असेही अधिकारी असतात!

Email This Post

शासकीय कामकाज चाकोरीबद्ध पद्धतीने चालते. शासनाचे अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम व योजना असतात; पण त्यांच्या अंमलबजावणीचीही चौकट ठरलेली असते. परंपरागत चौकटीबाहेर जाऊन काम करणे शासकीय प्रणालीत अशक्य मानले जाते. तरीही काहीजण चौकटीत राहूनच कामे वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. तर काही ही चौकट मोडण्याचे धाडस दाखवतात. त्यासाठी अनेकदा अशा अधिकार्‍यांना नियमबाह्य बदलीचा त्रास भोगावा लागतो.

खरे तर चाकोरीबद्ध कामकाजात काही विधायकता दाखवणार्‍या अधिकार्‍यांच्या मानेवर अवेळी बदलीची तलवार का टांगलेली असावी? पण कामाचा ध्यास घेतलेले अनेक अधिकारी त्यामुळे नाउमेद होत नाहीत. अशोक खेमका या अधिकार्‍याला त्यांच्या कार्यकाळात ४६ वेळा बदल्यांना सामोरे जावे लागले. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या मागेही बदल्यांचा ससेमिरा सतत लागलेला होता. संबंधित अधिकार्‍यांनी त्याबद्दल खंत व्यक्त केली होती. तथापि त्यांच्यामधील विजिगिषूवृत्ती बदल्यांमुळे अडखळली नाही.

काही अधिकारी व सरकारी सेवक आजही आपापल्या परीने कामकाजाची चाकोरी विस्तारण्याचा प्रयत्न करत असतात. अशी प्रकाशाची बेटे मोजकीच असली तरी त्यांचा प्रकाश त्या-त्या बेटाबाहेरचा परिसरसुद्धा प्रकाशित करतो. राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी काही वेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांवर खेळणी बँक उभारायला त्यांनी सुुरुवात केली आहे.

अंगणवाड्यांमधील मुलांना खेळणी सहज उपलब्ध व्हावीत हा त्यामागचा उद्देश आहे. यासाठी त्यांनी खासगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांना आकर्षक विनंतीपत्र पाठवले आहे. पालकांनी त्यांच्या घरातील मुलांची काही वापरलेली खेळणी असतील ती या बँकेस दान करावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे. अशीच इतरही उदाहरणे आठवतात. लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करायचे ठरले.

हा शासन निर्णय वेगाने अंमलात यावा व जनतेची तहान वेळेवर भागवावी यासाठी सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व लातूरचे पांडुरंग झोले यांचे चाकोरीबाह्य प्रयत्नच कारणीभूत ठरले होते. गरज आहे ती अशा अधिकार्‍यांच्या कल्पक बुद्धीला वाव देण्याची! होते मात्र वेगळेच! अशा अधिकार्‍यांसोबतचे अन्य अधिकारीसुद्धा साहेबांच्या उत्साहावर पाणी फिरवण्यात अनेकदा धन्यता मानतात. सरकारी कामातील वेळकाढूपणा कमी होण्याच्या प्रयत्नाला खीळ घालण्यातच अनेकांना समाधान वाटते. अशावेळी पुढारी म्हणवणारे अशा अधिकार्‍यांच्या पाठीशी उभे राहिले तर जनतेला भेडसावणारी आजची सरकारी कामाची दीर्घसूत्री पद्धत काहीशी मर्यादित होऊ शकेल.

LEAVE A REPLY

*