खेड्या-पाड्यातही व्हावा जागर – मोनिका आथरे

Email This Post

स्त्रियांबाबत आजही समाजात उत्कृष्ट तत्त्वज्ञान आणि निकृष्ट आचरण असे दुटप्पी वर्तन करण्यात येत असल्याचे दिसते. शहरी भागातील नवयुवती, स्त्रिया स्वातंत्र्य-समता-बंधुता यांच्या पायर्‍या पार करून राज्यघटनेने बहाल केलेली स्वातंत्र्य काहीअंशी उपभोगते आहे. मात्र ग्रामीण भागातील मुलींच्या वाटेला अजूनही अन्याय, अत्याचार सहन करीत कुढत राहण्याची वेळ येत आहे. खेड्या-पाड्यातही स्त्रीमुक्तीचा जागर व्हायला हवा.

आज सर्व क्षेत्रात स्त्रिया पुरुषांंच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. क्रीडा क्षेत्रातही आम्ही कुठेच मागे नाही. परंतु स्त्रियांबाबत आजही समाजात उत्कृष्ट तत्त्वज्ञान आणि निकृष्ट आचरण असे दुटप्पी वर्तन करण्यात येत असल्याचे दिसते. महिलादिन, सामाजिक उपक्रम, सत्कार यामध्ये स्त्रियांचे गुणगान गायले जाते. तिला आदिशक्ती, माता, जननी अशा उपाधी लावल्या जातात. मात्र दुसर्‍या बाजूला समाजाच्या कलुषित नजरेचा सामना स्त्रीला करावा लागतो. आता तरुणी उच्चशिक्षित, सक्षम झाल्या असल्या तरी शहरी आणि ग्रामीण अशी दोन टोके स्त्रियांत निर्माण झाली आहेत. सरकारने महिलांच्या अधिकारांना संरक्षण देणारे अनेक कायदे केले. तरीही स्त्री भ्रूणहत्या होतच आहेत.

प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे करूनही स्त्रिया निरक्षर आहेत. बालविवाह, हुंडाबळी होत आहेत. लैंगिक शोषण, अत्याचाराचाही आलेख वाढताच आहे. या सर्वांतून शहरी भागातील नवयुवती, स्त्रीया स्वातंत्र्य-समता- बंधुता यांच्या पायर्‍या पार करून राज्यघटनेने बहाल केलेले स्वातंत्र्य काहीअंशी उपभोगते आहे. मात्र ग्रामीण भागातील मुलींच्या वाटेला अजूनही अन्याय, अत्याचार सहन करीत कुढत राहण्याची वेळ येत आहे. आता समाजाने स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध समाज सुधारकांच्या प्रयत्नांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने निर्णय घेण्याची आणि काम करण्याची संधी काही प्रमाणात मिळायला लागली आहे. स्त्रियांच्या बाजूने अनेक कायदे करण्यात आले आहेत. महिलांना समान पातळीवर आणण्यासाठी सरकारतर्फे आरक्षणही देण्यात आले आहे.

याचा लाभ उठवत आजच्या आधुनिक जीवनात स्त्रियांनी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने आजची स्री मुक्त होत आहे, यात काही शंका नाही. परंतु दुसर्‍या बाजूला त्याच दुर्गम भागात अशिक्षितपणामुळे स्वतःच्या क्षमता ओळखू न शकणार्‍या मुलींना मदत करण्याचीही तितकीच आवश्यकता आहे. स्त्रियांबाबत समाजाचा सकारात्मक दृष्टिकोन होण्यास किती वर्षे जावी लागतील हा प्रश्न आहे. महिलांच्या संदर्भातील पुरुषी मानसिकता बदललेली नाही. महिलांना व्यक्ती म्हणून स्वीकारण्यास समाज तयार नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. समाजात दोन टोके तयार झाली आहेत.

एकीकडे खूप मोठ्या पदावर महिला पोहोचल्या आहेत. दुसरीकडे महिलांना कुठलेही स्वातंत्र्य नसल्याचे दिसते. 50 टक्के महिला आर्थिक सक्षम झाल्या आहेत. परंतु ग्रामीण भागातही अशिक्षित स्त्रियांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना अद्यापही मुक्ती नाही. ग्रामीण भागातही खूप मोठे टॅलेन्ट लपलेले आहे. आमच्यासारख्या दोघी-चौघींना संधी मिळाली म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. परंतु आमच्यासारख्या शेकडो मुली अशा संधीची केवळ वाट पाहत राहतात. संधी मिळाल्यानंतर, खेळात चमकदार कामगिरी केल्यानंतर खेळाडूंना प्रायोजक तसेच मदत करणारे पुढे येतात. असे मदतीचे हात अगोदरच पुढे आले तर नाशिकच्या ग्रामीण भागातील शेकडो मुली उद्याच्या भारतीय क्रीडा जगतातील हिरो ठरतील.

LEAVE A REPLY

*