संतप्त राहुरीकरांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा

0

वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आक्रोश आंदोलन : प्राजक्त तनपुरे

राहुरी (प्रतिनिधी) – अनेकदा निवेदन देऊनही व वारंवार तक्रार करूनही महावितरणच्या अधिकार्‍यांचा भारनियमनाबाबतचा आडमुठेपणा थांबायला तयार नव्हता. त्यामुळे राहुरीसह तालुक्याच्या अर्थकारणावर व शेती आणि व्यापारावर परिणाम होऊ लागला. कडाक्याच्या उन्हाळ्यात भारनियमनामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच रात्रीच वीज गायब होऊ लागल्याने चोर्‍याही वाढू लागल्या. त्यामुळे दहशतीखाली वावरत असलेल्या संतप्त नागरिक, शेतकरी, व्यापारी, कामगार, महिला व विद्यार्थ्यांंनी राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली काल शनिवारी भव्य मोर्चा काढला.

 
दरम्यान, चार दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आक्रोश आंदोलन पुकारण्यात येणार असून त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणाची असल्याचा गर्भित इशारा नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
काल शनिवारी (दि.06) सकाळी 11 दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, कामगार व इतर नागरिक यांचा उत्स्फूर्त मोर्चा घोषणाबाजी करीत महावितरण कार्यालयावर धडकला. यावेळी शेतकरी बाबा सोनवणेे, किशोर जाधव, सुयोग नालकर, दत्तात्रय कवाणे, ज्ञानेश्‍वर जगधने, पंचायत समिती उपसभापती रवींद्र आढाव, विक्रम गाढे, निर्मला मालपाणी, पं. स. सदस्य बाळासाहेब लटके यांची भाषणे झाली. त्यांनी महवितरण अधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतल्याने अधिकार्‍यांची पुरती बोबडी वळाली. नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे म्हणाले, मुळा धरणावर असलेल्या फिडरवर विजेचा परिणाम होऊन मोटारी बंद पडल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे पालिका प्रशासनाला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. तसेच नागरिकांना बिले वेळेवर वाटप होत नाही. अव्वाच्या सव्वा बिले दिली जातात. पालिकेच्या एक पथदिव्याचे तब्बल बिल 5 लाख रुपये आले असून हा वीज वितरणाचा सावळ गोंधळ नागरिकांनी कितपत सहन करायचा? सिंगलफेजच्या कामाचे श्रेय आम्ही घेतले नाही. विजेच्या लंपडाव सुरू असताना लोकप्रतिनिधी कोठे दडून बसले? सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नाचे लोकप्रतिधींना देणेघेणे नसल्याचा आरोप तनपुरे यांनी केला.

 
यावेळी शिवाजी डौले, प्रभाकर पानसंबळ, वसंतराव गाडे, विजय आंबेकर, सुरेश बाफना, राजेंद्र बोरकर, बाळासाहेब उंडे, बाळासाहेब खुळे, सूर्यकांत भुजाडी, दिलीप चौधरी, सचिन भिंगारदे, जगधने, संजय साळवे, संदीप सोनवणे, गोपीनाथ लांबे, नवाज देशमुख, मच्छिंद्र पाटोळे, संजय सोनवणे, प्रकाश भुजाडी, नंदकुमार तनपुरे, पंचायत समिती सदस्य प्रदीप पवार, अशोक आहेर, आदिनाथ तनपुरे, विजय करपे, योगेश आमटे, विजय टापरे, सोमनाथ अनाप, अय्युब पठाण, सचिन तनपुरे, राहुल शेटे, पांडू उदावंत, विलास तनपुरे, इंद्रभान पेरणे, दशरथ पोपळघट, अनिल भट्टड, गणेश धाडगे, रफिक शेख, बबन राऊत, राहुल नालकर, प्रवीण कदम, संदीप कवाणे, युवराज चव्हाण, सुनील धोंडे, गोरख बर्डे, सौरभ उंडे, राहुल शेटे, अनिल कासार के.एम.पानसरे, अशोक कदम, पांडुरंग हारदे, सुरेश निमसे, नबी शेख, ज्ञानदेव नालकर, आयुबखान पठाण, प्रदीप तनपुरे, बाळासाहेब खुळे, गोरक्षनाथ दुशिंग, मारूती हारदे, बापू जगताप, संदीप निकम, घुगरकर, योगेश मालपाणी, संजय धोंडे, संदीप पानसंबळ, अनिल सुराणा, बाळासाहेब आघाव, किशोर कातोरे, महिला आदींसह अन्य नागरिक मोर्चात सामिल झाले होते.

 
यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप देहरेकर, मुरकुटे मोर्चेकरांना सामोरे येऊन त्यांनी तालुक्यातील विविध गावांचे शेतकरी, व्यापारी, घरगुती वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.
यावेळी अनेक शेतकर्‍यांनी उपकार्यकारी अभियंता यांना अनेक ठिकाणी रोहित्रे जळण्याचे प्रमाण वाढले असून त्याच्या दुरूस्तीसाठी शेतकर्‍यांना वर्गणी गोळा करून पैसे दिल्याशिवाय दुरूस्त करून तर मिळत नाहीच, उलट त्याच्या वाहतुकीसाठी पैसे द्यावे लागतात, असा आरोप करताच देहरेकर म्हणाले, रोहित्र दुरूस्तीसाठी कोणीही पैसे देऊ नये, त्याची वाहतूक ही कंपनीची गाडीची सुविधा असल्याने या गाडीतून रोहित्रे दुरूस्ती करून आणली जातील, जर कोणी रोहित्र दुरूरुस्तीला पैसे मागत असतील तर मला संपर्क करावा, असे आवाहन उपस्थितांना केले.

शहरात विजेचा अनियमित होणार्‍या वीज पुरवठ्याच्या बाबतीत भारनियमन निश्‍चित करून त्या व्यतिरिक्त वीज पुरवठा खंडित होणार असेल तर 1 तास अगोदर पालिकेला सूचना करण्यात येईल. तसेच तालुक्यातील मुळा डावा व उजवा कालव्यावर असलेल्या उपसा सिंचन योजनेला सलग 8 तास वीज पुरवठा करण्याचे आणि वीजबिलाचे वाटप, रिडिंग घेण्यासाठी स्थानिक एजन्सीला देऊन नागरिकांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न करण्यात येऊन  सद्यस्थितीत जी एजन्सी आहे, ती बदलण्याचा प्रस्ताव वरिष्ट कार्यालयात पाठविला जाईल, लेखी आश्‍वासन महावितरणचे उप कार्यकारी अधिकारी प्रदीप देहरकर यांनी दिले.

मुळा उजवा व डाव्या कालव्यातून गेल्या 10 दिवसापासून शेतीसिंचनासाठी आवर्तन सोडले असताना केवळ वीज पुरवठा अनियमित होत असल्याने शेतीला पाणी घेता येत नाही. धामोरी उपसा सिंचन योजनेखाली 450 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली असून उजव्या कालव्यातून या  योजनेस पाणी मिळते. मात्र, वीज पुरवठा होत नसल्याने पाणी असूनही ते घेता येणे मुश्किल होत आहे. हीच अवस्था तालुक्यातील जिरायत भागातील शेतकर्‍यांची आहे. भागडा चारीला पाणी सुटले, मात्र, विजेचा पुरवठा खंडित होत असल्याने तिथेही हीच ओरड आहे. यासाठी शेतीला सलग 16 तास वीज पुरवठा करण्याची मागणी तनपुरे यांनी केली.

  राहुरी तालुक्यासह शहराच्या अनेक भागांत वीज पुरवठा अनियमित वारंवार खंडित होत असल्याने त्याचा परिणाम शहरातील पिण्याच्या पाणी पुरवठ्यावर होऊ लागल्याने नागरिकांनी पालिकेला जबाबदार धरल्याने 5 दिवसापूर्वी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयात जाऊन जाब विचारला असता त्यावेळी महावितरणचा एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने नगराध्यक्ष तनपुरे व शिष्टमंडळाने गांधीगिरी करीत राहुरी विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांच्या खुर्चीला हार घालून सहाय्यक अभियंता वैष्णवी घायाळ यांना निवेदन देऊन वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास वीज ग्राहकांचा मोर्चा आणण्यात येईल, असा इशारा दिला होता.

LEAVE A REPLY

*