कोण होणार ‘झेडपी’चा 22 वा अध्यक्ष ? – आज मतदान : जिल्ह्याकडे नजरा

Email This Post

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या 22 व्या अध्यक्षांची निवड आज (मंगळवारी) होणार आहे. आतापर्यंत नगर जिल्हा परिषदेला 21 अध्यक्ष लाभले असून यात सलग पाच वर्षात दोनदा अध्यक्ष होण्याचा मान शालिनीताई विखे यांना मिळालेला आहे. आज होणार्‍या अध्यक्षपदाच्या निवडीत विखे यांना संधी मिळाल्यास अध्यक्षपदावर काम करण्याची संधी त्यांना तिसर्‍यांना मिळणार आहे.

 
1992 ला पंचायत राज्य व्यवस्था आल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही त्रिस्तरीय यंत्रणा अस्तित्वात आल्या. यात जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान दिवंगत शंकरराव काळे यांना मिळाला. 1962 ते 1965 असे पाच वर्षे ते अध्यक्ष होते. त्यानंतर वांबोरीचे रामनाथ वाघ यांना दुसरे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. नगर जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्षपदासह अन्य पदावर काम केलेल्या जिल्ह्यातील अनेक दिग्ज नेत्यांना पुढे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात काम करण्याची संधी मिळालेली आहे. या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून काम केलेले दिवंगत नेते बाळासाहेब विखे यांना केंद्रीय मंत्रीपदापर्यंत मजल मारता आलेली आहे.

 
नगर जिल्हा परिषदेत शालिनीताई विखे यांच्या प्रमाणे दोन वेळा अध्यक्ष होण्याचा मान दिवंगत काळे आणि बाबासाहेब भोस यांना मिळालेला आहे. तर दिवंगत ज्ञानदेव कासार (वाळकी, नगर) यांना दोनदा प्रभारी अध्यक्ष होणाची संधी मिळालेली आहे. सर्वात अध्यक्षपदी विराज मान होण्याची संधी 10 वर्षे दिवंगत काळे यांना मिळालेली आहेत. तर सर्वात कमी म्हणजे अवघा महिनाभराचे अध्यक्ष होण्याचा मान दिवंगत कासार यांना मिळालेला आहे.
डॉ. विमल ढेरे यांच्या रुपाने 1997 ला पहिल्या महिला जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. त्यानंतर 2007 मध्ये शालिनीताई विखे आणि त्यानंतर 2014 ला मंजूषा गुंड या महिलांना जिल्हा परिषदेत संधी मिळाली. आतापर्यंत जिल्हा परिषदेला तीन महिला अध्यक्ष लाभलेल्या आहेत. विद्यमान स्थितीत पुन्हा अध्यक्षपदाच्या स्पर्धेत महिलाच असल्याने यंदाही जिल्हा परिषदेला महिला अध्यक्ष मिळणार आहेत.
नगर जिल्ह्यातील राजकाणाचा राज्याच्या राजकारणावर प्रभाव राहिलेला आहे. या ठिकाणी होणारी राजकीय समिकरणे अनेक वेळा राज्यातील अन्य जिल्ह्यात अवलंबण्यात आलेली आहेत. यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीकडे राज्याचे लक्ष लगाले आहे.
………..
आतापर्यंत झालेले अध्यक्ष
शंकराव काळे, रामनाथ वाघ, यशंवतराव गडाख, ज्ञानदेव कासार, बाबासाहेब पवार, एस.जे. कंटे, अरूण कडू, विमलताई ढेरे, अशोक भांगरे, बाबासाहेब भोस, मिस्टर शेलार, बाबासाहेब भिटे, शालिनीताई विखे, विठ्ठलराव लंघे, मंजूषा गुंड.
………
सभागृहात वांबोरीचे वर्चस्व
जिल्हा परिषदेच्या सभागृहात माजी अध्यक्षांचे फोटा लावण्याची परंपरा आहे. वांबोरी (ता. राहुरी) गावाने जिल्हा परिषदेला दोन अध्यक्ष दिलेले आहे. वाघ आणि भिटे यांच्या रुपाने वांबोरीचे दोन अध्यक्ष नगर जिल्हा परिषदेला लाभले. यासह जिल्हा परिषद अस्तित्वात येण्यापूर्वी असणार्‍या जिल्हा लोक बोर्डाला वांबोरी गावाने दोन अध्यक्ष दिलेले आहेत. त्यांचे फोटो जि.प. सभागृहात आहे. यामुळे जि.प.च्या सभागृहावर वांबोरीचे वर्चस्व असल्याचे दिसून येते.
……………

LEAVE A REPLY

*