- श्रीगोंदा तालु्नयातील बेलवंडी शिवारातील पारधी समाजाच्या राजू काळे यांच्या घरास आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन बालकांचा करुण अंत झाला आहे. आज (ता.10) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
राजू काळे हे कामानिमित्त शेतात गेले असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांच्या छपराच्या घरास अचानक आग लागली. त्यात सुजित (वय 7) व नीलेश (वय 4) यांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडेदेखील जळून खाक झाले. काळे हे सासरे जंबू चव्हाण यांच्या शेतात राहत होते. घरास आग नेमकी कशाने लागली याचे कारण समजले नाही. घटनेचे वृत्त समजताच विभागीय पोलिस अधिकारी संदीप जाधव, पोलिस निरीक्षक मधुकर औटे, उपनिरीक्षक अनिल जाधव यांनी घटनास्थळास भेट दिली. तहसीलदार बी. एस. बावीसकर यांनी पंचनामा केला. दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाला असून, रुपये बारा हजार किमतीची धान्य, भांडी, कपडे जळून नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. आगीत होरपळून मृत्यू पावलेल्या दोन्ही मुलांची उत्तरीय तपासणी जागीच करण्यात आली. घटनेची माहिती कळताच पारधी समाज संघटना व बालहक्क अभियानाचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. काळे कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले. दोन कोवळी मुले आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. |