- पाकिस्तान संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्यातील खराब कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आज (बुधवार) संघातील खेळाडूंवर कडक कारवाई केली. या नुसार युनूस खान, मोहम्मद युसूफवर आजन्म बंदी घालण्यात आली असून, शाहीद आफ्रिदीला 30 लाख तर अकमल बंधूंना 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच शोएब मलिक आणि राणा नावेद उल हसन यांच्यावर एका वर्षाची बंदी घातली आहे.या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. माजी कसोटीपटू वसीम बारी यांच्या सहा सदस्यीय समितीने मंडळाला शिफारशी सादर केल्या.
ऑस्ट्रेलिया - पाकिस्तानदरम्यान झालेल्या मालिकेत पाकने प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामना गमावला. त्यातील काही सामने हे स्वत: हून गमावल्याचे बोलले जात होते. त्याआधी न्यूझीलंड आणि अबुधाबी दौर्यातही पाकला मानहानिकारक अपयश पत्करावे लागले होते. मैदानाबाहेरील घडामोडींमुळे आणि काही बेशिस्त खेळाडूंमुळेच संघाच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचे समितीला आढळून आले. त्यानुसार आफ्रिदी, कमरान आणि उमर हे अकमल बंधू, राणा नावेद, मलिक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. कारवाई करण्यात आलेल्या खेळाडूंनी गैरवर्तनाचा कहर केला होता. होबार्टमधील शेवटच्या तिसर्या कसोटीपूर्वी अकमल बंधूंनी वाद निर्माण केला. कामरानला वगळण्यात येईल, असे पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले होते. मात्र, या सर्व कागदोपत्री कारवाईला आपण भीक घालत नाही, यानंतरही आपण खेळूच, अशी गर्विष्ठ भूमिका अकमलने वारंवार जाहीरपणे मांडली. तर दुसरीकडे उमरने दुखापतीचे ढोंग केले आणि खेळणार नसल्याचा इशारा दिला. आफ्रिदी शेवटच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पर्थमध्ये चेंडू कुरतडताना पकडला गेला. याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) त्याच्यावर यापूर्वीच कारवाई झाली आहे.
सिडनी कसोटीत कामरान अकमलने सोपे झेल सोडले होते. त्यानंतर त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते. त्याला शेवटच्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले होते. मॅच फिक्सिंगमध्ये पाकच्या दोन खेळाडूंचे नाव गेल्या काही दिवसांपासून तेथील माध्यमांमध्ये येत होते. दरम्यान पीसीबीचे माध्यम व्यवस्थापक नदीम सर्वर म्हणाले की, खेळाडूंना झालेल्या शिक्षेचा मॅच फिक्सिंगशी संबंध नाही. आचारसंहिता भंगामुळे ही कारवाई झाली आहे. खेळाडू पीसीबीच्या निर्णयाविरुद्ध अध्यक्षांकडे दाद मागू शकतात. |