इंटरनेट सुरक्षेचे जगापुढे आव्हान

Email This Post

नव्या वर्षात सोशल मीडिया, डिजिटल व्यवहार आणि संवाद अधिक सुकर होतील, मात्र सायबर स्पेस सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान असेल आणि त्यासाठी ठोस पावले उचलावी लागतील. अन्यथा अब्जावधी लोकांना सवयीचे झालेले हे माध्यम तितकेच गैरसोयीचे आणि तापदायक ठरू शकेल.

तंत्रसमृद्ध युगात आपण आज जगतो आहोत. इंटरनेट चालवता येत नाही तो अंगठेबहाद्दर अशीच समजूत जगभरात दृढ होत चालली आहे. आपली अनेक कामे इंटरनेटमुळे सुकर होत चालली आहेत आणि मनोरंजनासाठीही सायबर विश्वाचा वापर वाढत आहे. केवळ कॉम्प्युटरच नव्हे तर टॅबलेट आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेट आपल्या खिशात आले आहे. परंतु इंटरनेटचे व्यापक नेटवर्क आणि वेगाने होत असलेला बेलगाम फैलाव यामुळे काही नवे प्रश्नही निर्माण झाले आहेत.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न सुरक्षेचा आहे आणि तोच जगाच्या दृष्टीने सध्या चिंतेचा विषय बनला आहे. जितकी सुविधा इंटरनेटमुळे निर्माण झाली तितकाच धोकाही निर्माण झाला आहे आणि त्या धोक्यापासून इंटरनेट सुरक्षित कसे करायचे, हा यक्षप्रश्न तंत्रज्ञांना सतावतो आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनीही नववर्षानिमित्त जनतेला दिलेल्या संदेशात या धोक्यापासून सावध राहण्याचा इशारा लोकांना दिला आहे. जगातील कोणताही कॉम्प्युटर आज सुरक्षित नाही, अशा शब्दांत त्यांनी या सवयीच्या झालेल्या तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेविषयीची भीती व्यक्त केली आहे.

ते स्वतः कॉम्प्युटर आणि इ-मेलचा कमीत कमी उपयोग करतात, असे सांगण्यात येते. अमेरिकी जनतेशी संवाद साधण्यासाठी ते सामान्यतः ट्विटरचा उपयोग सर्वाधिक करतात. ‘लाईव्ह ट्रेडिंग न्यूज’ मधील एका अहवालात पॉल एबलिंग या तज्ञाने म्हटले आहे, ऑनलाईन कम्युनिकेशनच्या सुरक्षिततेबाबत गेल्यावर्षी केलेल्या अभ्यासांती त्यांना भयावह वास्तव दिसून आले.

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात सांगितले, एखादा महत्त्वाचा दस्तावेज किंवा निरोप कुणाला धाडायचा असेल तर कुरिअर किंवा अन्य पारंपरिक मार्गाने तो पाठवणे कधीही चांगले. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूक प्रक्रियेत रशियाने अनेक वेळा बाधा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अमेरिकी गुप्तचर संघटनांनी केल्याचा उल्लेखही ट्रम्प यांनी केला. गुप्तचर यंत्रणेच्या सहाय्याने रशिया अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करू पाहत असल्याचा आरोप अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनीही केला होता, हे येथे उल्लेखनीय. अमेरिकेसारख्या महासत्तेचे मावळते आणि नवनिर्वाचित अध्यक्ष ज्या प्रकारे या परकीय हस्तक्षेपाबद्दल बोलत आहेत ते पाहता इंटरनेटचे मायाजाल किती सुरक्षित, असाच प्रश्न उपस्थित होतो.

आजच्या युगात इंटरनेटने आपली जीवनशैली, कामाची पद्धत, उत्पादन आणि उपभोग प्रक्रियेसह अनेक गोष्टी बदलून टाकल्या आहेत. त्या सर्वांच्या अंगवळणीही पडल्या आहेत. इंटरनेटच्या वाढत्या आवाक्यामुळे डिजिटल तंत्रज्ञानाचाही विस्तार घडवून आणला आहे. सध्याचा व्यापार, शासन, प्रशासन यंत्रणा यासह अनेक व्यवस्थांचे मॉडेलच आगामी काळात बदललेले असेल, असे मानले जाते. पाणी ज्याप्रमाणे ‘जीवन’ म्हणून आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण ठरते तीच जागा व्यवहारात आता इंटरनेट घेईल, असे दिवस आले आहेत.

या प्रक्रियेत स्मार्टफोनच्या वाढत्या प्रसाराचा महत्त्वाचा वाटा आहे. स्मार्टफोन- मुळे इंटरनेट खिशात सामावले. इंटरनेट युजर्स प्रचंड प्रमाणात वाढले. महानगरांपासून खेडोपाड्यापर्यंत सर्वत्र आज इंटरनेट मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. इंटरनेटच्या सहाय्याने हरघडी बदलत चाललेल्या तंत्रज्ञानावर आधारित जीवनशैली आत्मसात करण्याच्या युगात आपण प्रवेशकर्ते झालो आहोत. परंतु कोणत्याही तंत्रज्ञानाचा विधायक वापर जितका होतो त्याहून कितीतरी अधिक विघातक कामांसाठी वापर होतो, हा मानवी इतिहास आहे.

त्यामुळेच इंटरनेटचा सकारात्मक वापर व्हावा आणि त्याचे व्यवस्थापन विधायक स्वरुपात व्हावे, अशी व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान जगासमोर आहे. केवळ तंत्रामागे धावून चालणार नाही. त्याची सवय लागल्यानंतर मोठे धोके आल्यास ते परतवून लावण्यास आपण सक्षम असायला हवे.

सारा आकड्यांचा खेळ : इंटरनेटवरील सामुग्रीत सर्वाधिक प्रमाण आहे आकडेवारीचे. इंटरनेटच्या केंद्रस्थानी मुळातच आकडे आहेत. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या अहवालानुसार, इंटरनेटवरील आकड्यांचा प्रवाह वर्षाकाठी चाळीस टक्के इतक्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. 2020 पर्यंत ही वाढ पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सिंगापूर येथील ‘ऑरस अ‍ॅनालिटिक्स’च्या अंदाजानुसार, जगभरात इंटरनेटवर टाकल्या गेलेल्या आकड्यांमधील 90 टक्के हिस्सा केवळ गेल्या दोन-तीन वर्षांमधील आहे.

मोबाईलचा वापर इंटरनेट अ‍ॅक्सेससाठी वाढल्यानंतर व्यक्तिगत डाटा वाढत चालला आहे. जगातील इंटरनेट युजर्सपैकी तब्बल 51 टक्के युजर्स एकट्या आशिया खंडात आहेत. केवळ चीनमधील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 1.3 अब्ज एवढी प्रचंड आहे. या देशाची लोकसंख्याच 1.36 अब्ज आहे. म्हणजे जवळजवळ प्रत्येक व्यक्ती इंटरनेट युजर आहे. भारतात मोबाईल वापरणार्‍यांची संख्या सध्या 91 कोटींच्या घरात पोहोचली आहे आणि देशाची लोकसंख्या आहे 1.25 अब्ज. इंटरनेटवर आकड्यांचा प्रवाह वेगाने वाढत आहे.

यासंदर्भातील तज्ञांच्या ‘गार्टनर’ नावाच्या फर्मने अंदाज काढला आहे की, कार, घरे आणि विविध उपकरणे यांच्यासह औद्योगिक उपकरणांसह सुमारे 4.9 अब्ज डिव्हाईस कनेक्टेड झाले आहेत. या फर्मच्या अंदाजानुसार, 2020 पर्यंत हा फैलाव आणखी वाढेल आणि स्मार्ट मीटरपासून ऊर्जासक्षम पथदिव्यांपर्यंत अनेक उपकरणे इंटरनेटशी थेट जोडली गेलेली असतील.

अशा स्थितीत इंटरनेटच्या सुरक्षिततेला किती महत्त्व प्राप्त झाले आहे, याचा अंदाज आपण लावू शकतो. सर्वकाही इंटरनेटशी कनेक्टेड झाले आणि नंतर या माहितीचा दुरुपयोग करणार्‍यांची संख्या आणि प्रताप वाढले तर केवढा मनस्ताप होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

सुरक्षिततेला महत्त्व कशामुळे? : इंटरनेटच्या माध्यमातून संदेशांची देवाणघेवाण सुरू असते. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहारही आता मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. आपण डिजिटल इकॉनॉमीचा स्वीकार करण्याचा निश्चय केला आहे. पैशांचा कमीत कमी वापर करून प्लॅस्टिक करन्सी वापरण्याचा आग्रह केला जात आहे.

देशाच्या संरक्षणविषयक गुपितांसह शासन आणि प्रशासनातील महत्त्वपूर्ण माहिती डिजिटल पद्धतीने सुरक्षित ठेवली जाते. कागदपत्रांची जागा सायबर स्पेसने घेतली आहे. प्रत्येक बाबतीत इंटरनेट युजर्सची संख्या वाढत आहे.

इंटरनेटवर पाहिले जाणारे आणि डाऊनलोड केले जाणारे व्हिडीओ, पाठवण्यात येणारे फोटो यांची संख्या वाढत आहे. गुगलवर केल्या जाणार्‍या सर्चपासून प्रतिसेकंद जगभरात पाठवल्या जाणार्‍या इ-मेलपर्यंत सर्वत्र ही वाढ दिसून येत आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळेच डिजिटल तंत्रज्ञानात क्रांती झाली असून वेगवेगळी अ‍ॅप्स हरघडी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. स्मार्टफोनच्या वाढत्या वापराबरोबर सर्वकाही डिजिटल होऊन जाईल.

तथापि इंटरनेटवरील माहिती हॅक करणार्‍यांची संख्याही त्याच प्रमाणात वाढत असून हॅकर्स आणि सायबर गुन्हेगार या शस्त्राचा विघातक वापर करण्यास टपले आहेत. अनेक चोरवाटा याच तंत्रज्ञानाच्या मदतीने या समाजकंटकांनी तयार केल्या आहेत. महत्त्वपूर्ण माहिती, आकडेवारी, गोपनीय बाबी चोरल्या जाण्याची शक्यता अधिक आहे.

अशा माहितीचा दुरूपयोग होऊ शकतो आणि आर्थिक तसेच अन्य बाबतीत मोठी फसवणूक होण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच ज्या वेगाने डिजिटल व्यवहार आणि इंटरनेटचा वापर वाढेल त्याच प्रमाणात इंटरनेट सुरक्षेविषयी उपाययोजना शोधणे आणि अंमलात आणणे गरजेचे बनते.

– महेश कोळी, संगणक अभियंता

LEAVE A REPLY

*