उत्तम संधी!

Email This Post

मुंबईतील वाहतूक शाखेच्या लाचखोरीचा पर्दाफाश करण्याचे धाडस याच शाखेतील हवालदार सुनील टोके यांनी दाखवले आहे. लाचखोरी कशी चालते याची तपशीलवार माहिती त्यांनी उच्च न्यायालयात केलेल्या जनहित याचिकेत दिली आहे. टोके यांचे धाडस ‘काबिले तारीफ’ आहे.

थेट न्यायालयात धाव घेण्याची वेळ त्यांच्यावर का आली? वाहतूक शाखेतील भ्रष्टाचाराबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकारी, आयुक्त तसेच एसीबीपर्यंत अनेक तक्रारी केल्या. मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र या तक्रारींची कोणीच दखल घेतली नाही. तसे असेल तर ही बाब खूपच गंभीर ठरते. केवळ मुंबई वाहतूक शाखेसाठीच हा ‘जोरका झटका’ नसून संपूर्ण पोलीस दलालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करणारा आहे.

पोलीस खात्याच्या दिव्याखाली किती अंधार आहे यावर यातून पुरेपूर प्रकाश पडला आहे. अर्थात भ्रष्टाचार आणि लाचखोरीने एकटे पोलीस खातेच कलंकित नाही. अनेक खात्यांची तोंडे त्यामुळे काळवंडलेली आहेत. महसूल खाते त्यात अग्रेसर आहे. टोके यांचा दावा न्यायालय किती विश्वासार्ह मानते यावर पुढची कारवाई अवलंबून आहे. टोकेंच्या म्हणण्यात अविश्वासार्ह वाटण्यासारखे काही नाही. कारण विविध सरकारी खात्यांच्या खाबुगिरीचा अनुभव जनता नेहमीच घेते. एसीबीकडून लाचखोर पकडले जातात; पण यथावकाश ते निर्दोषही सुटतात.

नाशिक विभागात गेल्या वर्षभरात 153 लाचखोर पकडले गेले. त्यात ‘महसूल’चेच पारडे जड भरले. पकडले गेल्यांपैकी किती जणांना शिक्षा होईल? निर्दोष सुटतील ते कुठे ना कुठे मंत्रिमहोदयांच्या आशीर्वादाने ‘मलईदार’ जागी रुजू होतीलच. ठराविक पदांवर दहा वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येणार नाही, असे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणले. परंतु चंद्रकांत पाटील व विनोद तावडेंसह अनेक मंत्र्यांनी ते धाब्यावर बसवले.

मंत्री अस्थापनेवर मर्जीतील बाबूंच्या नेमणुका करवून घेतल्या. भ्रष्टाचार्‍यांना तुरुंगात डांबण्याच्या गर्जना राज्य सरकार गेली दोन वर्षे करत आहे. प्रत्यक्षात त्याबाबत फारसे आशादायक चित्र दिसत नाही. काही वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यात महसूल खात्यातील सोनवणे नामक वरिष्ठ अधिकारी अधिक लोभीपणाने जीवाला मुकला.

तेव्हा बराच कोलाहल झाला; पण यथावकाश सगळे शांत झाले. सरकारला खरोखरच भ्रष्टाचारमुक्त कारभार हवा असेल तर हवालदार टोकेंनी वाहतूक शाखेतील लाचखोरीचा केलेला पर्दाफाश ही उत्तम संधी आहे. सरकारी खात्यांच्या शुद्धीकरणाची सुरुवात पोलीस खात्यापासून करता येईल; पण ती शक्यता फारच धूसर आहे.

मंत्रिमंडळातले अनेक सहकारी आणि लाचखोर सेवकांना ‘स्वच्छतेचे दाखले’ देण्याची लागलेली सवय एखाद्या हवालदाराच्या गौप्यस्फोटामुळे बदलली तर जग काय म्हणेल हाही प्रश्न गंभीर आहे.

1 COMMENT

  1. anek karmcharyan chyamanat hya polis havaldara sarkhe aapnkarawe v aapli manachi ghusmati pasun mukt vhave ashi ichha asate pan aapli nokari jail hya bhitine dhadas hot nahi tyana tathy aadhlun aale,bhalekortaatsiddh karnyas sakshidar pudheaale nahitar awakshak surakshadyawi jyamulebhrashtachar mukt karbhar honyasmadat hoil .

LEAVE A REPLY

*