जगाच्या कल्याणा

Email This Post

परमेश्वराचे दूत आणि मानवाचे सेवक असतात. ते अज्ञानाचा नाश करतात. दीनांची सावली अन् अनाथांची माऊली असणारे संत शुद्ध पुण्याचा उगम असतात. जगाच्या कल्याणासाठी देह कष्टवणारे ते पतीत पावन असतात. फादर फ्रेड सोपेना यांचे जीवन ज्यांनी जवळून पाहिले आहे ते त्यांना संतपण घोषित होण्याची वाट पाहणार नाहीत, कारण ते संतच आहेत.

स्पेनमधील बार्सेलोना या वैभवसंपन्न शहरात जन्म झालेले फ्रेडरिक सोपेना वयाच्या 22 व्या वर्षी भारतात आले आणि वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी येथील मातीत देह ठेवला तो दिवस होता 26 जानेवारी 2017. येशू संघ ही संस्था जगभर आपल्या सेवाभावी कामासाठी लौकिक मिळवलेली संस्था आहे. या संस्थेच्या धर्मगुरुंनी मानवभक्षी, रानटी लोकांनाही माणसात आणले आहे. यासाठी अनेकांना प्राणार्पण करावे लागले आहे. ‘गोव्याचा सायबा’ म्हणून प्रसिद्ध असलेले संत फ्रान्सिस झेविअर येशू संघीय होते. त्यांनीच संत इग्नेशिअस लोयोंला या धर्मगुरुंसोबत 1541 मध्ये येशू संघाची स्थापना केली. क्रांतिकारी पोप म्हणून जगभर ओळख झालेले विद्यमान पोप फ्रान्सिस याच येशू संघाचे सदस्य आहेत.

नाशिक शहरातील होली क्रॉस चर्च, कविवर्य टिळक वाचनालय, बाल येशू प्रार्थना मंदिर आणि सेंट झेवियर्स शाळा येशू संघीय संस्था आहेत. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यातील गावागावांत पोेहोचलेली महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ ही संस्था याच संघामार्फत गेली पन्नास वर्षे सेवा देत आहे. येशू संघीय धर्मगुरू जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन प्रेम आणि सेवा या दैवी मूल्यांचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. धर्मनिरपेक्षता शिकावी ती येशू संघियांकडूनच! अशा या संघात फ्रेडरिक सोपेना यांनी वयाच्या 20 व्या वर्षी प्रवेश केला आणि आपले कार्यक्षेत्र निवडले भारत. 1947 साली वयाच्या 22 व्या वर्षी ते भारतात येऊन दाखल झाले. धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन ठेऊन जगण्याची लढाई हरण्याच्या बेतात असलेल्यांच्या पाठीशी उभे राहायचे. त्यांना सुदृढ करून मुख्य प्रवाहात आणून सोडायचे या जिद्दीने ते कामाला लागले. हिंदी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. मराठी भाषाही ते चांगली बोलत.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अनेक प्रकल्प त्यांनी सुरू केले. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, शाळा, ट्रेनिंग सेंटर्स, शेतकर्‍यांच्या विकासासाठी पाणलोट क्षेत्र निर्माण करण्यासारख्या योजना, बारा महिने रोजगार हमी योजना, महिलांसाठी रोजगार केंद्रे, आरोग्य केंद्रे अनेक ठिकाणी चालू आहेत. या संस्थांची ध्येयधोरणे ठरवणे आणि आर्थिक पाठबळ उभे करणे ही दुहेरी जबाबदारी संस्थेने त्यांच्यावर टाकली होती. ती त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत समर्थपणे पेलली. मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातही डोळ्यांचे पारणे फिटेल असे काम त्यांनी उभे केले आहे. रायगड जिल्ह्यात कातकरी बांधवांसाठी त्यांनी डोंगराएवढे काम उभे केले आहे. सुप्रसिद्ध समाजसेविका म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वैशाली पाटील या त्यांच्या शिष्या. 1990 साली रायगड जिल्ह्यातील तारा परिसरात झालेल्या अपघातात त्यांना डावा पाय गमवावा लागला. त्यांची जिद्द एवढी दांडगी की साडेतीन महिन्यातच जयपूर फूट लावून ते पुन्हा कामाला लागले. फरक इतकाच की आता त्यांचा उत्साह दुपटीने वाढला होता.

पुढे मुंबईला बदली झाल्यावर त्यांनी आपला मोर्चा झोपडपट्टीतील गरीब बांधवांकडे वळवला. त्यांच्यातलेच एक याप्रमाणे ते राहू लागले. संस्थेतील सुखवस्तू जीवन सोडून अंधेरी पूर्व भागातील ‘अचानक’ वस्ती या नावाने ओळखल्या जात असलेल्या बकाल वस्तीत ते राहायला गेले. या कालावधीत मोडून पडलेली अनेक माणसे त्यांनी पुन्हा स्वत:च्या पायावर उभी केली.

जगाच्या कल्याणा संताच्या विभूती
देह कष्टविती परोपकारे।
पोटीभार वाहे, त्यांचे सर्वस्वही साहे।
तुका म्हणे माझे तुम्हा संतापरी ओझे ॥

रंजल्या गांजल्या जिवांचे ओझे फादर सोपेना यांनी अखेरच्या श्वासापर्यंत वाहिले. त्याचा ना भार त्यांना कधी झाला ना विश्रांतीसाठी ते कधी थांबले. सतत 69 वर्षे त्यांनी भारतमातेची आणि भारतमातेच्या लेकरांची अथक सेवा केली. भारताचे नागरिकत्व आपणास मिळावे यासाठी 1986 पासून त्यांची धडपड चालू होती.

अखेर गेल्यावर्षी म्हणजे ऑक्टोबर 2016 ला त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले. नागरिकत्वाचा दाखला हातात पडताच ‘भारत माता की जय’ असा जल्लोष करीत त्यांनी आनंद व्यक्त केला. मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शेखर चण्णे म्हणाले, ‘त्यांच्यासारख्या भारतमातेच्या सेवकाला नागरिकत्व मिळण्यासाठी इतकी वर्षे लागावीत हे एक कोडेच आहे. मान-सन्मान आणि पैसा मिळवण्यासाठी युरोप, अमेरिकेत जाण्यासाठी धडपडणारे भारतीय कोठे अन् वैभवसंपन्न देश आणि सर्वस्वाचा त्याग करून भारतमातेच्या सेवेचा ध्यास घेतलेली फादर सोपेनासारखी माणसे कोठे।’
भारतमातेच्या रंजल्या गांजल्या जिवांना मायेची पाखर घालणार्‍या सोपेना बाबांना विनम्र अभिवादन!

फ्रान्सिस वाघमारे

LEAVE A REPLY

*