- महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रामधील भूखंडांची कमतरता लक्षात घेऊन ज्या भूखंडांचे वाटप होऊनही दिलेल्या मुदतीत त्यांचा विकास करण्यात आलेला नाही, अशा भूखंडांचा ताबा घेऊन त्याचे वाटप नवीन उद्योजकांना करण्याचे आदेश आज उद्योग राज्यमंत्री ना. सचिन अहिर यांनी एमआयडीसी प्रशासनाला दिले.
उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षेत्रपती शिवाजी यांनी आज अहमदनगर औद्योगिक वसाहतीला भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अहिर म्हणाले, ‘नगर हे औद्योगिक विकासाच्या केंद्रस्थानी आले असून आम्ही भविष्यातील नगरच्या औद्योगिक विकासाबाबत गंभीर आहोत. नगरमध्ये नवीन जागांच्या विकासाबाबत महामंडळाला आदेश देण्यात आले आहेत. स्थानिकांना रोजगार देण्याची समस्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मूळ धरत आहे, या जनभावनेस लक्षात घेऊन व उद्योगांना असलेल्या तांत्रिक मनुष्यबळाच्या विकासासाठी त्या उद्योगानुरूप प्रशिक्षण देणारा ‘अल्ट्रा मॉडेम औद्योगिक प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे. आयटीआय आणि उद्योजकांच्या समन्वयातून स्थानिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. डी झोन आणि ्नलस्टर या प्रश्नावर चर्चेअंती निर्णय दिला जाईल. हा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल.’ यावेळी उद्योजकांनी औद्योगिक वसाहतीतील काही समस्या मांडल्या त्यावर निर्णय देताना ना. अहिर यांनी एमआयडीसीतील पथदिवे 15 दिवसात दुरुस्त करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले. एमआयडीसीत कामगारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प असावा या मागणीला गृहनिर्माण राज्यमंत्री असलेल्या अहिरांनी सकारात्मक प्रतिसाद देत म्हाडाच्या माध्यमातून असा प्रकल्प राबविण्यात येईल अशी माहिती दिली. घोडेगाव येथे मंजूर असलेल्या फूड पार्कला दिरंगाई का होत आहे, याबाबत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षेत्रपती शिवाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या आदर्श निकषांचे पालन झाले की हा फूड प्रकल्प कार्यान्वित होईल अशी माहिती दिली. यावेळी लार्सन अॅण्ड टुब्रोचे सहायक व्यवस्थापक अरविंद पारगावकर यांनी प्रास्तविक केले. महापौर संग्राम जगताप, एमसीसीआयएचे उपाध्यक्ष प्रकाश गांधी, अस्मिताचे अध्यक्ष अजित घैसास आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. एमसीसीआयएचे सचिव कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन, तर उद्योजक के. एम. भिंगारे यांनी आभार मानले. दरम्यान ना. सचिन अहिर व क्षेत्रपती शिवाजी यांनी लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीत भेट देऊन पर्यावरण रक्षणासाठी कंपनीच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांची पहाणी केली. |