समज वाढवण्याची आवश्यकता

Email This Post

दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस परिसरात सेल्फी काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. सेल्फी काढणे हा वेळेचा दुरुपयोग असल्याचे महाविद्यालय सूत्रांनी म्हटले आहे. मिरांडा हाऊस हे महिलांचे निवासी महाविद्यालय आहे.

मोबाईलचा अतिवापर मानवासाठी घातक असून त्यामुळे मानसिक रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाने नोंदवले आहे. मानसोपचारतज्ञांच्या मते अनेक जण न्यूनगंड लपवण्यासाठी सारखे सेल्फी काढत असतात.

मोबाईलने माणसाचे संपूर्ण जीवन व्यापून टाकले आहे. गरजेपुरता मोबाईल वापरला जात होता तोपर्यंत चिंता करण्याचे कारण नव्हते; पण तज्ञांच्या मते या साधनाचा अतिवापर सुरू झाला आहे. मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम होतात, असे सुरुवातीला नुसतेच बोलले जात होते; पण संशोधनाअंती ते दुष्परिणाम सिद्धही होऊ लागले आहेत. एकाग्रता नसणे, स्मरणशक्ती धूसर होणे, झोप न लागणे, याशिवाय तीव्र डोकेदुखी, मुलांमध्ये वर्तनविषयक समस्या व इतर गंभीर दुखण्यांचा संबंधदेखील मोबाईलच्या अतिवापराशी जोडला जात आहे.

केईएम मानसोपचार विभागाचे निरीक्षण हे त्याचेच उदाहरण आहे. सध्याच्या वेगवान व धकाधकीच्या काळात मोबाईलची उपयुक्तता वादातीत आहे. त्याचा वापर टाळता येणे शक्य नाही. त्यामुळे वापरकर्त्यांना त्याचा सुयोग्य वापर शिकवण्याची व मोबाईल साक्षरता वाढवण्याची आवश्यकता आहे. याची सुरुवात शालेय स्तरापासून केली जावी. मुले वयात येत असताना त्यांच्या मनोव्यापारात बदल घडत असतात. हे लक्षात घेऊन शालेय स्तरावर या बदलांबाबत विद्यार्थ्यांना शास्त्रीय प्रशिक्षण दिले जाऊ लागले. त्याचे सुयोग्य परिणाम समोर आले आहेत.

कोणतीही समस्या संपवण्यासाठी तिच्या मुळाशी जायला हवे. घाव मुळावर घातला जायला हवा. तंत्रज्ञान वापरासाठीही शालेय स्तरापासून तंत्रज्ञान साक्षरता उपक्रम हाती घेतला जावा. प्रश्न केवळ तंत्रज्ञान साक्षरतेचा नाही. बदलत्या काळाशी सुसंगत विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केले जायला हवेत. त्याची सुरुवात संगणक तसेच मोबाईल वापरापासून व्हायला हवी.

आधुनिक साधनांचा वापर असो किंवा वाहन चालवणे; ते वापरकर्त्यांची समज वाढवणे हाच त्यावरचा कायमस्वरुपी उपाय आहे. अभ्यासक्रमांची सांगड व्यवहारज्ञानाशी घातली जायला हवी. देश कॅशलेस इकॉनॉमीचे स्वप्न बघत असताना तंत्रज्ञानाच्या वापरावर, सेल्फीवर, मोबाईल वापरावर बंदी घालणे, मुलांना त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे हे उपाय व्यवहार्य ठरू शकत नाहीत. त्याचे शिक्षण-प्रशिक्षण हाच त्यावरचा शाश्वत उपाय आहे.

LEAVE A REPLY

*