आपण कुठे चुकतोय?

Email This Post

जंगलांमधील विपुल संपदा हळूहळू नाश पावत आहे, असे गळे काढणारा माणूस या नाशास आपणच कारणीभूत आहोत हे सोयीस्कररीत्या विसरतो. आपल्या पूर्वजांनी रुढी-परंपरांच्या माध्यमातून निसर्गरक्षणाचे, त्यातील वैविध्य जपण्याचे काम केले. मात्र जंगलांच्या आजच्या विदारक स्थितीस आपण सगळेच जबाबदार आहोत.

भारत हा वैविध्याने नटलेला देश आहे. या विविधतेत जैवविविधताही अंतभूर्र्त आहे. कालौघात ती कमी होताना दिसत आहे. त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत. या चर्चेत आणखी काही मुद्यांचा परामर्श घेण्याची आवश्यता आहे.

* शिकार : भारतात वन्यजीवांची विपुल संख्या होती. शिकारीमुळे ती रोडावत गेली. आजही तित्तर, पारवे, माळढोक, मोर, लावरी यांसारखे पक्षी, हरणांच्या अनेक जाती, ससे, रानडुक्कर, साळींदर यांसारखे प्राणी आदींची मोठ्या प्रमाणात शिकार होते. चामड्याचे पट्टे, बॅग, पर्स, कोेट, स्कार्फ आदी बनवण्यासाठी अनेक प्राण्यांना ठार मारले जाते. बिबटे, वाघ, हिमबिबटे, नाग, अजगर, समुद्रसर्प, फर असणार्‍या प्राण्यांची, हस्तीदंत मिळवण्यासाठी हत्ती आणि शिंगासाठी गेंड्यांची शिकार केली जाते. कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यासाठी सुळे आणि शिंगांचा वापर होतो. औषधी तेल मिळवण्यासाठी, चरबीसाठी घोरपड, सांड, रानडुकरे मारली जातात. दम्यावर औषध म्हणून पारव्याचे काळीज खातात.

वाघाचे तर सर्व अवयव विकले जातात. औषध कंपन्या सीतेचा अशोक, नरक्या, गारंबीचा वेल, अर्जुन यांसारख्या अनेक वनस्पतींची तोड करतात. वाघ, सिंह, गवे, मोठी शिंगवालेे नर हरीण आदी प्राण्यांची शिकार होते. अशा शिकारीमुळे वन्यप्राण्यांची संख्या वेगाने कमी होते. त्याला आंतरराष्ट्रीय तस्करीचे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. वन्यप्राण्यांचे अवयव, फुलपाखरं, पक्षी, सरपटणारे प्राणी, त्यांची अंडी यांना प्रचंड किंमत मिळते.

* जंगलतोड आणि जंगल चराई : भारतीय जंगलांभोवती अनेक लोकवस्त्या आहेत. ही माणसे दैनंदिन इंधन, अवजारे बनवणे, घरबांधणी आदींसाठी जंगलात उपलब्ध असणारे लाकूड तोडून आणतात. जंगलातील वृक्ष कमी होणे, जंगलाचे अच्छादन कमी होणे, उंच झाडांची संख्या कमी होणे यासारख्या परिस्थितीमुळे अधिवासाची प्रत कमी होते. कीटक आणि पक्ष्यांच्या संख्येवर त्याचा विपरीत परिणाम होतो. गावातील पाळीव गुरे जंगलात चराईसाठी सोडली जातात. त्यामुळे जंगलातील शाकाहारी वन्यप्राण्यांचे अन्न कमी होते. या प्राण्यांमध्ये पाळीव प्राण्यांमधील साथीचे रोग पसरण्याचा धोका असतो. या साथींमध्ये हरणे, गवे यांसारखे प्राणी मरतात. माणसांची वर्दळ आणि पाळीव प्राण्यांच्या हालचाली, आवाज यामुळे वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक जीवनात अडसर उत्पन्न होतो.

* आगी लागणे : दरवर्षी नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे 55 टक्के भारतीय जंगलात आग लागते. चांगले गवत मिळवणे, कोवळा तेंदुपत्ता मिळवणे, वाळलेल्या पानांवर, गवतावर न विझलेली विडी, काडी टाकणे आदी असंख्य कारणांमुळे जंगलात आगी लागतात. यामुळे जंगलातील जमिनीवरचे कीटक, सरपटणारे प्राणी, लहान आकाराचे सस्तन प्राणी, जमिनीवर अंडी घालणारे पक्षी यांच्यावर होरपळून मरण्याची वेळ येते. आगीच्या उष्णतेने जमिनीवरचे सूक्ष्म जीव नष्ट पावतात. या आगींमुळे जंगलातील जमिनीची सुपीकता कमी होते, धूप होते, तणांची संख्या वाढते. परिणामी स्थानिक जैवविविधता धोक्यात येते.

* अतिरिक्त वनोपजव काढणे : जंगलावर अवलंबून असणार्‍या लोकांचा रोजगार वाढावा यासाठी वनोपजव (छेप ढळालशी ऋेीशीीं झीेर्वीलश, छढऋझ) मोठ्या प्रमाणावर काढून शहरात विक्रीला पाठवण्यावर शासकीय आणि संस्थात्मक पातळीवर भर दिला जातो. जंगलातील फळे (रानमेवा), फुले, मध, कंद, डिंक, तेंदू, रेझिन, गवत, बांबू, औषधी वनस्पती इ. अनेक घटकांचा यात समावेश आहे. बाजारातील मागणीमुळे जंगलातून हिरडा, आवळा, मोह, तेंदू, बांबू, मध यांचा बेबंद उपसा सुरू असतो. यामुळे जंगलाची प्रत ढासळत आहे.

* तण वाढणे : मानवी हस्तक्षेपामुळे जंगलातील मूळच्या स्थानिक वृक्षजाती नष्ट होत आहेत. त्यांची जागा आक्रमक तणांच्या जाती घेतात. एखाद्या ठिकाणी नको असलेली जात येणे याला तण म्हणतात. याचा परिणाम मूळ झाडोर्‍यावर अवलंबून असणारे पक्षी, कीटक, शाकाहारी प्राणी यांच्या संख्येवर होतो. त्यांचा अधिवास आणि खाद्य कमी होत जाते. आज काँग्रेस गवत, बेशरम, रानमारी, टणटणी यांसारख्या झुडूपांनी जंगलाचा बराच मोठा भूभाग व्यापला आहे.

* परकीय जाती : ब्रिटीश, फ्रेंच, डच वगैरे लोकांनी मागील शतकात वेगवेगळ्या देशांवर राज्य करताना आपल्या मातृभूमीची आठवण म्हणून अनेक जातीची झाडे आणली. सोबत पाळीव प्राणीही आणले. परकीय जिवांमध्ये वनस्पतींचे सर्व प्रकार म्हणजेच वृक्ष, वेली, झुडूपे, पाणवनस्पती, गवत यांचा समावेश आहे. त्याचबरोबरच मासे, मधमाशा, पाळीव प्राण्यांच्या जाती आदींचाही यात समावेश आहे. नवीन ठिकाणी या नव्या जातींना शत्रू नसतात. म्हणजे त्यांच्या बिया खाणारे पक्षी, कीटक नवीन जागी नसतात.

त्यावर पडणारे रोग नसतात. यामुळे त्या वेगाने फोफावतात आणि स्थानिक जातींना हटवतात. अनेक ओढ्यातील, पाणवठ्यातील स्थानिक माशांच्या जाती परकीय माशांमुळे नष्ट झाल्या आहेत. ग्लिसिडिया ऊर्फ उंदीरमारी, सुबाभूळ या वनस्पती वृक्ष लागवडीसाठी ऑस्ट्रेलियातून आणल्या गेल्या. आज त्यांनी अनेक टेकड्या व्यापल्या आहेत. गुलमोहर, नीलमोहर, गुलाबी आणि पिवळा टॅबुबिया, उभा अशोक यांसारख्या परकीय वृक्षांनी शहराची आवारे-रस्ते व्यापले आहेत. या परकीय वनस्पती वेगाने वाढल्या तरी त्यांचा स्थानिक पक्षी, कीटक यांना उपयोग होताना दिसत नाही. परिसरातील हिरवळ वाढते पण जैवविविधता कमी होते.

* अंधश्रद्धा : आपल्या समाजात अनेक सस्तन, सरपटणारे प्राणी आणि पक्षी यांबाबत अंधश्रद्धा आहेत. उदमांजर, लांडगा, तरस यांसारखे प्राणी भूत, जादूटोणासंबंधीच्या अंधश्रद्धेपोटी मारले जातात. माणसाने पिकवलेल्या शेतीतील अन्नधान्याचा मुख्य शत्रू म्हणजे उंदीर. त्याला खाणारे प्राणी म्हणजे नाग, धामण, घुबड. खरे तर त्यांना माणसाचे मित्र म्हणायला हवे. पण नाग विषारी आहे म्हणून मारला जातो. तो डूख धरतो वगैरे अंधश्रद्ध आहेतच. धामण हा बिनविषारी साप नागासारखा दिसतो. तसेच तो म्हशीचे दूध पितो आणि म्हशीला मारतो आदी अंधश्रद्ध असल्याने त्याला मारले जाते. घुबडाला पाहणे अशुभ मानतात. त्यामुळे त्यांना मारले जाते. केवळ अंधश्रद्धेपोटी अन्नसाखळीतील हे महत्त्वाचे प्राणी नाहक मारले जातात.

पशुबळी आजही दिले जातात. आता सणांना बाजारी रूप आले आहे. यातून वटपौर्णिमेला फांद्या तोडून विक्री करून वड, गणेशोत्सवामध्ये कुर्डू, शमी वगैरे वनस्पती, दसर्‍याला कांचन-आपट्याची पाने यांची तोड करून त्यांना नाशाकडे ढकलले जात आहे.

* प्रयोगशाळा : अनेक रोगांवरील प्रतिजैविक लसी शोधण्यासाठी प्रथम उंदीर आणि माकडांवर चाचणी घेतली जाते. या प्रयोगात त्यांना भयानक यातनांना सामोरे जावे लागते आणि अतिशय विदारक मृत्यू येतो. बुल फ्रॉग ही बेडकाची जात कॉलेजमधील प्रयोगशाळांमध्ये डिसेक्शनसाठी वापरली जात असल्यामुळेच धोक्यात आली होती. हा प्रकार भयावह शिवाय प्राण्यांवर अत्याचार करणारा आहे याची दखल घ्यायला हवी.

(लेखक ‘जीविधा’ या पर्यावरणविषयक काम करणार्‍या संस्थेचे संस्थापक, संचालक आहेत.)

LEAVE A REPLY

*