|
| पुणे जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष निवडीत राडा |
|
| Pune(28-July-2010) |
Tags : Political,National,Maharashtra |
पुणे, दि. 27 (प्रतिनिधी)- पुणे जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठी येथील कॉंग्रेस भवनात मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये कॉंग्रेसच्याच पुरंदर तालक्यातील दोन गटांमध्ये धुमश्चक्री झाली. यामध्ये संजय जगताप यांच्या कार्यकर्त्याने माजी आमदार संभाजी कुंजीर यांना खुर्च्यांनी व लाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामध्ये कुंजीर हे जखमी झाले.
दरम्यान या गोंधळातच विद्यमान जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी यांची पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. पुण्यातील कॉंग्रेस भवन हे अहिंसेचे प्रतीक बनेल असा विश्वास महात्मा गांधींनी पुण्यात आले तेव्हा व्यक्त केला होता. मात्र त्याच कॉंग्रेस भवनात वारंवार अहिंसेचे बळी गेल्याची प्रचिती आली आहे. कॉंग्रेस शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगरसेवक दीपक मानकर यांच्या समर्थकांनी थेट पुण्यातील कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खादार सुरेश कलमाडी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही कॉंग्रेसभवन देशभर गाजले होते. आज माजी मंत्री व जिल्हा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्षपदासाठीची बैठक दुपारी दोन वाजता कॉंग्रेसभवनमध्ये सुरू झाली. यंदा भन्साळी यांची फेरनियुक्ती होऊ नये व आपली या पदावर वर्णी लागावी म्हणून माजी आमदार व पक्षाचे पुरंदर तालुक्यातील नेते संभाजी कुंजीर यांनी कंबर कसली होती, तर पुरंदर तालुक्यातील विधान परिषदेचे माजी आमदार चंदूकाका जगताप यांचीच निवड अध्यक्षपदी व्हावी यासाठी पुरंदरमधील जगताप समर्थक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोर धरला होता. तसेच अनंतराव थोपटे गटाचे मानले जाणारे देविदास भन्साळी यांनीही फेरनियुक्तीसाठी प्रयत्न चालविले होते. बैठकीमध्ये अध्यक्ष थोपटे यांच्याकडे भन्साळी व जगताप यांना विरोध करीत त्यांची बाजू मांडण्यासाठी कुंजीर उभे राहिले आणि काही क्षणातच जगताप गटाच्या 7-8 कार्यकर्त्यांनी कुंजीर यांना लाथाबुक्क्यांनी व खुर्च्यांनी मारहाण केली. अनेक खुर्च्यांची मोडतोड करण्यात आली. कुंजीर समर्थकही जगताप समर्थाकांवर धावून गेले. या तुंबळ हाणामारीमुळे काहीकाळ बैठकीचा आखाडा झाला होता. या गोंधळामुळे निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी सभागृहाबाहेर गेले. अन्य नेत्यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात सभेचे कामकाज थांबविण्यात आले. दरम्यान कुंजीर यांनी आपल्याला गुंडांकडून मारहाण करण्यात आल्याचा व त्यामध्ये संजय जगताप व पक्षनेत्यांचा हात असल्याचा आरोप केला. पक्षाची नेते मंडळी चुकीच्या आणि अयोग्य व्यक्तींना संरक्षण देत आहेत, असा आरोप केला. |
प्रिंट काढा |
|
|
|