संत निवृत्तीनाथांच्या पालखीसह त्र्यंबक-नाशिकचे वारकरी सोलापूर जिल्ह्यात दाखल

0

करमाळा ता. २८ :

येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम ॥

हेचि मज प्रेम देयी देवा ॥

डोळे भरूनिया पाहिन तुझे मुख |

हेचि मज सुख देयी देवा ॥

या भावनेने आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचे बुधवारी सोलापूर जिल्ह्याच्या सिमेवर शेगुड येथे आगमन झाले.

नाथांसह लाखो वैष्णवांचे जिल्हा वासियांनी अत्यंत उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले. सोहळा रावगांव मुक्कामी विसावला.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवटच्या कोरेगांव मुक्कामानंतर सोहळा सकाळी ६.३० वाजता रावगांवकडे मार्गस्थ झाला. पहाटे निवृत्तीनाथांच्या पादुकांची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. पहाटे स्नानादि कर्मे उरकून वारकर्‍यांनी पंढरीची वाट धरली.

सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणात वारकर्‍यांची पावले पंढरीच्या दिशेने झपझप पडत होती. दिंड्यादिंड्यामध्ये भजनाला रंग भरत होता. सकाळचे काकड्याचे अभंग दिंड्यादिंड्यामधून गायले जात होते.

टाळ, मृदुंगाच्या सुरेख साथीने गोड व कर्णमधुर चालीने वातावरण प्रसन्न बनले होते. पंढरी समीप आल्याने वारकर्‍यांमध्ये उत्साह संचारला होता. सकाळच्या न्याहरीसाठी सोहळा आंबी जळगांव येथे पोहोचला.

या सकाळच्या विसाव्यावर न्याहरी उरकून सोहळा शेगुडकडे मार्गस्थ झाला.

श्री निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यासमवेत असणार्‍या अश्वांचे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर शेगुड येथे आगमन झाले.

त्यापाठोपाठ नाथांचा रथ व लाखो वारकर्‍यांचे आगमन झाले. यावेळी सोलापूर जिल्ह्याच्यावतीने करमाळ्याचे तहसिलदार संजय पवार, पोलिस निरीक्षक राजेश देवरे यांच्यासह जिल्हावासियांनी सोहळ्याचे दर्शन घेवून स्वागत केले.

सोलापूर जिल्ह्याच्यावतीने मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

यावेळी श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.संजय महाराज धोंडगे, उपाध्यक्ष पवनकुमार भुतडा, पालखी सोहळा अध्यक्ष ह.भ.प.पंडीत महाराज कोल्हे, पालखी सोहळा व्यवस्थापक पुंडलिकराव थेटे, विश्‍वस्त रामभाऊ मुळाणे, ह.भ.प.जयंत महाराज गोसावी, अविना गोसावी, सौ.ललिता शिंदे, सौ.जिजाबाई लांडे, योगेश गोसावी, त्र्यंबकराव गायकवाड, डॉ.धनश्री हरदास, डॉ.चेतना मानुरे-केरूरे यांच्यासह मानकर्‍यांचा जिल्हावासियांच्यावतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला.

येथील स्वागत स्विकारून सोहळा सायंकाळी रावगांव मुक्कामी पोहोचला. समाजआरतीनंतर सोहळा येथे विसावला. उद्या हा सोहळा करमाळा मार्गे जेऊर मुक्कामाकडे मार्गस्थ होईल.

 

 

LEAVE A REPLY

*