र आंदोलन पुकारतानाच प्रसंगी गव्हाणीत आत्मदहन करण्याचीही शेतकरी बांधवांची भावना आहे.
याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून त्यांच्या पक्षाच्या छत्रछायेखाली सुरू असलेल्या कारखान्याने केलेल्या फसवणुकीबद्दल कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी रवींद्र आगळे यांनी केली आहे. यावेळी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे, विजय निकम, संदीप लंघे, अनिल पोटे, सतीश पोटे, महेश कदम, दत्तात्रय लांडे, विनोद पोटे, अरुण देशमुख, बाबासाहेब निकम, बाबासाहेब वाकळे, आंबादास घुले यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

…तर आंदोलन पेटेल : दहातोंडे
संभाजी दहातोंडे म्हणाले की, शेतकर्‍यांवर अन्याय होत असतानाही सरकार व प्रशासन ढिम्म आहे. परिणामी पीयूष शुगर कारखान्याकडून शेतकर्‍यांची लूट केली जात आहे. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. यावर तातडीने न्याय न दिल्यास हेच आंदोलन हिंसक होऊन पेटेल. याची जबाबदारी कारखाना प्रशासनाची राहील.

कारखान्यावर गुन्हा दाखल करा : चोभे
सचिन चोभे म्हणाले की, कारखाना प्रशासन उतारा कमी येत असल्याचे कारण देऊन लूट करीत आहे. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. तसेच 15 दिवसांत पेमेंटही जमा केलेले नाही. त्यामुळेच याप्रकरणी साखर आयुक्तांनी कमी उतारा येण्याच्या प्रकरणाची चौकशी करतानाच कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.

दोघा रोडरोमिओंची सिनेस्टाईल धुलाई

0

वडगावपान फाट्यावरील प्रकार

तळेगाव दिघे (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील वडगावपानफाटा येथील शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन परिसरात धूमस्टाईलने मोटारसायकल चालवून विद्यार्थिनींना त्रास देत छेड काढणार्‍या दोघा रोडरोमिओंची सिनेस्टाईल धुलाई करण्यात आली. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने रोडरोमिओ चांगलेच धास्तावले. सिनेस्टाईल धुलाई केलेल्या दोघाही रोडरोमिओंना ग्रामस्थांनी अखेर पोलिसांच्या हवाली केले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थिनींना त्रास देण्याचे व छेड काढण्याचे प्रकार सातत्याने घडू लागले आहेत. मर्यादेपोटी विद्यार्थिनी तक्रार करीत नाहीत. त्याचा फायदा टुकारगिरी करणारे घेत आहेत. आपले दिवटे गावात काय करतात, याची खबर त्याच्या आई-वडिलांना नसते. शाळा सुटल्यावर धूमस्टाईलने मोटारसायकल चालवून शिट्या मारीत विद्यार्थिनींना त्रस्त करण्याचा प्रकार वडगावपान फाटा परिसरात सुरू होता. हा प्रकार स्थानिक युवक व पदाधिकार्‍यांच्या कानावर काही विद्यार्थिनींनी घातला.

त्यांनी पाळत ठेवून सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कोकणगाव येथील 19 व 20 वर्षे वयाच्या दोघा रोडरोमिओंना मोटारसायकलसह पकडले. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पाठलाग करून पकडण्यात आले. जमलेल्या जमावाने त्यांना सिनेस्टाईल यथेच्छ चोप दिला. याबाबत काहींनी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी दोघाही रोडरोमिओंना संगमनेर तालुका पोलिसांच्या हवाली दिले. हा प्रकार बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. विद्यार्थिनींची छेड काढणार्‍यांना असाच धडा शिकविला जाईल, असे एका स्थानिक युवकाने घटनेची माहिती देताना सांगितले. या प्रकाराने रोडरोमिओ चांगलेच धास्तावले असून घडल्या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.

रोडरोमिओ रडारवर! –
शालेय व महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थिनींना त्रास देत रोडरोमिओगिरी करणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. विद्यार्थिनींनी याबाबत तक्रार केल्यास त्यांचा बंदोबस्त केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

कोरठणला सोमवती उत्सवानिमित्त हजारो भाविकांनी घेतले खंडोबाचे दर्शन

0
पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबा मंदिराचा सोमवती पर्वणी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त पालखी छबिन्याची निघालेली मिरवणूक
पारनेर (प्रतिनिधी) – सोमवती अमावास्या पर्वणी उत्सवात काल राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या नगर जिल्हातील पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबाचे दर्शन घेऊन भाविकांनी कुलधर्म व कुलाचार केला. पहाटे श्री खंडोबा स्वयंभू मूर्तीला गंगास्नान घातल्यानंतर श्री खंडोबाचा अभिषेक पूजा महाआरती करण्यात आली. यानंतर भाविकांना श्री खंडोबाचे दर्शन खुले करण्यात आले.
सकाळ पासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सकाळी 10 वा पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून खंडोबा उत्सव मूर्तीची पालखीतून मंदिरातून टाक्याचा दरा येथे गंगास्नान साठी पालखी सोहळा, छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, सचिव महेंद्र नरड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, चंद्रभान ठुबे, मनीषा जगदाळे, किसन धुमाळ, अमर गुंजाळ, सुरेश सुपेकर, किसन मुंढे या विश्वस्तांसह बन्सी ढोमे, रामदास मुळे, उपसरपंच बाळासाहेब पुंडे, महानगर बँकेचे संचालक सुरेश ढोमे, शांताराम खोसे, जालिंदर खोसे यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ढोल ताशाच्या गजरात व लेझीमच्या डावात सदानंदाचा येळकोट, जय मल्हारच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. लंगर तोडल्यावर भाविकानी पालखीवर भंडारा खोबर्‍याची उधळण केली. यावेळी पालखी छबिना पुढे भाविकांनी ओलांडा घेतला व पालखी खालून प्रदक्षिणा घातली. सकाळी 11 च्या दरम्यान पालखी मिरवणूक हजारो भाविकासह टाक्याचा दरा येथे आल्यावर उत्सव मूर्तीचे पंचामृताने ब्रम्ह वृंदाच्या मंत्र घोषात पूजन करण्यात आले व गंगास्नान घालण्यात आले. त्याच वेळी भाविकांनी आपल्या घरातील टाक स्वरूपातील देवांनाही गंगास्नान घातले व देवाची भेट घडवली.
‘कोरठण खंडोबाच्या नावानं चांगभलं’ या जय घोषाने दरी दुमदुमून गेली. यानंतर सामूहिक तळी भांडार झाला. महाआरती झाल्यावर मिरवणूक मंदिरात परत आली. सकाळी 11 वा पासून भाविकांना आमटी भाकरीचा महाप्रसाद शिरूर तालुक्यातील औरंगापूर येथील भाऊसाहेब डुकरे, रामदास डुकरे, भिमाजी डुकरे, श्रीपत घुले, बबन डुकरे, चिमाजी डुकरे, सोपान थिटे, दत्तू थिटे, भास्कर डोंगरे (अणे ) यांच्या तर्फे देण्यात आला.
तर भाकरी पंचक्रोशीतील महिलांनी घरून करून आणल्या होत्या, महाप्रसाद वाटपासाठी जय मल्हार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहकार्य केले. दर्शन व्यवस्था क्रांती शुगर कारखानच्या सुरक्षा पथकाने यशस्वी पार पाडली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवस्थान समितीकडून भाविकांना पिण्याचे पाणी दर्शन व्यवस्था वाहनतळ आदी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.

पोलीस निरीक्षक ओमासे यांच्यावर कारवाई व्हावी : शेवगाव बंद व रास्ता रोको

0
नगरसेवक आहुजा यांना शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ शेवगाव शहरात सर्व पक्षीयांच्यावतीने कडकडीत बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. (छाया : भागवत बागडे)

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – भाजप जिल्हा उपाध्यक्ष व शेवगाव नगरपरिषदेचे नगरसेवक अशोक आहुजा यांना अपमानास्पद वागणूक देणारे शेवगावचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करून व त्यांना निलंबीत करावे या मागणीसाठी आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलनही केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवथरे यांनी पोलीस निरीक्षक ओमासे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून या प्रकाराची योग्य ती चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल वरिष्ठांना सादर करू, असे आश्वासन आंदोलक कार्यकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

शनिवारी नगरसेवक अशोक आहुजा हे शहरातील चोर्‍या व रात्रीची गस्त यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. तेथे काही कार्यकर्त्यांचे भांडण सुरू होते. ते मिटविण्यासाठी आहुजा यांनी प्रयत्न केला असता पोलीस निरीक्षक ओमासे यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, असे नगरसेवक आहुजा यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांची भेट घेऊन ओमासे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. शहरातही आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत याच मागणीसाठी शेवगाव बंदची हाक दिली तसेच रास्ता रोको आंदोलन केले.

हे आंदोलन चालू असताना भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, भीमराज सागडे, दिनेश लव्हाट, उमेश भालसिंग, अ‍ॅड. अविनाश मगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख भारत लोहकरे, नितीन दहिवाळकर, नगरसेवक शब्बीर शेख, विकास फलके, नंदू मुंढे, युसूफ शेख, दत्ता फुंदे यांची भाषणे झाली. आंदोलनात युवक नेते अजिंक्य लांडे, नगरसेवक कमलेश गांधी, अजय भारस्कर, उमर शेख, कृष्णा ढोरकुले, रवींद्र सुरवसे, राजाभाऊ लड्डा, तात्यासाहेब लांडे, अमोल घोलप, अरविंद देशमुख, ताराचंद लोढे, विनोद मोहीते, दिगंबर काथवटे, साईनाथ आधाट, प्रदीप मेहेर, शाम सारडा यांच्यासह व्यापारी, नागरिक सहभागी झाले होते.

संबंधित अधिकार्‍याला निलंबीत करावे किंवा त्यांची येथून त्वरित बदली करावी यासाठी हे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेण्यासाठी उद्या नागपूर येथे जाणार आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष, खासदार, आमदारांची उद्या भेट घेणार आहेत.

याबाबत कारवाई न झाल्यास तालुकयातील भाजपचे सर्व पदाधिकारी आपल्या पदाचे राजीनामे देऊन पुन्हा आंदोलन करणार असल्याचे नगरसेवक कमलेश गांधी यांनी सांगितले. या आंदोलनामुळे येथे मोठी वाहनांची मोठी कोंडी झाली होती. यावेळी परिविक्षाधीन उपअधीक्षक पौर्णिमा तावरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

भाजपचा शिर्डीत जल्लोष

0
शिर्डी(शहर प्रतिनिधी)– गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवल्यानंतर शिर्डीत सोमवारी सायंकाळी भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मिठाईचे वाटप केले.
गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला निर्विवाद यश मिळाले असून त्यानिमित्ताने शिर्डी शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी नगरपंचायत समोर फटाके फोडून मिठाईचे वाटप केले. त्यानंतर भारत सरकारच्या स्वच्छता अभियान अंतर्गत फटाक्यांचा कचरा झाडून गोळा करण्यात आला.
शिवाजी गोंदकर, गजानन शेर्वेकेर, सचिन तांबे, रमेश कोते, रमेश बिडवे, साईराज कोते, किरण बोराडे, महेश सुपेकर, दिनेश सोलंकी, प्रशांत थोरात, आकाश अड्डांगले, हितेश मोटवानी, रजत ठाकुर, अक्षय सुपेकर, अकाश त्रिपाठी, साहिल शेख़, अकाश वाडेकर आदी उपस्थित होते.

पुणे विद्यापीठाची मान्यता असलेल्या साईबाबांच्या अध्यासनाबाबत कुलगुरू डॉ. कळमकरच अंधारात

0
शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईबाबांच्या अध्यासनाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मान्यता दिली असल्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी नुकतेच जाहीर केले होते, मात्र याबाबतची कोणतीही माहिती माझ्यापर्यंत आलेली नसून मी वर्तमान पत्रात वाचल्यानंतर मला कळले असल्याचे धक्कादायक वृत्त पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन कळमकर यांनी सांगितल्याने संस्थान अध्यक्ष डॉ. हावरे यांनी जाहीर केलेल्या अध्यासन मान्यतेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन कळमकर यांनी सोमवारी दुपारी माध्यान्ह आरतीनंतर साईसमाधीचे दर्शन घेतले. त्याप्रसंगी साईबाबा संस्थानचे विश्वस्त मोहन जयकर व माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी त्यांचा उदी शाल देऊन सत्कार केला. साई बाबा संस्थानने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अध्यासनास मान्यता दिली असे जाहीर केले होते याबाबत बोलताना ते म्हणाले माझ्यापर्यंत अध्यासानाबाबत कोणतीही माहिती आली नसून मला वर्तमानपत्रात वाचल्यानंतर कळले असल्याचे सांगितले. त्यामुळे साईबाबांच्या अध्यासनाला एकीकडे मान्यता मिळाल्याचे संस्थान सांगत आहे तर दुसरीकडे विद्यापीठाच्या कुलगुरूंना याबाबत काहीच माहित नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

पद्मभूषण डॉ. विखे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांची उपस्थिती

0
लोणी (प्रतिनिधी) – लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमा निमित्त  रामराव महाराज ढोक यांच्या हरिकिर्तनाचे आयोजन दि. 20 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 9 वा. प्रवरानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रागंणात करण्यात आले आहे.
पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण दि.20 डिसेंबर रोजी तिथीप्रमाणे आहे. विखे पाटील परिवाराच्या वतीने रामराव महाराज ढोक यांच्या किर्तनाचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे. प्रवरानगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या हरिकिर्तनाचे नियोजन लोणी ग्रामस्थ आणि प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रवरानगर येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती स्थानाजवळ हा अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या निमित्ताने रामराव महाराज ढोक नागपूरक यांचे हरिकिर्तन होणार असून, उपस्थित मान्यवर पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांना आदरांजली अर्पण करतील. जिल्ह्यासह राज्यातून या अभिवादन कार्यक्रमासाठी येणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेवून, लोणी ग्रामस्थ आणि प्रवरा परिवाराच्या वतीने उभारलेल्या भव्य सभामंडपात आदरांजलीचा व महाप्रसादाच्या नियोजन करण्यात आले आहे.

पतसंस्था मॅनेजरला लुटण्याचा प्रयत्न

0

नगरपालिकेसमोर घडली घटना

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी शहारातील गुरुमाउली पतसंस्थेचे व्यस्थापक बबलू शिंदे यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील 93 हजार रुपये असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.

या झटापटी दरम्यान रस्त्यावर जवळपास शेकडो नागरिकांनी गर्दी केल्याने तीनही चोरट्यांनी मोटारसायकलवरून पलायन केले. नगरपालिकेसमोरच ही घटना दुपारी 4.15 वाजण्याच्या सुमारास घडली.

काल दुपारी गुरूमाउली पतसंस्थेचे व्यवस्थापक बबलू खंडू शिंदे हे 93 हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग घेऊन मोटारसायकलवरून शिवाजी रोडने जिल्हा बँकेत भरणा करण्यासाठी चालले होते. त्यावेळी नगरपालिकेसमोर विनानंबर मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांना कट मारला. त्यानंतर शिंदे यांच्याशी वाद सुरू करून त्यांच्यापैकी एकाने शिंदे यांच्याकडील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.

मात्र शिंदे यांनी बॅग देण्यास नकार दिल्याने त्यांनी शिंदे यांना बेदम मारहाण करून जखमी केले. मात्र याचवेळी परिसरातील शेकडो नागरिकांनी गर्दी केल्याने या हल्लेखोर तरुणांनी मोटारसायकरून पळ काढला. दरम्यान जखमी शिंदे यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शहरातील गर्दीच्या ठिकाणी दिवसा अशा घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत शहर पोलिसांनी बबलू शिंदे यांचा जबाब नोंदविला आहे. त्यानुसार पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

 

Social Media

22,056FansLike
4,612FollowersFollow
286SubscribersSubscribe
error: Content is protected !!