संप मिटविण्यासाठी बोलावलेली बैठक निष्फळ

0

शेवगाव नगरपरिषदेचे सफाई कामगार आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम

 

शेवगाव ( तालुका प्रतिनिधी ) – शेवगाव नगर परिषदेच्या स्वच्छता कामगारांनी पुकारलेल्या संपात तडजोड व्हावी म्हणून नगरपरिषदेच्या दालनात ज्येष्ठ नेते अरुण लांडे यांनी कामगार संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी बैठकीचे आज आयोजन केले होते. मात्र संघटनेचे नेते व कामगार आंदोलनाच्या निर्णयापासून दूर हटण्याच्या मनस्थितीत नाहीत. यामुळे काहीच चर्चा होऊ शकली नाही.

 
यासंदर्भात अरुण लांडे व सत्ताधारी नगरसेवकांनी माहिती देताना सांगितले की, या कामगारांच्या न्याय मागण्यांबाबत आम्हाला सहानुभूती आहे. काल आम्ही जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली. कामगारांची बाजू मांडली. परंतु हा विषय नगर रचना खात्याच्या अखत्यारित असल्याने या खात्याशी चर्चा करावी लागेल. तोपर्यंत कामगारांनी कामबंद आंदोलन मागे घेऊन सहकार्याची भूमिका घ्यावी असे मत जिल्हाधिकार्‍यांनी मांडले.

 

यावेळी कामगार प्रतिनिधी हजर होते. परंतु वस्तुस्थिती माहीत असूनही आज मात्र ते चर्चेला आले नाहीत. ते जर समन्वय व सामंजस्याची भूमिका घेणार नसतील तर सोमवार पर्यंत त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहू. अन्यथा शहर स्वच्छता व आरोग्याच्यादृष्टीने व नागरिकांच्या हितासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून ठेका पद्धतीने कामे करून घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी चर्चा झाली.

 
नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेत्या सविता दहिवाळकर व उपस्थित भाजप नगरसेवकांनी मात्र कामगारांच्या मागण्या मान्य व्हाव्यात तसेच परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा अशी भूमिका मांडली. यावेळी आरोग्य समितीचे सभापती उमर शेख, पाणी पुरवठा समिती सभापती विकास फलके, बांधकाम समितीचे सभापती भाऊसाहेब कोल्हे, नगरसेवक शब्बीर शेख, कैलास तिजोरे, स्वीकृत नगरसेवक नंदू सारडा अपक्ष नगरसेवक वजीर पठाण आदी उपस्थित होते.

 

कामगार संघटनेचे नेते संतोष मोहिते, रमेश खरात, किरण मिरपगार व बहुसंख्य कामगार आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. इतर ठिकाणच्या काही नगरपरिषदेच्या कामगारांच्या मागण्याबाबत निर्णय झालेले आहेत. अनेक दिवसांपासून हा प्रश्न जशाच तसा पडल्याने कामगार माघार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे या कामगारांशी चर्चा होऊ शकली नाही.

 

कामगारांशी चर्चा करून मार्ग काढणे हे प्रशासनाचे काम आहे. मात्र स्थापनेपासून येथील नगरपालिका प्रभारी मुख्याधिकार्‍यांच्या छत्राखाली वावरत आहेत व नागरिकांना विविध प्रश्‍नांचे चटके सहन करण्याची वेळ आली आहे. तसेच पदाधिकार्‍यांची गळचेपी होत आहे. या आंदोलनात प्रशासनाऐवजी पदाधिकार्‍यांना पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. नगरपरिषदेला पूर्णवेळ स्वतंत्र मुख्याधिकारी मिळावा अशी मागणी सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी केली आहे. मात्र मागणी मान्य न झाल्यास नगर परिषदेला टाळे ठोकण्याचा इशारा या सर्वांंनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*