46 हजार कोटींचा रस्ता करता मग कर्जमाफी का नाही?

घोटी-सिन्नर-शिर्डी महामार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी

0
नाशिक : मुंबईहून नागपूरला जाणारे सध्या तीन मार्ग उपलब्ध असताना एवढे मोठे खर्चिक प्रकल्प कशासाठी राबवले जात आहेत, हा खरा शेतकर्‍यांचा प्रश्न आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी तब्बल 46 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एकीकडे शेतकर्‍यांच्या शेतमालाला भाव नाही.

तूर खरेदी बंद केली आहे. द्राक्ष, कांद्याला भाव नाही. अशा विवंचनेत शेतकरी असताना 46 हजार कोटी रुपये खर्चून कोणाची समृद्धी साधणार, असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प न करता जुन्या घोटी- सिन्नर-शिर्डी महामार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे किंवा हा मार्ग पुण्यामार्गे वळवण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
प्रस्तावित मुंबई-नागपूर कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस-वेच्या माध्यमातून शासनाने शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करण्याचा कट रचला असून शेतकर्‍यांचा फायदा नसणारा विकास आम्हाला नको असल्याचे सांगत तालुक्यातील शिवडेसह डुबेरेकरांनी एक्स्प्रेस वे सर्वेक्षणाचे काम बंद पाडले आहे. शासनाने मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्रावर टाच आणण्याऐवजी सध्या अस्तित्वात असलेल्या घोटी-सिन्नर-शिर्डी या महामार्गाचेच रुंदीकरण करावे.

तसेच सध्याच्या नागपूर महामार्गाची सुधारणा करावी, असा सल्ला बाधित गावांतील शेतकर्‍यांनी दिला असून आमच्या या मागणीचा विचार व्हावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. प्रस्तावित मुंबई-नागपूर कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस वेसाठी भूसंपादनाची पूर्वतयारी म्हणून सिन्नरसह इगतपुरी तालुक्यात सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ड्रोनच्या सहाय्याने सुरू असणार्‍या या सर्वेक्षणाला तालुक्यातील शिवडे आणि परिसरातील शेतकर्‍यांनी जोरदार विरोध करत काम बंद पाडले होते.

त्यानंतर संतप्त शेतकर्‍यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आपला विरोध प्रकट केला. या एक्स्प्रेस-वेमुळे होणारा विकास शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावणारा ठरेल, असे अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र शिवडे हे शंभर टक्के बागायती गाव असून येथील शेतकरी सधन आहेत.

शासनाने मुंबई-नागपूर जवळ करण्यासाठी शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करण्याचा कट रचला असून आमचा फायदा नसणारा विकास नको, अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पासाठी जमिनी देणार नसून शासनानेही आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा यावेळी शेतकर्‍यांनी दिला होता. दरम्यान ‘समृद्धी’ हा नवा महामार्ग इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांना बेघर करणारा आहे.

त्यामुळे नवीन महामार्गाऐवजी घोटीजवळील साकूर येथे प्रस्तावित स्मार्ट सिटी येथून हा महामार्ग घोटी-सिन्नर हायवेला जोडण्यात येऊन त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. सिन्नर-शिर्डी हायवेचे चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू असून हा महामार्ग शिर्डी हायवेला जोडून त्यालाच सहापदरी करावे. त्यामुळे शेकडो हेक्टर जमिनी वाचणार असून भूसंपादनातदेखील फारसा अडथळा येणार नाही, असे मत काही शेतकर्‍यांनी मांडले असून त्यांच्या या मताचादेखील विचार होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

*