सौरउर्जा संचाद्वारे विद्युत पुरवठा योजना : सातपुडा कारखान्याचा उपक्रम

Email This Post

दीपक पाटील यांची माहिती
शेतकर्‍यांचा सहभाग आवश्यक
अनियमीत वीजपुरवठयावर पर्याय

शहादा | ता.प्र. :  शेतकरी बांधवांना शाश्‍वत व नियमित विद्युत पुरवठा उपलब्ध व्हावा, या हेतूने केंद्र व राज्य शासनाच्या सौर ऊर्जा संचाद्वारे विद्युत पुरवठा व कृषी पंप बसविण्याची योजना जाहीर झाली असून, त्याचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी केले आहे.

सातपुडा कारखान्याचे परिसरात फिरत्या पाळीवर ८ तासाचा विद्युत पुरवठा शेतकर्‍यांना कृषी पंपासाठी दिला जातो. किंबहूना शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागतो. पिकास पाणी योग्य वेळेस मिळाले तरच उत्पादन चांगले येते. परंतु विद्युत पुरवठा अनियमित असल्या कारणाने शेतकरी हवालदिल झालेला आहे.

म्हणून सौर ऊर्जा घेऊन आपला त्रास वाचवा व ऊसाचे अधिक आणि इतर पिकांना उत्पादन घेता यावे, यासाठी सातपुडा कारखान्यामार्फत सौर ऊर्जा संच बसविणार्‍या कंपन्यांशी चर्चा करून, ५ वर्षापर्यंत सदर यंत्रणेची देखभाल व दुरूस्ती करण्याचे बंधन घालून, सदर देखभाल दुरूस्ती वेळेवर होण्यासाठी खबरदारी घेण्याची जबाबदारी कारखान्याने स्वीकारली आहे.

कारखान्याच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश सीमेवरील शहादा, तळोदा, नंदुरबार, शिंदखेडा, निझर, सागबारा व खेतीया आदी तालुक्यातील ५४९ गावे आहेत. त्या संपूर्ण कार्यक्षेत्राचा अभ्यास करून, परिसरात एकूण ८९४० विंधन विहीरी (बोअरवेल) व १६८५ उघडया विहीरी आहेत. या सर्व राज्य शासनाच्या अनियमित विद्युत पुरवठयावर अवलंबून आहेत.

मात्र यापुढे सौर ऊर्जा संचाद्वारे विद्युत पुरवठा व कृषी पंप ही अत्यंत प्रभावी योजना आपणासाठी आणली आहे. सौर ऊर्जेपासून विस्तृत जलसिंचन पर्यायाने हरितक्रांती असा पथदर्शी प्रकल्प साकार करण्यासाठी सदर योजने अंतर्गत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन कारखाना व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे. इच्छुक सभासदांनी संबंधित गट ऑफिसला आपली नाव नोंदणी करावी, असेही आवाहन चेअरमन दीपक पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*