ग्रामीण पोलीस सज्ज
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उद्या (दि. ७) होणार्या सर्वात्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून संवेदशील मतदान केंद्रांसह पंधरा तालुक्यांत कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आज (दि.६) सर्वच मतदान केंद्रांवर बंदोबस्त रवाना झाला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
जिल्ह्यात होणार्या या निवडणुकांसाठी पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच तालुक्यात अभूतपूर्व पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून, यासंबंधित सर्व सूचना व आदेश दिल्यानंतर आज हा बंदोबस्त सर्वत्र रवाना झाला. त्यानंतर सायंकाळी पोलीस अधीक्षक पडवळ यांनी पुन्हा बंदोबस्तासंदर्भात सर्व अधिकार्यांमार्फत एका बैठकीत आढावा घेतला.
आज जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडावे यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. उद्याच्या बंदोबस्तासाठी पोलीस अधीक्षक पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजीव जैन, १५ पोलीस उपअधीक्षक, ३५ पोलीस निरीक्षक, ११८ सहा. निरीक्षक/उपनिरीक्षक, २८१२ पोलीस कर्मचारी, १८०० गृह रक्षक दलाचे जवान, २०० विशेष पोलीस अधिकारी, एस. आर. पी. एफच्या दोन कंपन्या (२०० जवान), मुंबई रेल्वेचे २३६ पोलीस कर्मचारी व नंदुरबार जिल्ह्यातील ५५० कर्मचार्यांमार्फत बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अनुचित प्रकारांना तात्काळ प्रतिबंध करण्यासाठी मालेगांव शहरात दोन शीघ्र कृती दल पथके व ग्रामीण पोलीस मुख्यालयात दोन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष ठेवण्यासाठी व्हिडीओ शूटिंग पथक तैनात करण्यात आले असून त्याशिवाय फिरत्या गस्तपथकाद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा व हरसूलसह इतर भागातील ८० संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. |