आमदार दुर्दैवी, खासदार सुदैवी!

Email This Post

सरकारी अधिकार्‍यांना बडवणार्‍या ‘चोपदार’ लोकप्रतिनिधींची अलीकडे बरीच चलती आहे. आपले नियमबाह्य तोंडी आदेश न पाळणार्‍या अधिकार्‍यांना हिसका दाखवण्याचे प्रकार सतत वाढत आहेत. आमदार हर्षवर्धन जाधव यांना औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकतीच एक वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

10 हजारांचा दंडही केला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार्‍या मार्गावरील वाहतूक थांबवलेली असताना त्यातून जाण्याचा हट्ट धरून फौजदाराच्या अंगावर जीप घालण्याचा पराक्रम व बगलबच्च्यांच्या साथीने त्याला मारहाण केल्याप्रकरणी जाधव यांना ही शिक्षा ठोठावली गेली आहे. आपण लोकप्रतिनिधी आहोत हे विसरून जाधव यांनी ‘बाहुबली’ अवतार धारण केला होता. आमदार जाधव तसे दुर्दैवी म्हणावे लागतील. कारण फौजदाराला मारहाण केल्याचे न्यायालयात सिद्ध होऊन त्यांना शिक्षा झाली.

विधानभवनात पोलीस अधिकार्‍याला तुडवणारे मात्र आजही निर्दोषच आहेत. लाचखोरीत रंगेहाथ पकडले जाऊनही अनेक सरकारी अधिकारी सहीसलामत निर्दोष सुटतात व आपापल्या जागी जाऊन पुन्हा खाबुगिरी चालू करतात. आमदार जाधवांना शिक्षा झाली असताना सत्ताधारी पक्षाचे काही बोलभांड खासदार मात्र मोकाट सुटले आहेत. तोंडाला येईल तशी बकबक करत आहेत. भाजपचे वाचाळ खासदार साक्षी महाराज यात आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशात त्यांनी पुन्हा गरळ ओकली आहे. ‘देशाची लोकसंख्या वाढण्यास मुस्लिम समुदाय जबाबदार आहे’ अशा अर्थाची विधाने करून त्यांनी आपली उपद्रवक्षमता पुन्हा सिद्ध केली आहे.

निवडणूक आयोगाने त्या वक्तव्याला आक्षेप घेतला हे देशाचे नशीब! त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. या महाराजाच्या बेतालपणाकडे सतत कानाडोळा करणार्‍या सत्तारूढ पक्षाने हे प्रकरण अंगलट येताच विश्वामित्री पवित्रा घेतला आहे. ‘आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला’ अशा मळलेल्या पळवाटेवरून साक्षी महाराज पळ काढू पाहत आहे. देशातील जातीयवाद संपवण्याच्या घोषणा केंद्र सरकार करते.

परंतु सरकारचा हा पवित्रा किती खरा मानावा? एखाद्या बेताल खासदाराला वठणीवर आणण्यासाठी निवडणूक आयोगच कशाला हवा? देशात हुकुमी बहुमत असलेले सरकार सत्तारूढ आहे. मग बेमुर्वतखोर उच्चपदस्थांना लगाम घालण्यात सरकारला स्वारस्य का नसावे? कायदा हातात घेणार्‍या आमदार जाधवांना शिक्षा झाली ते योग्यच आहे.

परंतु समाजात जातीभेदाचे विष कालवणार्‍या साक्षी महाराजासारख्या नेत्यांची तोंडे वेळीच बंद का केली जात नाहीत? त्यांच्यावर कठोर कारवाई का होत नाही? आमदार जाधव पूर्वी मनसेनेचे आमदार होते. आता ते शिवसेनेचे आमदार आहेत. हे त्यांच्या गुन्ह्याचे गांभीर्य वाढवणारे कारण ठरले असेल का?

LEAVE A REPLY

*