‘समृद्धी’ कोणाची?

0

नाशिक जिल्ह्यातून जाणारा प्रस्तावित ‘समृद्धी’ महामार्ग सध्या चांगलाच वादात आहे. हा बहुउद्देशीय महामार्ग मुंबई ते नागपूरदरम्यान खास करून नागपूरच्या विकासाच्या दिशेने जाणारा आहे. राज्यासाठी तसेच या महामार्गावरील संबंधित सर्व घटक, विशेषत: ज्यांच्या जमिनी त्यात जातील त्या प्रकल्पग्रस्तांना हा महामार्ग किती ’समृद्ध’ ठरेल याचा पाढा संबंधित सरकारी अधिकार्‍यांकडून वाचला जात आहे.

आतापर्यंत अनेक सरकारी प्रकल्पांसाठी जमिनी देऊन हात पोळलेले इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील शेतकरी मात्र सरकारकडून दाखवल्या जाणार्‍या सोनेरी स्वप्नांना भुलण्यास तयार नाहीत. जमिनी देण्यास शेतकर्‍यांचा विरोध असताना सरकारी यंत्रणेने मात्र पोलिसी बळ वापरून जमीन मोजणी कार्यक्रम चालवला आहे.

‘समृद्धी’ महामार्ग आणि शेतकरी आंदोलनाचा शिवडे परिसर सध्या केंद्रबिंदू बनला आहे. वाटेल ते करून विदर्भाची ‘समृद्धी’ निश्‍चित करणारा हा महामार्ग झालाच पाहिजे, असा राज्य सरकारचा निर्धार आहे; पण ज्यांच्या जमिनी सरकार ताब्यात घेणार आहे त्या शेतकर्‍यांना विश्‍वासात घेण्यात सरकार आणि लोकप्रतिनिधी तोकडे पडले आहेत. त्यामुळेच शिवडे परिसराला ‘समृद्धी’ मान्य नाही.

सरकारचा पवित्रा पाहता या महामार्गासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी तर जाणारच! पण शेतकर्‍यांचे संभाव्य नुकसान ‘समृद्धी’ कसे भरून देणार? हा मुद्दा राजकीय पक्षांना आयता आला आहे. सत्ताधार्‍यांसह विविध पक्षांच्या नेत्यांच्या ये-जा मुळे शिवडे परिसर हल्ली नवे ‘राजकीय पर्यटन स्थळ’ बनले आहे.

दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते खा. राजू शेट्टींनी शिवड्याला भेट दिली. शेतकरी संघर्ष समिती मेळाव्यात खा. हेमंत गोडसे यांनी हजेरी लावली; पण शिवसेनेच्या दुटप्पी धोरणामुळे शेतकर्‍यांनी त्यांना पिटाळून लावले. शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा आज नाशिक जिल्ह्यात येत आहे. यावेळी सहभागी नेते शिवडे येथील शेतकर्‍यांची बाजू समजून घेणार आहेत.

कदाचित काही मंत्रीसुद्धा संबंधित शेतकर्‍यांची मनधरणी करण्यासाठी पायधूळ झाडण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांच्या जीवन-मरणाचा हा प्रश्‍न राजकीय वळणाने जाऊ पाहत आहे का? ‘समृद्धी’तून अनेकांना तर्‍हेतर्‍हेचे फायदे मिळणार असल्याने त्यासाठी जोरदार लगबग चालू आहे. नागपूरकडे जाणार्‍या महामार्गासाठी चाललेली ही लगबग महाराष्ट्राच्या इतर भागाच्या विकासाबाबत फारशी का दिसत नाही? प्रस्तावित ‘समृद्धी’ महामार्गातून समृद्धी खरेच आली तर ती कोणासाठी असेल? आज विदर्भाच्या समृद्धीच्या दिशेने धावणारा ‘समृद्धी’ महामार्ग उद्याच्या महाविदर्भाचा मार्ग तर प्रशस्त करणारा नसेल?

LEAVE A REPLY

*