अहमदनगर, दि. 10 - बारावीच्या वाणिज्य शाखेतील वाणिज्य संघटन विषयाचा उत्तरपत्रिकेचा गठ्ठा रेल्वेखाली गेल्याने सुमारे साठ उत्तरपत्रिका तपासण्याच्या स्थितीत राहिल्या नाहीत, तर काही उत्तरपत्रिकांचे तुकडे झाले. त्यामुळे या उत्तरपत्रिका पुणे शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आल्या आहेत.
पुणे विभागातील पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यांतील 12 वीच्या परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासण्यासाठी त्या परीक्षकांकडे पाठविल्या जातात. या उत्तरपत्रिका रेल्वेने नगरच्या रेल्वेस्थानकावर आल्या. तेथील कर्मचार्यांनी त्या रेल्वेतून खाली उतरून घेत असताना त्यातील वाणिज्य शाखेतील वाणिज्य संघटन विषयाच्या सुमारे 300 उत्तरपत्रिकेचा गठ्ठा रेल्वेच्या खाली पडला व त्यावरून रेल्वे गेल्याने त्यातील सुमारे 50 ते 60 उत्तरपत्रिका खराब झाल्या आहेत. त्यातील काहींचे तुकडे झाले. रेल्वे पोस्ट विभागाने गठ्ठे मोजले असता एक गठ्ठा कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याचा शोध घेणे सुरू झाले. ही शोध मोहीम सुरू असताना एक गठ्ठा रेल्वेच्या रुळावर असल्याचे लक्षात आले. तो गठ्ठा घेतल्यानंतर कर्मचार्यांनी फाटलेल्या कपड्यास नवीन कापड टाकून त्याला मोहरबंद केले. पूर्वीसारखा दिसणारा गठ्ठा तयार केल्यानंतर तो पोस्टमनने न्यू आर्ट्स महाविद्यालयात दिला. संबंधितांनी उत्तरपत्रिकेचा गठ्ठा तपासण्यासाठी शिक्षकाकडे देण्यासाठी उघडला असता त्यातील उत्तरपत्रिकेचे तुकडे झाल्याचे लक्षात आले. त्यातील 50 ते 60 उत्तरपत्रिका तपासण्यायोग्य नसल्याने संबंधित शिक्षकांनी हा प्रकार पुणे शिक्षण मंडळातील अधिकार्यांना सांगितला. तसेच या प्रकरणाची चौकशी केली असता रेल्वे पोस्ट कार्यालयाने संबंधित घटनेचा पत्र देऊन खुलासा केला आहे. न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या कर्मचार्याने उत्तरपत्रिकांचा गठ्ठा पुण्याला नेला. त्याचा पंचनामा करण्यात येणार आहे. रेल्वेस्थानकावर कर्मचार्यांकडून हलगर्जीपणाचा कळस झाल्याने उत्तरपत्रिकांचे तुकडे झाले आहेत. 300 पैकी 20 टक्के उत्तरपत्रिकांची तपासणी कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्षभर अभ्यास करून उत्तरपत्रिकांचे तुकडे झाले असल्याने गुणवंत विद्यार्थ्यांना याचा परिणाम भोगावा लागणार आहे. उत्तरपत्रिका कोणत्या महाविद्यालयाची असून, ते विद्यार्थी कोणते? यावर शिक्षण मंडळ काय निर्णय घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यातील काही उत्तरपत्रिका जळालेल्या असल्याची अफवा पसरली. मात्र, रेल्वेखाली पडल्याने त्या खराब झाल्याचे नंतर उघड झाले. उत्तरपत्रिकांचे गठ्ठे रेल्वेतून खाली उतरविताना किती गठ्ठे पडले तसेच किती खराब झाले हे मात्र अद्याप उघड झाले नाही. |