सावाना निवडणुकीत आरोप प्रत्यारोप ; ग्रंथमित्र विरूध्द जनस्थान टक्कर

0

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाची निवडणुक जसजशी जवळ येत आहे तस तशी आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्या आहेत. एका बाजूला प्रचार तर दुसरया आरोप अशीच स्थिती सध्या तरी दिसू लागला आहे. गुरुवारी ‘ग्रंथमित्र पॅनल’ने आपल्या प्रचाराचा शुभारंभ वाचनालयाबाहेर केल्याने ‘जनस्थान’ पॅनलने यावर आक्षेप घेत ग्रंथमित्र पॅनलचा मनमानी कारभार सुरू असल्याचे मत व्यक्त केले.

ग्रंथमित्र पॅनेलने सुरवातीलाच ग्रंथ पूजन आणि ग्रंथ पालखी काढत आपल्या प्रचाराला सुरुवात केली. यात साहित्यिक प्रभाकर बागुल, रेखा भांडारे, एम. आव्हाड, विजय पवार आणि अभिमन्यू सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथ पूजन आणि ग्रंथ पालखी काढून तसेच कवी कुसुमाग्रज, मु. शं. औरंगाबादकर, वसंत कानेटकर, अ. वा. वर्टी यांच्या प्रतिमा पूजनाने प्रचाराचा आरंभ केला.

सार्वजनिक वाचनालयाच्या बाहेर प्रचारानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथ पालखीचा समारोप वाचनालयाच्या प्रवेश द्वाराजवळ करण्यात आल्याने जनस्थान पॅनलच्या या कृतीवर थेट आक्षेप घेतला. बुधवारी जनस्थान पॅनलतर्फे प.सा.नाट्यगृहाच्या बाहेर लावण्यात आलेल्या फलक काढून घेण्याची तक्रार ग्रंथमित्र पॅनलतर्फे करण्यात आल्याने तक्रार करणार्‍या पॅनलनेच वाचनालय आवारात ग्रंथ पालखी कशी काढली, असा सवाल प्रतिस्पर्धयानी उपस्थित केला आहे.

फलक आणि ग्रंथ पालखीवरून रणकंदन सुरू असताना ‘ग्रंथमित्र पॅनल’कडून सार्वजनिक वाचनालय या वास्तुचा प्रचार म्हणून वापर केला जात असल्याचाही आरोप जनस्थान पॅनलतर्फे करण्यात आला आहे. काळजीवाहू अध्यक्ष म्हणून प्रा. विलास औरंगाबादकर हे वाचनालयाचा कारभार बघत असले तरी निवडणुकी संबंधित कामे वाचनालयातून व्हायला नकोत, असेही मत जनस्थान पॅनलतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

सार्वजनिक वाचनालयात सुुसूत्रता निर्माण व्हावी, असे दावे निवडणुकीतील उमेदवार करत असले तरी मात्र वाचनालयात असे चित्र बघायला मिळत नसल्याचा अनुभव वाचक सभासदांनादेखील येत आहे. दरम्यान जसजसा निवडणुकीचा दिवस जवळ येत आहे तसतशी रंगत वाढत जाणार आहेे.

LEAVE A REPLY

*