सुलभ पीक कर्जासाठी जिल्ह्यात मेळाव्यांचे आयोजन करावे

0
नंदुरबार । दि.14 । प्रतिनिधी-सुलभ पीक कर्ज अभियानाचा कालावधी 31 जुलैपर्यंत राहणार आहे. जिल्ह्यातील व्यापारी बॅकांना डीएलसीसी मार्फत पीक कर्जाचा लक्ष्यांक देण्यात आलेला आहे.
या अभियानाद्वारे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांना पीक कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टीने या बँकांना 2017-18 साठी शेतकरी संख्येचा देखील लक्ष्यांक देण्यात येणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील व्यापारी बँकांच्या शाखा असलेल्या गावात वेळोवेळी कर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात सर्व बँक अधिकार्‍यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी एस.एस.गाडीलकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी एल. पी. साताळकर (शहादा), जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, कृषी विभागाचे अधिकारी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, धुळे व नंदुरबार जिहा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी डी.बी. पवार आदी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील पिक कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी घेतला असता, 12 जून अखेर 8803 सभासदांना 121 कोटी 94 लाख पीक कर्ज वाटप करण्यात आले असून कर्ज वाटपाची टक्केवारी 18 टक्के आहे.

त्या अनुषंगाने शासन परिपत्रक 6 जूनच्या अनुषंगाने सुलभ पीक कर्ज अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी कर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी पीक कर्ज अभियानाची कार्यपध्दती विशद करतांना जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले, जिल्हा अग्रणी अधिकारी व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी पिक कर्ज अभियानाच्या माहितीचे एकत्रीकरण करुन ही माहिती प्रत्येक सोमवारी राज्यस्तरीय बँकर्स समिती व सहकार आयुक्त कार्यालयास उपलब्ध करुन द्यावी.

अभियानाचा आढावा प्रत्येक सोमवारी घेण्यात येईल. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अग्रणी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित रहावे. ज्या बँकांचे कर्ज वाटप जिल्ह्याच्या सरासरी पेक्षा कमी आहे, अशा बँकेबाबत संबंधित बँकेचे वरीष्ठ अधिकारी व राज्यस्तरीय बँकर्स समितीचे चेअरमन यांना अहवाल सादर करण्यात येईल.

अभियान कालावधीत संबंधित सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून पीक कर्जासाठी दिलेला लक्षांक 100 टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी आवाहनही केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री.गाडीलकर म्हणाले, राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत कमकुवत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या जिल्ह्यात शेतकर्‍यांना चालू वर्षाच्या खरीप व रब्बी हांगामात व्यापारी बँकांमार्फत पीक कर्ज पुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

ही वस्तूस्थिती विचारात घेवून या जिल्ह्यात विशेषत: व अन्य जिल्ह्यातही आवश्यकतेप्रमाणे शेतकर्‍यांना खरीप-2017 या हंगामात व्यापारी बँकांमार्फत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

शेतकर्‍याला खर्‍या अर्थाने सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर बँकाचेही सहकार्य अपेक्षीत असून सर्व बँकर्सना अपर जिल्हाधिकारी श्री.गाडीलकर यांनी पिक कर्ज मेळाव्याच्या माध्यमातून कर्ज वाटपाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन केले.

 

LEAVE A REPLY

*