281 शिक्षकांनी घेतले प्रशिक्षण

0

मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडेकडून उपक्रमाचे कौतुक

कोपरगाव (प्रतिनिधी) – पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना मूळाक्षरे ओळखण्याची नवी पद्धत, गणिताचे पाढे पाठ करण्याची नवनवीन संकल्पना, विद्यार्थी-शिक्षकातील दरी कमी करणे, नवनवीन शैक्षणिक ज्ञान-तंत्रज्ञान, मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षण, विद्यार्थ्यांच्या अतंरमनाचा अभ्यास, सकारात्मक प्रतिसाद, बोलण्याचे धाडस, स्टेजची भीती, खेळातून प्रेरणा अशा विविध युक्त्या जिल्हा परिषद शिक्षकांना देणारी तालुका कार्यप्रेरणा परिषद (कार्यशाळा) रविवारी कोपरगावमध्ये पार पडली. या परिषदेतून मिळालेली ऊर्जा, अनुभव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना प्रेरणादायी ठरणार आहे. जि. प. सदस्य तथा शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे यांच्या पुढाकारातून ही परिषद पार पडली. विशेष म्हणजे सुट्टी दिवशीही स्वयंस्फूतीने शिक्षक या ठिकाणी हजर होते.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत कोपरगाव तालुका कार्यप्रेरणा परिषदेचे तीन दिवसीय प्रशिक्षण इयत्ता पहिली आणि दुसरीच्या तालुक्यातील 281 जिल्हा परिषद शिक्षकांसाठी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात आयोजित करण्यात आले होते. या परिषदेचा सांगता समारंभ रविवारी झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यासह गटशिक्षणाधिकारी शबाना शेख व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे म्हणाले, पुढील काळात जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांसमोर मोठे आव्हान राहणार आहे. जिल्ह्यात शिक्षक अतिरिक्त व विद्यार्थी कमी अशी परीस्थिती झाली आहे. ग्रामीण भागात जनतेने आपल्या पाल्यांना जि.प. शाळेत घालावे यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करून शाळेची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी जि. प.च्या शिक्षकांना परिश्रम घ्यावे लागणार आहेत. खाजगी शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शिक्षकांनी बदल स्वीकारणे आवश्यक आहे. मुलांमध्ये गणित व विज्ञानाची आवड निर्माण करावी. चालू वर्षी सुद्धा जिल्हा परिषद इस्रोची संकल्पना राबविणार असून त्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे. मुलांना मोबाईल, टँबकडून क्रीडांगणाकडे वळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

परजणे म्हणाले, समाजाच्या डोक्यात शिक्षकाबद्दल असणारी प्रतिमा बदलेणे गरजेचे आहे. या कार्यप्रेरणेतून शिक्षकांची मानसिकता बदलेल. जिल्हा परिषद शिक्षकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत टाकावे. त्यामुळे समाजाची जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याची मानसिकता बदलेल. तालुक्यात केंद्रप्रमुख, दोन विस्तार अधिकारी यांच्या जागा रिक्त असून त्या कार्यकारी अधिकार्‍यांनी तातडीने भरून द्याव्यात अशी मागणी प्रास्ताविक करताना शबाना शेख यांनी केली.

 तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील मुलांच्या प्रगतिपुस्तकावरील अप्रगत शब्द काढण्याचा संकल्प समिती सदस्य राजेश परजणे यांनी सोडला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी पट वाढला असून तालुक्यातील 299 विद्यार्थी खाजगी इंग्रजी शाळेतून जिल्हा परिषद शाळेत नव्याने दाखल झाले आहेत. शिक्षकांना या कार्यप्रेरणा परिषदेतून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थांना होणार असून जिल्हा परिषद शिक्षक या माध्यमातून कात टाकणार आहेत. कोपरगाव तालुक्यातील शिक्षकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे यांनी खास कौतुक केले. 

 यंदापासून शिक्षण विभाग ग्लोबलनगरी ही नवी संकल्पना प्रत्येक तालुक्यातील दोन शाळांमधून राबवणार आहे. या संकल्पनेत अमेरिका, ऑस्टेलिया या ठिकाणी असणार्‍या मूळच्या नगरच्या नागरिकांशी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून थेट संवाद साधला जाणार आहे. यात परदेशातील शाळा, पर्यावरण विषयक झालेली कामे यावर थेट चर्चा होणार आहे. त्यातून जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना यशाचा राजमार्ग सापडेल असा विश्‍वास बिनवडे यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*