समशेरपुरात अवैध दारूचा साठा

0

महिलांनी केला उद्ध्वस्त; विक्रेते पळाले

 

अकोले (प्रतिनिधी)-  समशेरपूर येथे महिलांनी अवैध दारू विक्री विरोधात ग्रामसभा घेऊन गावातून काल शुक्रवारी मोर्चा काढला. दारूविक्री करणार्‍या धाब्यांवर व दुकानांवर महिलांनी आपला मोर्चा वळवला. दारू विक्रेते पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र पोलीस प्रशासनासमोर महिलांनी अवैध दारूसाठा पकडला व दारूच्या बाटल्या रस्त्यावर फोडून आपला संताप व्यक्त केला.

 
शासनाने दारूविक्री बंद केली असतानाही समशेरपूर येथे अनेक दिवसांपासून अवैध दारूविक्री सर्रासपणे सुरु होती. दारू विक्री बंद व्हावी यासाठी प्रशासनाला अनेकवेळा लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. परंतु कोणतीच कार्यवाही होत नव्हती. यासाठी महिलांनीच ग्रामपंचायतमध्ये दारूबंदी विरोधात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. यावेळी गावात व समशेरपूर फाट्यावर सुरु असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला. ग्रामसभेला महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. आजपासूनच दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय महिलांनी घेतला. सर्व महिला अवैध दारूविक्री करणार्‍या दुकानाकडे निघाल्या, सर्व गावांतील महिला त्यात सहभागी झाल्या. यामुळे महिला अधिकच आक्रमक झाल्या.

 

दारूविक्रेते आपली दुकाने सोडून पळून गेले. ढाबा चालकांनी अवैध दारूसाठा गाडीमध्ये टाकून दुसरीकडे वाहून नेण्याचा प्रयत्न केला. महिलांनी एमएच17 सीएम 9395 मारुती गाडी पकडून त्यातील देशी व विदेशी दारू पकडली व त्यातील सर्व दारूच्या बाटल्या रस्त्यावर फोडल्या.याप्रसंगी पोलीस प्रशासन उपस्थित होते. महिलांनी सर्व दुकानातील दारूसाठा उद्ध्वस्त केला.

 
अवैध दारूविक्री विरोधी आंदोलनाचे नेतृत्व सुनीता नितीन बेनके यांनी केले. या आंदोलनात मीराबाई दराडे, रोहिणी गाडेकर, सीमा चव्हाण, पूजा चोखंडे, शालिनी कोरडे, सुनंदा ढेकणे, सुनीता मुखेकर, पुष्पा सोनवणे, संगीता शेलार,मीरा ढोन्नर,विजया चव्हाण,सुमन बेदरकर,मुंताज पटेल,शोभा मुखेकर,स्वाती मुखेकर,सारिका सहाणे, भारती पोटे, कलाबाई मुंढे, चित्रा एखंडे, राधा बेनके,वर्षा बेनके,जया गोरे, शांताबाई बेनके,संगीता नेहरकर, सुलोचना बेदरकर आदींसह अनेक महिला सहाभागी झाल्या होत्या.

 
यावेळी पोलीस प्रशासनाला आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले.अकोले पोलीस स्टेशनचे पीएसआय नितीन बेंद्रे,एस.के.भांगरे,आर.डी. ढोकणे यांनी निवेदन स्वीकारले.अवैध दारू विक्रेत्यांवर व ढाबा चालकांवर कठोर कारवाई करावी अन्यथा यापुढील काळात या पेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*