सत्कीर्तीचा डंका!

0
गावसुधारणेच्या व गावाच्या समस्यांवर उत्तरे शोधण्यासाठी पुढाकार घेणार्‍या नागरिकांचे प्रयत्न दिवसेंदिवस वाढत आहेत.सरकारी यंत्रणेची उदासीनता कदाचित अशा प्रयत्नांना बळ देणारी ठरत असावी. कायद्याने तरुण-तरुणींच्या विवाहाचे वय निश्‍चित केले आहे. कायदेबाह्य वर्तन करणार्‍यांना शिक्षेची तरतूददेखील आहे.

तरीही जनजागृतीअभावी अल्पवयीन मुलींचे विवाह सर्रास होतच असतात. जालना जिल्ह्यात मात्र या कुप्रथेविरुद्ध शासकीय सेवकांसह एक गाव एकत्र आले आहे. ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी ताई, शिक्षक यांच्या मदतीने तब्बल १८१ अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यात महिला बालकल्याण विभागाला यश आले आहे.

मुलींच्या कुटुंबियांना अल्पवयातील विवाहाचे दुष्परिणाम समजावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. जमाना आधुनिकतेचा असला तरी मुली मात्र आजही पालकांना नकोशा वाटतात. सिन्नर तालुक्यातील घोटेवाडी गावातील शिक्षक आणि ग्रामस्थांनी प्रत्यक्ष कृतीतून या कुप्रथेवर प्रहार केला आहे.

या गावात घराच्या मुख्य दरवाजावर मुलींच्या नावाची पाटी लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विवाहातील मानापानाच्या परंपरेला फाटा देण्याचा निर्णय मोखाडा तालुक्यातील राजेवाडी गावच्या गावकर्‍यांनी घेतला आहे. भारतीय संस्कृतीत अन्नदान हे पुण्याईचे काम समजले जाते. औरंगाबाद जिल्ह्यात नारेगाव येथील आमीरखान पठाणने अन्नदानाचा वेगळा नमुना कृतीत आणला.

त्याने हुंडा न घेता विवाह केला. त्यानिमित्ताने परिसरातील दोनशे गरजूंंना आवर्जून जेवणाचे आमंत्रण दिले. दोन घास मुखी पडण्याची भ्रांत असलेल्यांना गोडाधोडाचे जेवण दिल्याने समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया पठाण कुटुंबियांनी व्यक्त केली. रुढी-परंपरांना फाटा देण्याची हिंमत दाखवणे सहसा सोपे नसते. प्रसंगी सामाजिक बहिष्काराला तोंड द्यावे लागते; पण जे कोणी असा धोका पत्करतात व कुप्रथांना फाटा देतात त्यांच्या हिंमतीला समाजाची साथ मिळावयास हवी.

कोणत्याही घटनेवर टीका करण्याची सवय समाजातील अनेकांना असते; पण केवळ टीका न करता प्रत्यक्ष सुधारणेत सहभागी होणे ही समाजासुधारणेची नांदी ठरू शकते. याची प्रत्यक्ष उदाहरणे वर उल्लेख केलेल्या घटनांमधून समाजापुढे ठेवली गेली आहेत. कवी अनंत फंदी याचा एक प्रसिद्ध फटका (काव्य) अशा कामाची दिशा दाखवतो.

‘सत्कर्मा तूं टाकू नको | सुविचारा कातरू नको |
सत्संगत अंतरू नको | द्वैताला अनुसरू नको|
सत्कीर्ती नौबतीचा डंका गाजे मग शंकाच नको |
वर नमूद केलेल्या घटनांतील सर्व व्यक्तींच्या सत्कीर्तीचा डंका समाजात वाजत राहील, अशी आशा करावी का?

LEAVE A REPLY

*