सौर ऊर्जेवरील नेट मिटरींग प्रणाली कार्यान्वीत कोपरगावात पहिला प्रयोग

0

कोपरगाव (प्रतिनिधी)- येथील प्रा. आनंद बारबिंड यांच्या घरी सौर ऊर्जेवर आधारीत पहिली नेट मिटरींग प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ व प्रा. बारबिंड यांच्यातील परस्पर समझोता करार होऊन कराराची कागदपत्रे परस्परांना आदान प्रदान करण्यात आली.

 
यावेळी वितरण कंपनीचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता आनंद राठोड, प्रा. बारबिंड, सौर गुरू ग्रीन एनर्जी सोल्युशन्स कंपनीच्या प्रोजेक्ट डेव्हलपर मनीषा बारबिंड, वीज वितरण कंपनीचे अभियंते गणेश चौधरी, एस.एस. कडाले, पी.डी. बाविसकर, एम.ए. आभाळे, पी.डी. जाधव आदी उपस्थित होते.

 
सौ. बारबिंड यांनी उपस्थितांचे स्वागत करून सांगितले की, त्यांनी प्रा. बारबिंड यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल पासून 1 किलोवॅट क्षमतेचा संच उभारला. सोलर पॅनल पासून वीज इनव्हर्टरला देऊन ए.सी. वीज निर्माण करून तिचा घरातील उपकरणांसाठी वापर केला आहे. या सर्व संचाची महावितरणच्या नियमाप्रमाणे संगमनेर येथील विभागीय कार्यालयाचे अभियंता अनिल गोडसे यांनी तपासणी केली. समजा तयार होणार्‍या संपूर्ण वीजेची घरात गरज नसेल तर ती नेट मिटरींगच्याद्वारे महावितरणच्या विद्युत वाहकांना देऊन विकता येते. तसेच सौर उर्जेपासून तयार होणारी वीज अपुरी पडत असल्यास महावितरणाकडूनही वीज विकत घेता येऊ शकते. तसेच रात्रीच्या वेळी संपूर्ण वीज महावितरणाकडून घेता येते. या संचाचे आयुष्य 25 वर्षांचे असून साडे तीन ते सहा वर्षात संपूर्ण संच उभारणी खर्च वसूल होऊन पुढील कित्येक वर्षे मोफत वीज वापरता येते. यामुळे पर्यावरण पुरक असा हा प्रकल्प आहे.

 
श्री. राठोड म्हणाले की, औष्णिक वीज केंद्रातून एक युनिट वीज निर्मितीसाठी कोळशापासून एक किलो कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जीत होतो. एका कुटूंबासाठी एका वर्षासाठी सर्वसाधारण 1 हजार 500 युनिटची गरज असते. म्हणजे एवढी वीज जर औष्णिक वीज केंद्राकडून जर घेतली तर एक कुटूंब 1 हजार 500 किलो कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जीत करते असा अर्थ होतो. एवढ्या वायुच्या मोबादल्याच्या बदलात ऑक्सिजन निर्मितीसाठी 68 वृक्षांची गरज असतेे. म्हणजे वीजेसाठी सौर उर्जेचा वापर केल्यास एका कुटूंबाने 68 वृक्षांची लागवड करून संगोपन केल्यासारखे आहे. प्रा. बारबिंड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*