जलजागृतीतूनच ‘जलयुक्त’ जळगाव : जलदिंडीने जलजागृती सप्ताहाचा शुभारंभ

Email This Post

जळगाव |  प्रतिनिधी :  जलजागृती सप्ताहाद्वारे जलबचतीचे महत्त्व पटल्याने जलयुक्त शिवार अभियानातील जलसंधारण प्रक्रिया, पाणी वापर, पाण्याचे ऑडीट या संकल्पना जनमानसात रुजवून होणार्‍या जागृतीतूनच खर्‍या अर्थाने ‘जलयुक्त जळगाव’ प्रत्यक्ष साकारता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज येथे व्यक्त केला.

जागतिक जलदिनानिमित्त दि. १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या हस्ते जलपूजन करुन करण्यात आला.

यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, जळगाव पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सु.प्र. सैंदाणसिंग, कार्यकारी अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता आर.एस. विसवे, एस.जे. माने, टी.पी. चिनावलकर, एस. पी. काळे, पी.आर. मोरे, आर. जी. पाटील, एस. सी अहिरे, एस.एफ. गावित, ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक, जलश्री संस्थेच्या स्वाती संवस्तर, जी.एम फाऊंडेशनचे अरविंद देशमुख, पितांबर भावसार, नीर फाऊंडेशनचे सागर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरवातीला दीपप्रज्वलन करुन नंतर तापी, गिरणा, पूर्णा, वाघुर, सुकी या नद्यांच्या पाण्याने भरलेले कलश एकत्रित करुन त्यांचे मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी निंबाळकर म्हणाले की, उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करण्यासंदर्भात प्रबोधन व्हावे, यासाठी जलजागृती सप्ताहाचे आयोजन शासनाने केले आहे.

केवळ पाण्याची बचत हीच बाब या जागृतीत नसून पाण्याचे प्रदुषण होण्यास प्रतिबंध करणे, पाणी वाटपाचे, पाणी वापराचे नियोजन करणे, प्राणी वनस्पती यांच्यासाठी पाण्याची उपलब्धता ठेवणे. पिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पाणी देणे या बाबींचाही अंतर्भाव आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे यंदा जिल्ह्यात टँकरच्या संख्येत घट झाल्याबद्दल समाधान व्यक्त करुन श्री. निंबाळकर म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून होणार्‍या जलजागृतीमुळे जलयुक्त जळगाव करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी कृषि अधिकारी विवेक सोनवणे, कार्यकारी अभियंता टी.पी. चिनावलकर जलश्रीच्या स्वाती संवत्सर, नीर फाऊंडेशनचे सागर महाजन, जीएम फाऊंडेशनचे अरविंद देशमुख, पितांबर भावसार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अधिक्षक अभियंता सु.प्र.सैंदाणसिंग यांनी तर टी.पी. चिनावलकर यांनी आभार मानले.

जलदेवता पूजन आणि जलदिंडी

शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील वरुण देवता मंदिरात आज सकाळी जलपूजन करुन पाच प्रमुख नद्यातील जलकुंभ पूजन करण्यात आले. यावेळी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी नीर फाऊंडेशनचे सागर महाजन, जी.एम फाऊंडेशनचे अरविंद देशमुख, पितांबर भावसार, संत कंवरराम ट्रस्टचे रमेश मतानी, दयानंद विसराणी,. शंकरलाल लखवानी, राजकुमार प्रथ्यानी आदी मान्यवर तसेच संत हरदास विद्यालय, या. दे. पाटील महाविद्यालय प्रतिभा माध्यमिक विद्यालय या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*