चांदवड, दि. 28 (प्रतिनिधी) - ग्रामिण भागात, लग्न होऊनही शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात जाणार्या 20 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करुन तिला दगडाने मारहाण करीत विहीरीत ढकलून देणार्या राहुड (ता. चांदवड) येथील तुकाराम भागा ठाकरे (28) याचा संतप्त ग्रामस्थांनी काल रात्री केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला.
या खळबळजनक घटनेची माहिती अशी की, सासरच्या मंडळीने प्रोत्साहन दिल्याने ही विवाहीता चांदवडच्या कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे ती मंगळवारी सकाळी कॉलेजात गेली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळेच सासरच्या मंडळीने ग्रामस्थांच्या मदतीने तिची शोधाशोध सुरू केली. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एका शेतातील विहिरीमधून त्या विवाहितेचा बचावासाठी धावा करणारा आवाज आला. ग्रामस्थांनी त्या दिशेने धाव घेऊन विवाहितेला विहिरीबाहेर काढले. रक्तबंबाळ झालेल्या या तरुणीच्या डोक्याला व हातापायाला मार लागलेला होता. विहिरीबाहेर काढतांना ती विवाहिता बेशुद्ध झालेली होती. आज (दि. 28) सकाळी या विवाहितेने आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती दिली. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त होऊन संबंधित तरुणाला शोधायला धावले.
ही विवाहिता कॉलेजला शेतरस्त्याने ये-जा करत असे. ती मंगळवारी सायंकाळी कॉलेजातून या रस्त्याने परतत असताना तिला तुकाराम ठाकरे याने अडवले. तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला दगडाने मारहाण केली आणि कोरड्या विहीरीत ढकलून दिले. ही माहिती त्या तरुणीने देताच संतप्त झालेल्या गावकर्यांनी मध्यरात्रीच तुकारामचा शोध सुरू केला. रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास तुकाराम स्वत:च्या घरातच दडून बसलेला जमावाच्या हाती लागला. त्याला बेभान जमावाने लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. त्याला उपचारासाठी चांदवड रुग्णालयात नेण्यात आले, तेथून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. |