अभूतपूर्व जनादेश

Email This Post

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची धूमश्‍चक्री एकदाची संपली. परवा मतमोजणी होऊन जनादेश बाहेर पडला. उत्तर प्रदेशात भाजपने जोरदार मुसंडी मारत सव्वा तीनशे जागा पटकावून घवघवीत यश मिळवले. उत्तर प्रदेश भाजपच्या अधिपत्याखाली आणण्याचाच, असा चंग बांधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीवाचे रान केले. भाजप प्रचाराची संपूर्ण धुरा खांद्यावर घेतली.

अनेक सभा गाजवून मतदारांच्या मनांची मशागत केली. त्या परिश्रमाचे हे फलित आहे. सत्ताधार्‍यांची निष्क्रियता, भाऊबंदकी, गुन्हेगारीचा कळस अशा अनेक कारणांनी उत्तर प्रदेशची जनता विटली होती. जनतेला बदल हवा होता. मोदींनी ‘सबका साथ सबका विकास’चा नारा देत आकर्षक घोषणांची खैरात केली. कॉंग्रेसचा ‘हात’ हाती घेऊनही मोदी त्सुनामीपुढे यादवी सत्तेची नौका टीकाव धरू शकली नाही.

उत्तर प्रदेशची सत्ता आणि समाजवादी पक्ष जणू कौटुंबिक मालमत्ता असल्याचे समजून आपला हक्क सांगत भांडणार्‍या ‘यादव’कुळाचा दारुण पराभव झाला. समाजवादी पक्ष, कॉंग्रेस, बसप आदी पक्षांची दारुण अवस्था झाल्याने भाजप नेते हुरळले असले तरी अशीच स्थिती पंजाब आणि गोव्यात भाजपचीही झाली आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येईल का? गोव्यात मुख्यमंत्र्यांसह ‘कमळा’चे अर्धा डझन मंत्री पराभूत झाले.

पंजाबात अकाली दल-भाजपची सत्ता मतदारांनी ‘खालसा’ करून कॉंग्रेसला एकहाती सत्ता बहाल केली. नवख्या आम आदमी पक्षाने तेथे दुसरे स्थान पटकावले. गोव्यातील भाजपची अवस्था पाहता देशाचे संरक्षणमंत्रीपद भूषवणार्‍या मनोहर पर्रिकरांची गोव्यावरील पकड इतकी ढिल्ली कशी झाली? शेजारच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण केंद्रात मंत्री असताना त्यांची राज्यावरील पकड मजबूत होती.

त्यांचे अनुकरण पर्रिकरांना का जमले नसावे? उत्तर प्रदेशातील भाजपच्या अभूतपूर्व यशाचे वेगवेगळे अर्थ लावले जात असले तरी ते तात्कालिक आहेत. केंद्रातील मोदी सरकारची ध्येय-धोरणे, विकासाची भूमिका आणि विशेषत: नोटबंदीला तेथील भोळी-भाबडी जनता भुलली का? उलट नोटबंदीतून दररोज नवनवे प्रश्‍न उद्भवत आहेत. नकली नोटांचा सुळसुळाट झाला आहे. एटीएममधून खोट्या नोटा येत आहेत.

उत्तर प्रदेशातील यशाच्या गमकाचा अंदाज यायला थोडा वेळ जावा लागेल. भाजपने मतदान यंत्रांचे ‘फिक्सिंग’ केल्याचा आरोप बसपा अध्यक्षा मायावती यांनी केला आहे. तो गंभीर असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह लावणारा आहे. त्याचे निराकरण आयोग कसे करणार? शेवटी देशातील जनताच सर्वोच्च आहे हे ताज्या निकालांनी पुन्हा सिद्ध केले आहे.

LEAVE A REPLY

*