लग्नाच्या वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

Email This Post

सिन्नर/वडांगळी, ता. १९ :  वडांगळीत स्वत:ची शेती सांभाळून टेलरिंगचे काम करणारे सोमनाथ ठोक यांच्या घरात सुनिता, कल्पना व योगेश यांच्यानंतर 17 ऑक्टोबर 1991 रोजी संदिपचा जन्म झाला.

चौथी पर्यंतचे शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत घेतल्यानंतर 10 वीपर्यंतचे शिक्षण त्याने वडांगळीच्या न्यु इंग्लिश स्कुलमध्ये घेतले. इथे शिकतानाच सैन्यात जाण्याचे स्वप्न तो पाहू लागला होता. किमान कौशल्य हा विषय घेऊन सिन्नर महाविद्यालयात 11 वी, 12 वीचे शिक्षण त्याने पूर्ण केले. त्यानंतर संगमनेरच्या तंत्रनिकेतनमध्ये त्याने प्रवेश घेतला. मात्र, त्याचे मन तेथे रमत नव्हते.

तिथले शिक्षण अर्धवट सोडून सैन्य दलात जाण्यासाठी शारीरिक कसरती त्याने सुरु केल्या. जवळपास 9 वेळा सैन्य दलाच्या भरतीत तो अयशस्वी ठरला. तरीही त्याने जिद्द सोडली नाही. दहाव्या प्रयत्नात जुलै-2014 मध्ये 6 बिहार रेजिमेंटमध्ये स्वयंपाकी (कूक) म्हणून त्याची निवड झाली. बिहारनंतर काही महिने बेंगलोर, पश्चिम बंगाल, भुतानमध्ये त्याची नियुक्ती झाली.

जुन महिण्यातच तो 28 दिवसांच्या सुट्टीवर खडांगळीत आला होता. तेथे असतांनाच जम्मू काश्मिरच्या उरी मुख्यालयात बदली झाल्याने 5 जुलै रोजी तो थेट उरीकडे रवाना झाला होता. त्याने विवाह करावा यासाठी त्याचे कुटुंबिय एक-दिड वर्षांपासून त्याचे मन वळवण्याचे प्रयत्न करीत होते. मात्र, अजुन आपल्याला लग्न करायचे नाही असे म्हणत तो लग्नाचा विषय टाळत होता. आत्ताच्या सुट्टीत लग्न करण्यासाठी तो राजी झाला होता.

28 सप्टेंबर रोजी खास सुट्टी घेऊन पुन्हा खडांगळीला येण्याचे आश्वासन देऊनच संदिप उरीला गेला होता. 8-10 दिवसात संदिप येणार म्हणून त्याच्यासाठी मुली शोधण्याची कुटुंबियांची लगीन घाई सुरु होती. या सुट्टीत साखरपुडा आणि दिवाळीनंतर लग्नाचा बार उडवण्याचं स्वप्न पाहणार्‍या ठोक कुटुंबियांचं स्वप्नंच उरीच्या हल्ल्यानं उध्वस्त केलंय.

संदिपच्या लग्नाची वरात काढण्याऐवजी त्याची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याने ठोक कुटुंबियांबरोबरच त्यांच्या आप्तेष्टांचा आक्रोश अंगावर काटा आणत होता. या सुट्टीत घरीत आल्यानंतर बुलेट घेणार असल्याचे त्याने आपल्या मित्रांना सांगितले होते. मात्र, त्याचे हे स्वप्नही अपूर्ण राहिल्याचे सांगतांना त्याच्या मित्रांनाही अश्रू अनावर होत होते. सर्वांशी मिळून मिसळून वागणारा, मनमिळावू स्वभावाचा मित्र आपण गमावल्याची भावना संदिपच्या घराजवळ जमलेले मित्र व्यक्त करीत होते.

हुतात्मा संदीप ठोक यांचे घर
हुतात्मा संदीप ठोक यांचे घर

1 COMMENT

LEAVE A REPLY

*