सत्तेचे पत्ते आज उघडणार

Email This Post

झेडपी अध्यक्षाची आज निवड, शालिनीताई विखेंना तिसर्‍यांदा संधी की राजकीय धक्का?

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज (मंगळवारी) हा निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्यासाठी दोन्ही काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राजकारणात जोपर्यंत निवड जाहीर होत नाही, तोपर्यंत काही खरे नसते. यामुळे जिल्हा परिषदेवरील सत्तेचे पत्ते उघड करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. यात काँग्रेसच्या शालीनीताई विखे यांना तिसर्‍यांदा संधी मिळणार हा खरा प्रश्‍न आहे.
फेबु्रवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक 23 जागा जिंकत काँग्रेस पहिल्या स्थानावर आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादीच्या 18 जागा आहे. भाजपकडे 14, सेनेकडे 7, माजी आ. शंकरराव गडाख यांच्याकडे 5, अपक्ष 2, कम्युनिष्ट पक्षाचे 1 आणि महाआघाडीचे 2 असे 62 सदस्य निवडून आलेले आहेत. जिल्हा परिषदेेत दोन्ही काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यक्षपद काँग्रेसला आणि दोन समित्या तर उपाध्यक्षपदासह दोन समित्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहेत.
जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी सोमवारी दिवसभर नगरसह जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. दिवसभर कोणत्या पक्षाकडून कोणत्या पक्षाला ऑफर देण्यात आली. अध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये वाद उफाळून येणार का? प्रदेश पातळवर कोणत्या नेत्याचे वजन आहे. त्याचा फायदा कोणाला कसा होणार यावर चर्चा झडत होती. रात्री उशीरा दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठक होणार होत्या. दरम्यान, सोमवारी सकाळी पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयात भाजपच्या आमदारांसह, प्रमख नेत्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, आ. मोनिका राजळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, चंद्रशेखर कदम, प्रकाश चित्ते, गट नेते जालिंदर वाकचौरे यांच्यसह पक्षाचे सदस्य उपस्थित होते. या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी सर्व शक्यतांवर चर्चा झाली.

 

यात काँग्रेसमधील अध्यक्षपदावरून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वादावर लक्ष ठेवून आहेत. अध्यक्षपदावरून थोरात नाराज झाल्यास त्याचा कसा फायदा घेता येईल, याचे नियोजन भाजपकडून सुरू आहे. काँग्रेसमध्ये होणार्‍या गटबाजीचा फायदा घेऊन कोणत्याही परिस्थितीत सत्तेत येण्याचा डाव भाजपकडून सुरू आहे. मात्र, यात भाजपला कितपत यश येणार हे मंगळवारी सकाळीनंतर दिसणार आहे. ऐनवेळी काही होऊ शकते. भाजपच्या 14 सदस्यांना एकत्रित नगरला मुक्काला ठेवण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बेरड यांनी दिली.
अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या गोटातून माहिती घेतली असता, सर्व पक्षाकडून शिवसेनेला विचारणा झाली असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी कदाचीत आम्हीही सत्तेत राहू असे सेनेच्या एका सदस्याने सांगितले. काँग्रेसमधील दोन्ही गटाने आमच्याकडे संपर्क केला असून याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार सांगण्यात आले.
रात्री उशीरा राष्ट्रवादीच्या मुलाखती सुरू होत्या. जिल्ह्याचे निरिक्षक आ. दिलीप वळसे यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या. यावेळी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, युवक कांँग्रेसचे कपिल पवार आदी उपस्थित होते. तालुकानिहाय झालेल्या मुलाखतीला कर्जत तालुक्यापासून सुरूवात झाली. योवळी उपस्थित नेत्यांनी आणि नूतन जि.प. सदस्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. रात्री उशीरा दोन्ही काँग्रेसचे नेत्यांची एकत्रीत बैठक होणार होती.
…………
राष्ट्रवादीला उपाध्यक्ष पदासह दोन विषय समित्या मिळणार आहेत. या उपाध्यक्षपदावर जिल्हाध्यक्ष घुले यांनी दावा केला असून उर्वरित समित्यासाठी राहुरी आणि कोपरगावमध्ये रस्सीखेच आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा डोळ्या समोर ठेवून राष्ट्रवादी उपाध्यक्षपद आणि विषय समित्यांचे वाटप करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या गोटातून देण्यात आली.
…………..
जिल्हा परिषदेत निवडणुकीत 10 अपक्ष निवडून आलेले आहेत. यात गडाख यांचे 5 सदस्य असून शेवगावमधून हर्षदा काकडे, पारनेरमधून कॉ. आझाद ठुबे यांच्या पत्नी, संगमनेरमधून आ. बाळासाहेब थोरात समर्थक आणि श्रीरामपुरातील महाआघाडीच्या दोघांचा समावेश आहे. या सर्व सदस्यांकडे भाजप आणि काँग्रेकडून चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. हे सदस्य निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहेे.
………….
काँग्रेसचे सदस्यांची मंगळवारी सकाळी नऊ वाजता नगरमध्ये गोपनीय बैठक होणार आहे. त्या ठिकाणी प्रदेश पातळीवरून येणार्‍या अध्यक्षपदाच्या उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात येणार असून त्या ठिकाणी संबंधीत उमेदवाराला मतदान करत निवडून आणण्याचेे आदेश देण्यात येणार आहे. सोमवारी रात्री उशीरा काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक होणार होती.
………….

दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी रात्री दहानंतर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची हुंडेकरी लॉन येथे बैठक पार पडली. यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे निरिक्षक आ. माणिकराव जगताप, जिल्हाध्यक्ष जयंतराव ससाणे, राष्ट्रवादीचे निरिक्षक आ. दिलीप वळसे, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, आ. अरूण जगताप, आ. राहुल जगताप, आ. संग्राम जगताप आ. वैभव पिचड आदी उपस्थित होते. यावेळी दोन्ही कॉग्रेसने एकत्रित जि.प. सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षपदाचा उमेदवार काँग्रेस निश्‍चित करणार असून उपाध्यपदाच्या पदाचा उमेदवार राष्ट्रवादीने ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती जयंत ससाणे आणि चंद्रशेखर घुले यांनी ‘सार्वमत’ला दिली. त्यानंतर एकत्रितपणे सर्व नेते निघुन गेले. मंगळवारी सकाळी 10 वाजता हुंडेकरी येथे राष्ट्रवादचे सदस्य एकत्र येणार असल्याचे घुले यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

*