कचरा वेचणाऱ्या राजाबाईंचा मोदींनी केला गौरव

Email This Post

देशदूत डिजिटल विशेष वृत्त

नवी दिल्ली, ता. १ : कचरा वेचण्यातच निम्मे आयुष्य गेलेले. त्यात कचरा वेचक म्हणून समाजाकडून सतत मिळणारी उपेक्षाच वाट्याला आली. अशावेळी स्थानिक नगरसेवकाकडून विचारपूस होणेसुद्धा मोठेपणाचे वाटावे.

मग पंतप्रधानांना भेटणे वगैरे तर दूरदूरपर्यंत स्वप्नवतच. पण पुण्याच्या कचरावेचक राजाबाई धोंडीराम सावंत यांच्याबाबत हे स्वप्न खरे ठरले. नवी दिल्ली येथे झालेल्या इंडोसॅन परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आणि राजाबाईंना आपल्या कामाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत काल नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात  इंडोसॅन अर्थातच स्वच्छ भारत संमेलन संपन्न झाले. यावेळी स्वच्छतेसाठी स्वयंप्रेरणेने पुढाकार घेणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात पुणे येथील स्वच्छ संस्थेशी संबंधित असलेल्या राजाबाई सावंत यांचाही समावेश होता.

 

विज्ञान भवन येथे राजाबाई सावंत (डावीकडून) आणि स्वच्छच्या मंगल पगारे
विज्ञान भवन येथे राजाबाई सावंत (डावीकडून) आणि स्वच्छच्या मंगल पगारे

स्वच्छ ही पुण्यातील कचरा वेचकांनी २००८ साली सहकारी तत्वावर स्थापन केलेली संस्था आहे. कचरावेचक महिलांचांचे प्रश्न मांडत असतानाच, कचऱ्याशी निगडीत विविध समस्यांवर उत्तरे शोधण्याचेही काम या संस्थेने केले. अगदी पुणे महापालिकेसोबत काम करून कचऱ्याची समस्या सोडविण्यासारखी कामेही ही संस्था करते. पुणे शहरात प्राथमिक कचरा व्यवस्थापनाची सेवाही ही संस्था पुरविते.

कचरा वेचणाऱ्या महिलाच या संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यही झाल्या. राजाबाई अशांपैकीच एक. त्या आता व्यवस्थापकीय संचालिका आहेत. स्वयंप्रेरणेने कचरा प्रश्नावर समर्थपणे काम करत आहेत.  स्वच्छ भारत अभियानातही या महिलांची आणि स्वच्छ संस्थेची महत्वाचे योगदान राहिले आहे.

याच कामाची पोचपावती म्हणून काल विशेष पुरस्काराच्या रुपाने राजाबाईंसारख्या धडाडीच्या महिलांना मिळाली. यासंदर्भात संस्थेच्या कार्यकर्त्या मंगल पगारे ’देशदूत डिजिटल’ला प्रतिक्रिया देताना म्हणाल्या,‘ कचरा वेचणाऱ्यांची समस्या फार मोठी आहे. त्यांचे जगण्याचे अनेक प्रश्न आहेत. मात्र तेच खरे स्वच्छतादूत होऊ शकतात. स्वच्छ संस्थेने आणि या महिलांनी त्यांच्या कामातून हेच दाखवून दिले आहे.’

 

LEAVE A REPLY

*