मनपासाठी युती होणार?

Email This Post

मनपा निवडणुकीच्या लढाईची वेळ समोर आली आहे. येणार्‍या तीन-चार दिवसातच ज. स. सहारिया पत्रकार परिषद घेणार आहेत. सहारिया राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त असल्यामुळे ते सध्या काय म्हणतात याचीच सर्वत्र उत्सुकता आहे.

आयोगाच्या कार्यालयात दररोज पत्रकार तसेच सर्वच राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते चक्कर मारतात, फोन करतात आणि विचारणा करतात की सहारिया साहेबांचा आजचा कर्यक्रम काय आहे? ज्या दिवशी असे जाहीर होईल की उद्या दुपारी सहारिया हे पत्रकार परिषद घेणार आहेत त्यावेळी सर्वांनाच कळून चुकेल की निवडणुकीची आचारसंहिता कधीपासून लागू होईल. ज्या दिवशी सहारिया निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील त्या क्षणापासून निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली असेल.

मुंबई, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ठाण्यासह राज्यातील दहा महानगरपालिकांमध्ये निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्येही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचीच आणखी एक मोठी कसोटी लागणार आहे. 8 नोव्हेंबर 2016 च्या नोटबंदी नंतर पाठोपाठ झालेल्या नगपालिकांच्या निवडणुकांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवताना भाजपने चमकदार कामगिरी केली खरी पण आता त्या निर्णयाच्या पन्नास दिवसांनंतर जनतेचे काय मत आहे हे मतपेटीतून प्रकट होणार आहे.

भाजपचा मित्रपक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दररोज नोटबंदीवरून केंद्र सरकारला लाथा घालत असताना आणि केंद्र सरकारमध्ये बजेट सादर करण्याच्या निर्णयालादेखील आव्हान देत असताना हे मतदान होणार आहे. वर उल्लेखित पाच मनपांसह उल्हासनगर, सोलापूर तसेच विदर्भातील तीन म्हणजे नागपूर, अकोला आणि अमरावती अशा एकूण दहा महानगरपालिकांत ही मतपरीक्षा होणार आहे.

मुंबई ही अर्थातच यातील सर्वात मोठी मनपा आहे. देशातील काही राज्यांपेक्षाही मोठे वार्षिक अंदाजपत्रक असणार्‍या मुंबई मनपामध्ये 227 जागा आहेत. मतदानाला सामोरे जाणार्‍या दहा मनपांच्या या यादीतील अकोला ही सर्वात लहान मनपा आहे. तिथे 73 जागा आहेत. नंतर उल्हासनगर 78 व अमरावती 87 जागा आहेत. यानंतरचा क्रमांक लागतो तो 102 जागा अणार्‍या सोलापूरचा नंतर नाशिक (122), पिंपरी-चिंचवड (128), ठाणे (130), नागपूर (145) आणि पुणे (152) अशा चढत्या क्रमाने नगरसेवकांच्या जागा या दहा मनपांमध्ये आहेत. एकूण 1244 जागांसाठी या निवडणुका घेतल्या जातील.

राज्य निवडणूक आयोग जेव्हा मनपा निवडणुकांचे निकाल जाहीर करतो तेव्हा त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाचीच पद्धती वापरली जाते. म्हणजे आधी राष्ट्रीय पक्ष म्हणून नोंदलेल्या पक्षांची नावे येतात. नंतर राज्यस्तरीय पक्ष म्हणून नोंदलेल्या पक्षांची नावे दिलेली असतात व शेवटी इतर आणि अपक्षांचे आकडे येतात. त्या क्रमवारीनुसार मायावतींचा बहुजन समाज पक्ष, कम्युनिस्ट व मार्क्सवादी कम्युनिस्ट यांचे क्रम वरचे लागतात. या दहा मनपांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही.

त्यांनी मागच्या वेळी म्हणजे 2012 च्या निवडणुकांत या दहांपैकी फक्त ठाणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर अशा तीनच ठिकाणी निवडणुका लढवल्या होत्या आणि तिथे त्यांचा एकही नगरसेवक निवडून आला नव्हता. तीच स्थिती थोड्या फरकाने मार्क्सवाद्यांची आहे. त्यांनी सोलापूर व नाशिकसह ठाणे, पिंपरी-चिंचवड व अमरावतीमध्ये निवडणुकीत भाग घेतला. त्यापैकी ठाणे व नाशिकमध्ये त्यांना प्रत्येकी 3 जागी विजय मिळाला होता. या दोन पक्षांच्या मानाने बसपची स्थिती मजबूत म्हणावी अशी आहे. त्यांनी नागपूर, अमरावती, ठाणे, उल्हासनगर व सोलापूर येथे थोड्या थोड्या जागा घेतल्या आहेत. नागपुरात त्यांनी दोन अंकी संख्या गाठत 12 जागी विजय मिळवला.

अमरावतीसह सोलापुरात 3 तर ठाणे व उल्हासनगरात प्रत्येकी 2 जागी बसपचा झेंडा लागला. यानंतर भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नंबर निकालाच्या यादीत लागतात. यापैकी नागपुरात भाजपचे अस्तित्व मागच्या निवडणुकीत मजबूत राहिले होते. त्यांनी 62 जागा जिंकत तिथे सत्ता राखली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची शक्ती सर्वात दिसली. तिथे त्यांना फक्त 3 जागा जिंकता आल्या होत्या. अमरावतीत 7 तर ठाण्यात 8 नगरसेवक भाजपला निवडून आणता आले होते. इतर सर्व मनपांमध्ये त्यांनी दोन अंकी संख्या घेतली होती. मुंबईत त्यांनी 31 जागा जिंकल्या होत्या.

उल्हासनगरात 78 पैकी 11 म्हणजे बरी संख्या होती. सोलापुरातही 25 टक्के जागांवर भाजपने विजय मिळवला होता. त्यांनी 102 पैकी 26 जागा जिंकल्या. नाशिकमध्ये 14, अकोल्यात 18 तर पुण्यात 26 जागी भाजपचा झेंडा फडकला होता. म्हणजे राज्यभरातील या टप्प्यातील 1244 जागांपैकी भाजपने 205 जागी विजय मिळवला. हा आकडा 18 टक्क्यांच्या आसपास आहे.

तसे पाहिले तर राज्यातील या जागांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही यापेक्षा खूप जास्त जागा जिंकल्या होत्या असे नाही. काँग्रेसने 264 तर रा.काँ.ने 265 जागा घेतल्या. तर शिवसेनेने 227 जागी विजय मिळवला होता. पण एकंदरीत उतरता क्रम लावला तर राष्ट्रवादी क्रमांक एकचा पक्ष ठरला होता, तर त्यांच्यापेक्षा जरी एकच नगरसेवकपदाची जागा कमी जिंकली होती तरी काँग्रेसचा क्रमांक दुसरा लागला होता. सेना हा क्रमांक तीनवर तर भाजप क्रमांक चारचा मोठा पक्ष ठरला.

2016-2017 मध्ये आतापर्यंत नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांचे जे निकाल आले आहेत त्यात भाजपच्या जागा दुपटीने-तिपटीने वाढल्याचे चित्र पुढे आले आहे. अगदी मनपा स्तरावर जरी पाहिले तरी दीड वर्षांपूर्वी पार पडलेल्या कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीत हेच झालेले दिसले. तिथे भाजपची लढाई अन्य पक्षांशी नव्हतीच. तर राज्यातील सत्तेत वाटेकरी असणार्‍या शिवसेनेबरोबर अटीतटीची लढाई भाजपने केली. त्यात गंमत अशी झाली की या दोघांच्या भांडणाचा लाभ काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळण्याऐवजी या दोन्ही पक्षांच्या जागा इतक्या घटल्या की 90 टक्के जागांवर सेना-भाजपचेच नगरसेवक निवडून आले.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांच्या 2012 च्या निकालांचा विचार मुंबई व ठाण्यासंदर्भात करायचा तर मुंबईत मुख्य लढत ही शिवसेना व काँग्रेस यांच्यातच झाली होती. तर शेजारच्या ठाण्यात मात्र खरी लढत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी झाली होती. त्याही निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी केलेली नव्हती. मात्र सेना-भाजपने युती म्हणून निवडणूक लढवली. त्यात शिवसेनेने मुंबईत 75 जागा घेतल्या, तर भाजपने 31 जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांनी सत्तेच्या जवळ जाण्याचा पराक्रम केला खरा पण अरुण गवळीच्या पक्षासह काही अपक्ष नगरसेवकांची मदत घेत पाच वर्षे मुंबईवर राज्य करावे लागले होते.

काँग्रेसने जोरदार झुंज देत 52 जागांची कमाई केली होती. तर राष्ट्रवादीची ताकद मुंबईत अगदीच कमी दिसली. त्यांना फक्त 13 जागी विजय खेचता आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 26 जागी विजय मिळवला होता. मात्र त्यापैकी अनेक नगरसेवक राज ठाकरेंची साथसंगत सोडून शिवसेनेत वा भाजपमध्ये दखल झाले आहेत. राष्ट्रवादीची स्थिती आजही मुंबईत बिकटच आहे. काँग्रेसने रा.काँ.बरोबर या निवडणुकीत मुंबईत एकत्र न जाण्याचा निर्णय स्थानिक स्तरावर जाहीरही केला आहे. भाजप अद्यापी विचार करत आहे;

पण पुढच्या दोन-चार दिवसातच जेव्हा प्रत्यक्षात निवडणुकीची घोषणा होईल आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही लगेचच सुरू होईल. त्यामुळे आता या कोणाच पक्षाकडे चिंतन वा मंथन करण्यासाठी फारसा वेळ उरलेला नाही. मागच्या काही दिवसातील उद्धव ठाकरेंची वक्तव्ये पाहता शिवसेनाही भाजपसोबत जाण्यासाठी फार उत्सुक आहे असे दिसत नाही. ठाणे महापालिका ही मुंबई व पुण्यानंतरची संख्या तसेच अंदाजपत्रकाच्या आकारानुसारची मोठी आहे.

शिवाय मुंबईच्या दारावर असल्यामुळे तिथे काय राजकारण शिजते याचे साहजिकच पडसाद ठाण्यातही उमटणे अपरिहार्यच असेत. केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र आल्यापसून भाजपचाही उत्साह वाढला आहे. त्यातूनच कधी नव्हे ते ठाणे शहरात भाजपला आमदारकीची चारपैकी एक जागा मिळाली आहे. त्यामुळे इथले भाजप कार्यकर्तेही मुंबईप्रमाणेच युती करू नका, असेच राज्याच्या नेतृत्वाला सांगत आहेत.

अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन- चार दिवसात भेटून, बसून काही ठरवणार असतील तरच युती साकारेल. अन्यथा दोन्ही पक्षांना बाह्या उंचावत एकमेकांच्या अंगावर धावून जावेच लागणार आहे.

– अनिकेत जोशी, 9869004496

LEAVE A REPLY

*