मुंबई महापालिकेवरील सत्ता राखण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली असून, उद्धव ठाकरे यांच्याऐवजी युवानेते आदित्य ठाकरे याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याचा विचार गंभीरपणे सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अलीकडे सातत्याने अपयश आल्याने आदित्य ठाकरे याच्यावर जबाबदारी टाकण्याचा विचार पुढे आला असून, खुद्द शिवसेनाप्रमुखांनीही त्याला हिरवा कंदील दाखवल्याचे समजते.
लोकसभा, विधानसभा तसेच नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला दारुण पराभव पत्करावा लागला. शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याहाती आल्यापासून त्यांना राजकारणामध्ये आपला प्रभाव दाखवता आला नाही. त्यातच आता हातची मुंबई महापालिका जाऊ द्यायची नाही, असा चंग शिवसेनेने बांधला असून, कोणत्याही परिस्थितीत पुन्हा महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी वेगवेगळी गणिते मांडली जात आहेत. ज्योतिषांचे सल्लेही घेतले जात आहेत. त्यानुसार येणारा निवडणुकीचा काळ उद्धव ठाकरे यांना कठीण असून, आदित्य ठाकरे याच्यासाठी हा काळ अनुकूल असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच आदित्यच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवावी आणि उद्धव ठाकरे यांनी पडद्यामागून सर्व सूत्रे हाताळावीत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रत्येक शाखांच्या माध्यमातून राबवल्या जाणार्या कार्यक्रमांना उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आदित्य हा हजेरी लावत आहे. राजकारणाच्या मध्यवर्ती प्रवाहात प्रवेशासाठी महापालिका निवडणूक हा चांगला मुहूर्त असल्याने त्याच्यावरच अधिक जबाबदारी टाकण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला असल्याचे या नेत्याने सांगितले. |