जळगाव,दि.27(प्रतिनिधी)- नेट/सेट परीक्षेचे तंत्र आत्मसात करतांना नियोजन, मेहनत, मार्गदर्शन व जे करतो त्याविषयीचा उत्तम भाव या चतु:सुत्रीचा अवलंब केला तर यश निश्चित प्राप्त होते असे प्रतिपादन कुलगुरु प्राचार्य डॉ.के.बी.पाटील यांनी केले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारीता विभागाच्या वतीने आयोजीत तीन दिवसीय राज्यस्तरीय नेट/सेट परीक्षेच्या पहिल्या पेपरच्या मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.कमलाकर पायस, विभागप्रमुख डॉ.सुधीर भटकक्षर, प्रा.विनोद निताळे उपस्थित होते.
पुढे बोलतांना कुलगुुरु प्राचार्य डॉ.पाटील म्हणाले की, कोणत्याही कार्यात यश मिळवायचे असेल तर आपल्या मनात त्याविषयी उत्तम भाव जागृक असला पाहिजे. आपण जे ही कार्य करतो ते प्रामाणिकपणे करणे व सातत्याने करणे आवश्यक आहे. सेट/नेट परीक्षेचा अभ्यास करतांना फक्त परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठही अभ्यास करायचा नाही तर यशस्वी शिक्षक होण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. केवळ परीक्षेत यश मिळाले म्हणजे हूरळून न जाता आपल्याला अभ्यासातून नेमके काय मिळाले याविषयी चिंतन करणे गरजेचे आहे. उत्तम शिक्षक होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज असते ते मी आत्मसात करेल हा भाव प्रत्येकाने जपण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ.सुधीर भटकर यांनी नेट/सेट कार्यशाळा आयोजना मागील उद्देश स्पष्ट केला. सुत्रसंचालन प्रा.विनोद निताळे यांनी तर आभार श्री.सोमनाथ वडनेरे यांनी मानले. कार्यशाळेला 80 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. |