नामांकित शाळांसाठी पुन्हा आवाहन ; 180 पैकी अवघे 40 शाळांचे प्रस्ताव मान्य

0
नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या नामांकित शाळा योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परंतु त्या प्रमाणात शाळा विभागाशी संलग्न नसल्याने या शाळांसाठी पुन्हा आवाहन करण्यात आले आहे. यंदा राज्यातून 180 नवीन शाळांनी प्रस्ताव दाखल केले होते.

परंतु त्यापैकी केवळ 40 प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्याची माहिती आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांनी दिली. नामांकित शाळा प्रवेश योजनेनुसार आदिवासी विकास विभागाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश दिला जातो.

मागील वर्षी 25 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेनुसार प्रवेश देण्यात आले होते. यंदा आणखी 20 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. जास्तीत जास्त शाळा आदिवासी विभागाशी जोडल्या जाव्यात यासाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार नवीन 180 शाळांनी विभागाकडे प्रस्ताव दाखल केले. त्यात पाहणी केल्यानंतर केवळ 40 शाळांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज जास्त आल्यास या शाळांची संख्या कमी पडेल हे लक्षात घेऊन आता पुन्हा नवीन शाळांकडून प्रस्ताव मागवण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. त्यानुसार आणखी शाळांना मान्यता देत आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.

दरम्यान, नाशिक प्रकल्पात 750 हून अधिक विद्यार्थ्यांनी नामांकित शाळेत प्रवेश मिळावा म्हणून अर्ज केले आहेत. त्यांचीही छाननी सुरू असून लवकरच त्याची प्रवेश यादी लावण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*