विचलित होतेय निसर्गसाखळी

Email This Post

कृषी उत्पादनासाठी अत्यावश्यक असलेल्या कृमी कीटकांच्या सहअस्तित्वाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्यामुळे उपयुक्त कीटकांची संख्या जगाच्या पाठीवरून वेगाने कमी होत आहे. अभियांत्रिकी आणि तांत्रिक प्रगतीच्या रेट्यात निसर्ग विज्ञानाकडे हेतूपुरस्सर डोळेझाक केल्याने जमिनीच्या वापरात वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे निसर्गसाखळी विचलित झाली असून भविष्यात त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत.

माणूस हा निसर्गसाखळीतील केवळ एक दुवा आहे, परंतु तरीही या वास्तवाकडे डोळेझाक करून त्याने सातत्याने निसर्गाला आव्हान देण्याचा खटाटोप सुरूच ठेवला आहे. कधी वाढत्या गरजांचे कारण सांगून तर कधी अपरिहार्यता पटवून देऊन माणसाने या निसर्गसाखळीत सातत्याने हस्तक्षेप केला आहे.

परंतु तो स्वतःच या साखळीचा घटक असल्यामुळे अंतिमतः तोच अडचणीत येणार असे पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांनी वारंवार बजावले आहे. हत्तीसारख्या महाकाय प्राण्यापासून लहानात लहान बॅक्टेरियांपर्यंत ही प्रचंड निसर्गसाखळी असून त्यातील अनेक दुवे कायमचे हद्दपार झाले आहेत. बरेच जीवजंतू नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत आणि आता जाग आली नाही तर मनुष्यप्राण्याचे भवितव्य धोक्यात येईल, अशी गंभीर अवस्था आहे.

सूक्ष्मात सूक्ष्म किडेमकोडेही जैवसाखळीचा घटक असून ते अनेक प्रकारे माणसाच्या जीवनाला उपकारक आहेत. तथापि या जगातून हे किडे प्रचंड वेगाने नामशेष होत चालले आहेत, हे अनेक संशोधनांवरून स्पष्ट झाले आहे. अंधाधुंद शहरीकरण, औद्योगिकरण, शेतीखालील जमिनीचा बिगरकृषी कारणांसाठी वाढलेला प्रचंड वापर, शेतीतील एकल पीक संस्कृती (मोनोकल्चर), नैसर्गिक अधिवासांचा र्‍हास, रासायनिक कीटकनाशकांचा बेसुमार वापर आणि मोबाईल टॉवरमधून निघणार्‍या रेडिओ लहरी असे अनेक घटक कृमी कीटकांच्या नाशाला कारणीभूत ठरत आहेत आणि नष्ट होत चाललेले अनेक कृमी कीटक मानवी जीवनासाठी हितकारक आहेत.

किडे-कीटक हे शेतीसाठी आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी अत्यंत उपयुक्त असतात. अन्नधान्याच्या उत्पादनात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. पक्षी आणि मधमाशांची संख्याही वेगाने घटत चालली आहे. प्रसिद्ध जर्मन कीटकतज्ञ ऑर्बोइचर ब्रूच यांनी 1989 पासूनच कीटकांच्या संख्येविषयी संशोधन सुरू ठेवले आहे. आरक्षित नैसर्गिक अधिवासात आणि उत्तर राईन-वेस्टफेलियामधील 87 ठिकाणी ते जाळे टाकून ठेवतात आणि कीटकांच्या संख्येचा आढावा वारंवार घेतात.

त्यांनी आपले निष्कर्ष जेव्हा जर्मनीच्या संसदेसमोर मांडले तेव्हा धोक्याची घंटा वाजली. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 1989 च्या मे महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत त्यांनी 1 किलो 600 ग्रॅम कीटक पकडले होते. 2014 मध्ये मात्र त्यांना केवळ 300 ग्रॅमच कीटक मिळाले. जानेवारी 2016 मध्ये ‘कॉन्झर्व्हेशन बायोलॉजी’ नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अहवालावरून स्पष्ट होते की, ज्या क्षेत्रात 1840 मध्ये कीटकांच्या 117 प्रजाती अस्तित्वात होत्या तिथेच 2013 मध्ये केवळ 71 प्रजाती शिल्लक राहिल्या.

ही परिस्थिती केवळ जर्मनीपुरतीच मर्यादित नाही. कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने 2014 मध्ये केलेल्या जागतिक अध्ययनावरून असे स्पष्ट झाले आहे की, कीटकांची संख्या जगभरातून झपाट्याने कमी होत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कीटकांच्या 3 हजार 623 प्रजातींपैकी 42 टक्के प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, असे रोडॉल्फ डर्जो यांनी नमूद केले आहे.

लंडनच्या जिओलॉजिकल सोसायटीने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल असे सांगतो की, कीटकांच्या प्रजाती वेगाने नष्ट होण्याच्या प्रक्रियेचा मोठ्या जनावरांना अन्न मिळण्यावर तसेच शेतीसाठी आवश्यक असलेल्या परागीभवनाच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते, आतापर्यंत केवळ 10 लाख प्रकारच्या कीटकांविषयी माणसाला ज्ञान आहे. अद्याप 40 लाख कीटकांच्या बाबतीत आपल्याला कोणतीही माहिती नाही. त्यातील अनेक प्रजाती आपल्याला माहिती होण्याआधीच नामशेष झाल्या आहेत आणि आणखीही काही नष्ट होणार आहेत. सरकारे आणि कायदे-नियमांची अंमलबजावणी करणार्‍या जगातील यंत्रणांची निसर्गाच्या बाबतीत असलेली प्रचंड उदासीनता पाहिल्यावर वाटते, दूरगामी परिणाम करणार्‍या या घटनांकडे जगाचे लक्ष वेधले जाईल तेव्हा खूप उशीर झालेला असेल.

अन्न आणि कृषी संघटनेच्या 2015 च्या अहवालानुसार आजही जगभरातील 725 कोटी लोक अर्धपोटी झोपतात. यातील 78 कोटी लोक भारतासारख्या विकसनशील देशांत राहतात. आर्थिक संकटांच्या संदर्भात अमेरिकी लेखक मार्क ट्वेन यांनी लिहिले होते की, जमीन खरेदी करा, कारण नवी भूमी सापडणे आता बंद झाले आहे. 19 व्या शतकात त्यांनी हा सल्ला दिला होता. अन्नसुरक्षा धोक्यात येत असताना मार्क ट्वेन यांच्या उद्गारांची आठवण ठेवणे अनेक कारणांनी आवश्यक बनले आहे. हा सल्ला अशास्त्रीय असून नैसर्गिक प्रक्रियांविषयी असलेल्या अज्ञानाचा परिणाम आहे. कारण असे की, नदीला वाहू दिले गेले तर ती जमिनीची निर्मितीसुद्धा आपोआप करते.

गंगेच्या पठारावरील संपूर्ण जमीन अशा प्रक्रियेतूनच बनलेली आहे. पुरातन काळापासून नद्या हेच कार्य करीत आल्या आहेत. या नैसर्गिक प्रक्रियेत अनेकांच्या अभियांत्रिकी हस्तक्षेपामुळे खंड पडला असून नद्यांचे नैसर्गिक कार्य बंद पडले आहे. शेती योग्य जमिनीची निर्मिती होण्याची प्रक्रियाही यामुळेच थांबली आहे आणि अन्नटंचाईच्या संकटाला आमंत्रण मिळाले आहे. जमीन आणि पाणी यांचे सहअस्तित्व कायम राहिले आहे. भांडवली जगात जमीन आणि पाण्याचे सहअस्तित्व नाकारून दोहोंना वेगळे करण्यात आले असून दोन्हींचे वेगवेगळे व्यवस्थापन करण्याचा खटाटोप केला जात आहे. या प्रक्रियेत या दोन्ही नैसर्गिक घटकांचे शोषण होत आहे. नजीकच्या भविष्यात प्रचंड अन्नटंचाईचे संकट आणि पर्यावरणाचा असमतोल अशी संकटे आपल्याला भेडसावतील, अशी स्थिती या अनावश्यक हस्तक्षेपामुळेच निर्माण झाली आहे.

नॅशनल ब्यूरो ऑफ सॉईल सर्व्हे अ‍ॅण्ड लँड यूजिंग प्लॅनिंग आणि इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च यांच्या मते, भारतातील 32.86 कोटी हेक्टर जमिनीपैकी 14.68 कोटी हेक्टर जमिनीचे क्षेत्र अनेक प्रकारांनी होणारा भूमीक्षय आणि मातीची धूप यांनी प्रभावित झाले आहे. ही धूप प्रतिहेक्टर 16.4 टन इतक्या प्रचंड वेगाने होत आहे. सरकार आणि समाज यांची पर्यावरणविषयक अनास्था नजीकच्या काळात मोठ्या संकटांना आव्हान देऊ शकते.

या आणि अशा अनेक हस्तक्षेपांमुळे निसर्गात अनेक बदल होत असून ते मानवनिर्मित आहेत. पृथ्वीचे वाढते तापमान हा मानवनिर्मित बदल आहे, हे सुरुवातीच्या काळातील वसुंधरा परिषदांमधून नाकारले जात असे. नंतर हे मान्य केले गेले, मात्र त्यावरील तोडगे स्वीकारले गेले नाहीत. निसर्गाच्या र्‍हासाला निमित्त ठरणार्‍या मोठ्या घटकांकडे सपशेल डोळेझाक करून लहान घटकांकडे लक्ष वेधण्याचेही डावपेच खेळले गेले आणि खेळले जात आहेत.

या सार्‍या ओढाताणीत निसर्गाचा समतोल बिघडत असून त्यामुळे शेतीसाठी आणि एकंदर मानवी जीवनासाठी अत्यावश्यक असलेले कृमी कीटक मोठ्या संख्येने आणि वेगाने नामशेष होत आहेत. वेळीच या बदलांकडे लक्ष दिले गेले नाही तर आपण आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेऊ, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. निसर्ग विज्ञानाला दिले जात असलेले दुय्यम स्थानच याला जबाबदार असून वैज्ञानिक प्रगतीच्या कैफात निसर्ग विज्ञान हेही एक ‘विज्ञान’च आहे याकडे डोळेझाक केल्यास परिस्थिती सुधारण्याची संधी निसर्ग आपल्याला देणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.

– राजीव मुळ्ये, पर्यावरण  अभ्यासक

1 COMMENT

  1. UPAYUKT MAHITI BADDALDHANYWAD DHARANAN MULE NADILA PUR YENARNAHI SOPIK JAMINTAYYAR HONAR NAHI PRADHANY KASHALDYAVYACHE HE TADNY WELICH THARAVTIL VRAJKARTE AMLAT AANTILHI APEKSHA.

LEAVE A REPLY

*