कसे नेते आणि कसे धर्माचार्य?

Email This Post

राजकारणात बोलघेवड्यांची संख्या कमी नाही. वाटेल तसे बरळून प्रसिद्धीचा प्रकाशझोत स्वत:कडे ओढवून घेण्याची कला साधलेल्या बकबकरामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ‘अरबी समुद्रात शिवस्मारक व्हावे हा मुद्दा शिवसंग्रामने लावून धरला होता. तो प्रश्न सुटला आहे; पण काही लोक त्यात खो घालत आहेत. त्यांनी स्मारकाच्या कामात आडवे येऊ नये, अन्यथा शिवसंग्राम त्यांना आडवे केल्याशिवाय राहणार नाही’ अशी उघडी-नागडी धमकी आ. विनायक मेटे यांनी दिली आहे.

‘मुलींचे छोटे कपडे त्यांच्या छेडछाडीला कारणीभूत होतात. पेट्रोल असेल तिथे आग तर लागणारच’ असे आगजाळू वक्तव्य समाजवादी पक्षनेते अबू आझमी यांनी केले आहे. बेजाबदार धर्ममार्तंडही यात मागे नाहीत. मध्यंतरी एका पीठाच्या शंकराचार्यांनी ‘हिंदूंनी जपमाळेबरोबर भाले हातात घ्यावेत’ असे आवाहन केले होते.

अन्य एका शंकराचार्यांनी दहा अपत्ये जन्माला घालण्याचा सल्ला दिला होता. हे सांगणारे स्वत: मात्र संन्यासी! ‘विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला?’ या म्हणीची आठवण देणारा हा सल्ला आहे. आमदार-नामदार असोत की तथाकथित बाबा, बुवा आणि आचार्य; प्रत्येकच आपापल्या कार्यक्षेत्राच्या मर्यादा ओलांडून नसते सल्ले वा धमक्या देऊन आपली अधिकारकक्षा वाढवण्याचा अवाजवी प्रयत्न करत असावेत का? या सगळ्यांची बेताल व चिथावणीखोर व्यक्तव्ये भारतीय समाजाच्या दृष्टीने कमालीची चिंताजनक आहेत.

काय व कोठे बोलावे याचे तारतम्य कुणीही का पाळू इच्छित नसावे? जाणीवपूर्वक जनतेच्या भावनांना हात घालणारी चिथावणीखोर वक्तव्ये का केली जात असावीत? रोज नव्या घोषणा सरकारकडून केल्या जातात. विकासावर करोडोंचा खर्च होत असल्याच्या जाहिराती केल्या जातात. तरीही विकासाच्या दिशा सर्वत्र धूसर का होत आहेत? ज्या जनतेच्या नावाने हे सर्व केले जाते ती जनता दिवसेंदिवस अधिक असमाधानी का होत असावी? अकारण व अनाधिकाराने बेताल बडबड करून जनतेच्या निराशेत भर घालणार्‍यांना त्यात कोणता आनंद मिळत असेल?

समाजाला विधायक वळण देणे ही नेतेमंडळींची आणि धर्ममार्तंडांची जबाबदारी असताना अनेक नेते विघ्नसंतोषीपणाची भूमिका का घेत असावेत? लोकशाहीत सर्वांनी सर्वांचा सन्मान राखणे अपेक्षित आहे; पण जबाबदारीचे भान सुटलेल्यांच्या बाष्कळ बडबडीमुळे भारतीय समाजात रचनात्मकतेपेक्षा विध्वंसकतेला प्रोत्साहन मिळाल्यास दोष कुणाचा?

ही जंगलराज्याकडे जाणारी वाटचाल तर नव्हे? बेताल वक्तव्यांना टाळ्या पिटणार्‍यांना आणि दाद देणार्‍यांनासुद्धा या परिस्थितीचे आकलन कसे होणार? भारतीय लोकशाहीचे भवितव्य अंधार्‍या बोगद्यात तर प्रवेश करणार नाही ना याचा विचार सद्सद्विवेकबुद्धीने कोण करणार?

LEAVE A REPLY

*