दुहेरी धूळवडीचा संभव?

Email This Post

उद्या हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी! हा सण संपूर्ण राज्यभर परंपरागत पद्धतीने साजरा केला जातो. अनेक ठिकाणी होळीच्या दुसर्‍या दिवशी तर राज्याच्या काही भागात रंगपंचमीला रंगांची उधळण केली जाते. अलीकडे सण साजरे करण्याची पारंपरिक पद्धत सोयीनुसार बदलू लागली आहे. सणांचेसुद्धा प्रसंग (इव्हेन्ट) बनू लागले आहेत.

परंपरागत पद्धतीला फाटा देत अतिरेकी उत्साहाचा भर काहीवेळा जनतेलाच नकोसा वाटू लागत असेल का? पूर्वी घरोघरी छोटी होळी पेटायची. आता होळीचा आकार वर्षागणिक मोठा होऊ लागला आहे. सर्रास मोठमोठी झाडे तोडली आणि जाळली जाऊ लागली आहेत. रंगपंचमीसाठी रासायनिक रंगांचा घातक वापर बिनदिक्कतपणे केला जात आहे. पर्यावरण प्रदूषणाची समस्या गंभीर होऊ लागली आहे. त्यामुळेच काही वर्षांपासून सगळे सण पर्यावरणपूरकरीतीने साजरे करण्याच्या चळवळीने जोर धरला आहे.

कुविचार जाळण्याऐवजी लाकडे जाळली जात आहेत
डोळे झाकून जुन्या परंपरा पाळल्या जात आहेत
लाकडे जाळण्यापेक्षा आपण कुविचार जाळू
पर्यावरण रक्षणासाठी लाकडाची होळी टाळू…

असे कोणा कवीने म्हटले आहे. त्यातील मर्म लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपले योगदान द्यायला हवे. सण साजरा करण्यातील अतिरेकी उत्साहाने अनेक ठिकाणी वातावरण तंग झाल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. यंदाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारण काळ निवडणुकांचा आहे. होळीच्या पूर्वसंध्येला पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. हा अग्रलेख वाचकांच्या हाती पडेपर्यंत काही निकाल वाचकांच्या हाताशी आलेलेही असतील. सगळेच निकाल सर्वांच्याच अपेक्षेप्रमाणे लागलेले असण्याची शक्यता नाही. अनेक निकाल काहींच्या मनाप्रमाणे तर काहींच्या मनाविरुद्ध असतील. त्यामुळे कार्यकर्त्यांची व समर्थकांची माथी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निकालाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न होणार नाही, असे छातीठोकपणे सांगता येईल का? त्यामुळेच निवडणूक निकालांचा आधार घेत होळीचा रंग ‘बेरंग’ करण्याचा प्रयत्न समाजातील गणंग करू शकतील. सणाला वेगळे वळण लागू नये यासाठी यंत्रणा दक्ष असतीलच; पण निवडणूक निकालांच्या पार्श्‍वभूमीवर अतिरिक्त दक्षता बाळगण्याची गरज अयोग्य ठरू नये.

LEAVE A REPLY

*