27 सबस्टेशन मध्यवर्ती नियंत्रणात

0

नाशिक : शहराला प्रामुख्याने अवकाळी पाऊस, पावसाळी हंगाम आणि काही मानवनिर्मित अपघात यात वीजपुरवठा करणार्‍या तारांचे जाळे अधिक प्रभावित होते. त्याचा फटका ग्राहकांना आणि महावितरण कंपनीलाही बसत असतो. शहरात 27 उपकेंद्रांमार्फत वीज घरे, आस्थापना, बाजारपेठा, औद्योगिक वसाहती, संस्थांमध्ये खेळवली जाते. या सर्व वीज उपकेंद्रांना एकाच मध्यवर्ती ठिकाणाहून नियंत्रित करू शकणारी यंत्रणा सुपरवायजरी कंट्रोल अँड डेटा अ‍ॅक्विझिशन सिस्टिम अर्थात स्काडा महावितरणकडून उभारण्यात आलेली आहे.

ती लवकरच कार्यान्वित होत आहे. ही ऑनलाईन यंत्रणा विजेचा दाब, तांत्रिक बिघाड, केंद्रांना वितरित होणारी वीज यांचे नियंत्रण मध्यवर्ती ठिकाणी असणार आहे. त्यासाठी उभारण्यात येत असलेल्या स्काडा सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. या केंद्राची पाहणी केंद्रीय ऊर्जा विभागाचे सचिव पी. के. पुजारी यांनी नुकतीच केली. जलरोड परिसरात असलेल्या स्काडा सेंटरला सध्या प्रायोगिक तत्त्वावर 5 केंद्रे उभारण्यात आली आहेत.

शहरात वीज वितरणाचे एकूण 27 उपकेंद्रे असून त्याद्वारे वीजपुरवठा केला जातो. या सर्वच उपकेंद्रांचे नियंत्रित एकाच ठिकाणी करण्यासाठी मध्यवर्ती यंत्रणा अर्थात स्काडा सेंटर हे जेलरोड परिसरात शिवाजीनगरमध्ये उभारण्यात आले आहे. सध्या शहरातील पाच उपकेंद्रे या सेंटरला जोडून महावितरण येथे विजेचा दाब, तांत्रिक बिघाडांचे अवलोकन करीत आहे. त्यामुळे कोणत्या भागात कोणत्या सबस्टेशनच्या परिघात किती वीज मागणीची, पुरवठ्याची स्थिती फिडरनिहाय मिळणार आहे.

याचे नियंत्रण महावितरणच्या मुख्य अभियंत्यांसह शहरातील कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांच्या संगणकावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अखंडित वीजपुरवठा आणि तत्पर ग्राहकसेवा हे दोन प्रमुख उद्देश यातून साध्य होणार आहे. शहरातील उर्वरित 22 उपकेंद्रे या मध्यवर्ती सेंटरला जोडण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे येत्या दोन-अडीच महिन्यात स्काडा सेंटर सुरू होईल, अशी चिन्हे आहेत.

मध्यवर्ती नियंत्रण केंद्रात उपकेंद्रात कोणत्या सबस्टेशनवर वीज दाब पुरवठा कसा सुरु आहे. त्या पुरवठ्याची सद्यस्थिती, कोणत्या भागात किती कंझम्पशन होत आहे, वीजपुरवठ्यात आलेले अडथळे आदी बाबी ऑनलाईन पाहता येणार आहेत. सद्यस्थिती ऑनलाईन पाहण्यासोबतच संबंधित उपकेंद्रातील वीजपुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याची प्रणालीही स्काडा सेंटरमधून उपलब्ध होणार आहे.

या प्रणालीमुळे वीज खंडित होण्याचे ठिकाण व कारण लगेच कळणार असल्याने दुरुस्तीही तातडीने होऊ शकेल. वाहिनीवरील बिघाड शोधण्यासाठी सध्या लागणारा वेळ या प्रणालीमुळे वाचणार आहे.

स्काडा सेंटरसंदर्भात नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर व पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता भुजंग खंदारे यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी परिश्रम घेतलेले आहे, असे जनसंपर्क अधिकारी विजय दूधभाते यांनी सांगितले. नुकताच केंद्रीय ऊर्जा सचिव पुजारी यांनी प्रकल्पाला भेट दिली होती.

त्यानीही या प्रकल्पाबाबत सांगताना म्हटले होते की, ग्राहकांना विनाखंडित व तत्पर सेवा देण्यात ही यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी त्याच्या उपस्थितीत एका उपकेंद्रातील वीजपुरवठ्यावर नियंत्रण मिळवण्याची चाचणी करण्यात आली.

यावेळी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे प्रदीप कुमार, महावितरणचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर येरमे, मुख्य महाव्यवस्थापक (प्रशिक्षण व सुरक्षा) रंजना पगारे, प्रभारी अधीक्षक अभियंता अभिमन्यू चव्हाण, कार्यकारी अभियंता देवेंद्र सायनेकर, एस. एस. सवाईराम, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश लंभाते, उप कार्यकारी अभियंता अजय सुळे आदी उपस्थित होते. .

LEAVE A REPLY

*