214 शाळांमधील वर्ग खोल्या धोकादायक : विद्यार्थ्यांना अन्यत्र हलविण्याचे आदेश

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील धोकादायक असलेल्या 214 शाळांच्या इमारती निर्लेखनाअभावी आहेत. या धोकादायक इमारती अचानक कोसळून दुर्घटना होण्याचा धोका आहे. निर्लेखनाचे काम रखडल्याची कबुली मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी दिली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे जिल्ह्यात मोडकळीस आलेल्या इमारतींची कोणतीही स्पष्ट माहिती नाही. निंबोडी घटनेनंतर माने यांनी मोडकळीस आलेल्या इमारतींची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.
निंबोडी घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत अध्यक्षा शालिनीताई विखे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी माने संयुक्तपणे पत्रकार परिषदेला समोरे गेले. यावेळी त्यांना जिल्ह्यातील धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या शाळा खोल्यांची संख्या किती, याबाबत विचारणा झाली. त्यावर या शाळांऐवजी जिल्ह्यातील निर्लेखन करण्यात येणार्‍या शाळांमधील वर्ग खोल्यांची माहिती माने यांनी दिली.
दोन वर्षांपूर्वी 434 शाळा निर्लेखित करण्याचे ठरले होते. त्यापैकी 230 शाळा पाडण्यात आल्या. अजूनही 214 शाळांचे निर्लेखन होणे बाकी असे त्यांनी सांगितले.
शिक्षण समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी यासंदर्भात वारंवार माहिती विचारूनही त्याकडे शिक्षण विभागाचा कानाडोळा झाला असल्याचा आरोप यावेळी सदस्य शिवाजी गाडे यांनी केेला.
……………
शिर्डीच्या साई संस्थानने इतर जिल्ह्यातील शाळांसाठी निधी देऊ केला आहे. नगर जिल्ह्यासाठी निधी मागितला असता अजूनही निधी मिळाला नाही. इतर जिल्ह्याला निधी दिला जातो तर मग नगरला का नाही?. याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही वारंवार मागणी केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अध्यक्षा विखे यांनी केली.
…………..
जिल्ह्यात धोकादायक असलेल्या 214 शाळामधील वर्गा न भरविता त्या मंगल कार्यालये, सोसायट्यांचे हॉल, सभामंडपात शाळा भरविण्याचे आदेश मंगळवारी देण्यात आले आहेत. आता जिल्हा परिषद प्रशासन 2010, 2000 आणि 1990 पूर्वी बांधण्यात आलेल्या शाळांच्या इमारतींची माहिती संकलित करण्यात येणार असल्याचे माने यांनी यावेळी स्पष्ट केले.
……………..
मराठा महासंघाचे राज्याचे संपर्कप्रमुख संभाजी दहातोंडे यांनी मंगळवारी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेत निंबोडीत दुर्घटनेत मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना भरवी मदत द्यावी, जखमीवर सरकारी खर्चातून उपचार करावेत अशी मागणी केली. त्यावर तावडे यांनी याबाबतच अहवाल मागवला असून सरकार पातळीवर योग्य निर्णय घेवून कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दहातोंडे यांना दिले.
………….
5 सप्टेंबरला जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हास्तर 14 शिक्षकांना जिल्हा पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. मात्र, निबोंडीच्या घटनेमुळे यंदा हा पुरस्कार वितरण कार्यक्रम आणि निवड प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विजयादशमीनंतर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि प्रशासन एकत्र बसून याबाबत निर्णय घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
…………..
निबोंडी येथील दुर्घटनेच्या पार्श्‍वभुमिवर जिल्हा प्रशासनाने धोकादायक व मोडकळीस आलेल्या वर्गात शाळा न भरविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेसह मनपा व नगरपालिकांच्या शाळांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

*