चांगले प्रयत्न राज्यभर व्हावेत!

Email This Post

पोलिसांची जनमानसातील प्रतिमा फारशी चांगली का नसावी? या प्रश्‍नाने पोलीस खात्यातील काही मंडळी बरीच अस्वस्थ असावीत. म्हणून पोलिसांची सध्याची प्रतिमा बदलण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्तालय यात आघाडीवर आहे. पोलिसांसाठी व्यायामशाळा (जिम), त्यांच्या अपत्यांसाठी रोजगार कार्यशाळा, पोलीस पत्नींसाठी स्वयंरोजगार शिबिरे, सामूहिक मनोरंजनाची साधने असे अनेक उपक्रम गेल्या काही दिवसांत राबवले गेले आहेत.

यातीलच एक नवा उपक्रम म्हणून पोलीस आणि नागरिकांच्या सहकार्यातून नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात हिरण्य उद्यान बहरले आहे. उघडे बोडके मैदान, वाढलेली काटेरी झुडूपे व भकास वातावरण याला म्हसरूळ पोलीस ठाणेही अपवाद नव्हते. तीच ओसाड जागा आज नयनरम्य उद्यानात रूपांतरित झाली आहे. सप्तरंगी कारंजे व शोभेची झाडे यामुळे पोलीस ठाण्यातील वातावरण आल्हाददायी बनले आहे.

‘आमच्याकडे अनेक जण त्वेषाने तक्रार घेऊन येतात. त्यांना थोडा वेळ उद्यानात बसायला सांगितले की अनेकदा तक्रारदारांच्या मानसिकतेत योग्य बदल झाल्याचे अनुभवास येत आहे, अशी प्रतिक्रिया या ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी नोंदवली आहे. यासाठी पुढाकार घेणार्‍या पोलिसांचे व त्यांना सहकार्य करणार्‍या नागरिकांचे अभिनंदन करायलाच हवे. पोलीसही माणूस आहेत.

ठरवले तर पोलिसी खाक्यातही चांगला बदल घडू शकतो, हा संदेश या घटनांमधून व्यक्त होतो. तथापि असे प्रयत्न अनेक पोलिसांच्या चाकोरीबद्ध वागण्यात बदल घडवतील का हा प्रश्‍न पडावा अशा घटनासुद्धा नियमितपणे उघड होतात. जुन्या नोटा बदलून देण्याच्या निमित्ताने पोलिसांनीच १४ लाख रुपये हडपल्याची घटना नागपूरमध्ये नुकतीच उघडकीस आली आहे. एका व्यापार्‍याच्या २८ लाख रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने पोलिसांनी ही लूट केली. आता त्याबद्दल कारवाई सुरू झाली आहे. अशाच वेगवेगळ्या घटना जागोजागी होतच राहतात.

अनेकदा त्यात तोतये पोलीस पकडले जातात तर कित्येकदा खर्‍या पोलिसांनासुद्धा गजाआड व्हावे लागते. या पार्श्‍वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तालय व म्हसरूळ पोलीस ठाण्याने केलेल्या प्रयत्नांचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. सरकार कोणतेही असो कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्याची जबाबदारी मुख्यत्वे पोलीस खात्याच्या शिरावर असते.

म्हणूनच पोलिसांची प्रतिमा बदलवणार्‍या छोट्या-मोठ्या प्रयत्नांचे अनुकरण राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांकडून केले जावे यासाठी विशेष परिश्रमांची गरज आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाने होत असलेल्या प्रयत्नांची दखल राज्यातील सर्व आयुक्तालयांकडून घेतली जाईल यादृष्टीने आणखी प्रयत्नांची आवश्यकता दुर्लक्षित होऊ नये.

LEAVE A REPLY

*